Paddy : पट्टा तंत्र पद्धतीने वाढवले भाताचे उत्पादन

पुणे जिल्ह्यात मावळ (जि. पुणे) तालुक्यातील शेतकरी भातपिकात सुधारित वा आधुनिक पध्दतीचा वापर करून उत्पादकता वाढवू लागला आहे. तालुक्यातील चांदखेड येथील विकास गायकवाड यांचे कुटुंबही भातशेतीत प्रयोगशील आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी पट्टा पद्धतीने भात लागवडीचे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यातून एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादनवाढीसह मजुरी व खर्चात बचतीबरोबर अन्य फायदे मिळत असल्याचे विकास यांचे अनुभव आहेत.
Paddy Broad Bed Technique
Paddy Broad Bed Technique Agrowon

पुणे जिल्ह्यात मावळ तालुका हा भातशेतीचे आगर (Maval Is A Hub Of Paddy Farming) समजला जातो. या भागात इंद्रायणी वाणावर (Indrayani Verity Of Rice) अधिक भर दिला जातो. बाजारपेठेत त्यास चांगली मागणीही असते. अलीकडील वर्षांपासून मजुरांची टंचाई (Labour Shortage) जाणवत असून, उत्पादन खर्चही वाढला आहे. साहजिकच येथील शेतकरी चारसूत्री, एसआरआय, एसआरटी (SRT Technique) आदी पद्धतींबरोबरच यंत्राद्वारेही भात लागवडीचे प्रयोग करून समस्यांवर उपाय शोधताना दिसत आहे.

गायकवाड यांची प्रयोगशीलता

ज्ञानेश्‍वर, तुकाराम, बाळासाहेब आणि बबन असे चार भाऊ व एकूण २० सदस्यांचे मिळून गायकवाड यांचे कुटुंब आहे. चारही भावंडे वेगवेगळ्या व्यवसायात काम करतात. त्यांची एकूण चार एकर शेती आहे. ज्ञानेश्‍वर यांचा मुलगा विकास ‘मेडिकल’चे दुकान सांभाळून शेतीही करतात. दरवर्षी खरिपात भात हे मुख्य तसेच गहू, ज्वारी, बाजरी, कांदा, भुईमूग, सोयाबीन अशी हंगामनिहाय अन्य पिके असतात. दोन बोअरवेल्स असून, उन्हाळ्यात पिकांना ठिंबक व स्प्रिंकलरने पाणी देण्यात येते.

भातातील प्रयोग

दरवर्षी चार एकरांपैकी सुमारे तीन ते साडेतीन एकरांवर भाताचे क्षेत्र असते. जूनमध्ये लागवडीसाठी तयारी सुरू होते. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने लागवड केली जात असल्याने गायकवाड यांना अनेक समस्या जाणवत. युरिया- डीएपी ब्रिकेट्‍सचा वापर करणे शक्य होत नसे. रोपांची दाटी होऊन हवा खेळती राहात नसल्याने कीड-रोगांचा प्रादुर्भाव व्हायचा. रोपांचे पोषण योग्य पद्धतीने होत नसे. परिणामी, अपेक्षित उत्पादन मिळत नसे. चारसूत्री पद्धतीचा प्रयोगही करण्यात आला होता. त्यातूनही अपेक्षित परिणाम साधले होते. परंतु कमी खर्चात व मजूरसंख्येत अधिक उत्पादन घेण्याच्या उद्देशाने गायकवाड यांनी तीन वर्षांपूर्वी पट्टा पद्धतीचे तंत्र वापरण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षे त्यातून अपेक्षित परिणाम मिळाल्याने यंदा तीन एकरांत या तंत्राच्या वापरात सातत्य ठेवले आहे.

Paddy Broad Bed Technique
चाफे, धामणसेत एक एकर भातशेती वाहून गेली 

...अशी आहे पट्टा पद्धत

कृषी विभागाचे पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी या पट्टा पद्धतीविषयी सांगून त्याबाबत मार्गदर्शन केले असल्याचे विकास यांनी सांगितले. यामध्ये सुमारे पावणेदोन मीटरचा (१७५ सेंटिमीटर) पट्टा तयार केला जातो. त्यानंतर ४० सेंटिमीटर जागा मोकळी सोडली जाते. त्यानंतर पुन्हा १७५ सेंटिमीटरचा पट्टा व पुन्हा मोकळी जागा अशी पध्दत वापरली जाते. या प्रत्येकी पट्ट्यात आठ ओळींमध्ये भात लागवड केली जाते. मोकळ्या जागेत लोखंडी गज व दोरींच्या साहाय्याने पक्के बांधून घेऊन त्याचे जणू कुंपण केले जाते. या पद्धतीने हेक्टरी सुमारे १ लाख ८६ हजार ६०० चूड बसतात असे विकास सांगतात.

Paddy Broad Bed Technique
पेण ः भातशेती नुकसानीचे पंचनामे होणार

पट्टा पद्धतीचे फायदे

-विकास म्हणाले, की या पद्धतीत रोपांची नियंत्रित पद्धतीने लागवड (२५ × २० सेंमी) होते. पट्टे व्यवस्थित दिसतात.

-हवा खेळती राहते. फुटवे जास्त निघतात. रोपांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्याने

प्रकाश संश्‍लेषणाला चालना मिळते. अन्ननिर्मिती होऊन उत्पादनात वाढ होते. किडी-रोगांचे प्रमाणही कमी राहते.

-पूर्वी एक एकर लागवडीसाठी प्रति दिन १५ ते १६ मजुरांची गरज भासायची. पट्टा पद्धतीच्या वापरात

हेच काम ७ ते ८ व्यक्तींमध्ये होऊ लागले आहे. लागवडीपूर्वी शेणखत देण्यात येतेच.

मात्र लागवडीनंतर सुमारे २५ दिवसांनी युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर केला जातो. पट्टा पद्धतीमुळे त्या खोचणे सोपे झाले आहे. त्यासाठी मजुरांच्या संख्येतही ४० ते ५० टक्के घट झाली आहे सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी करणेही सोपे झाले आहे. पुढील काळात नॅनो युरियाचा वापर करण्याचा विचार आहे.

-खते देण्याचे काम वेळेत पूर्ण होते.

--मधल्या मोकळ्या जागेत पाणी असल्याने तेथे तण उगविण्याचा धोकाही कमी होतो.

-यंत्राव्दारे भात कापणीदेखील शक्य होते.

-भात लोळण्याचा धोका कमी असतो

-पूर्वी एकरी ३५ हजार ते ४० हजारांपर्यंत उत्पादन खर्च यायचा. आता तो २५ हजार ते ३० हजारांपर्यंत येतो.

उत्पादनात वाढ

गायकवाड इंद्रायणी वाणाचा वापर करतात. पूर्वी भाताचे एकरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांना मिळायचे. पट्टा पद्धत व सुधारित व्यवस्थापनातून उत्पादनात एकरी ३ ते ४ क्विंटलची वाढ झाल्याचे विकास सांगतात. पट्टा पद्धतीत पहिल्या वर्षी एकरी ३८ क्विंटल, त्यापुढील वर्षी ४२ क्विंटल मिळाले आहे. यंदा ४५ क्विंटल उत्पादन काढण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यादृष्टीने नियोजन केले आहे.

पीक स्पर्धेत पाचवा क्रमांक

गेल्या वर्षी कृषी विभागाने राबविलेल्या पीक स्पर्धेत विकास यांनी भाग घेतला होता. त्यात तालुक्यात पाचवा क्रमांक मिळवण्यात ते यशस्वी झाले. तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.

तज्ज्ञांची प्रतिक्रिया

गायकवाड यांनी पट्टा पद्धतीने केलेल्या भात लागवडी संबंधीच्या शास्त्रीय चाचण्या कृषी विद्यापीठांत झाल्यानंतरच त्याद्वारे मिळणारे उत्पादन व त्याची उपयुक्तता याबाबत अधिक सांगणे इष्ट ठरेल असे मत भातपीक शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

विकास गायकवाड, ९७६४९९३३२९, ९०२१००८००१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com