Onion
OnionAgrowon

Onion : सुधारित तंत्राद्वारे केली दर्जेदार कांदा रोपनिर्मिती

नाशिक जिल्ह्यातील धोडंबे येथील प्रयोगशील कांदा उत्पादक दीपक उशीर यांनी खरिपातील सुधारित कांदा रोपवाटिका तंत्र आत्मसात केले. त्यातून अति पावसात रोपांचे नुकसान टाळले. दर्जेदार रोपनिर्मिती साधून पुनर्लागवडीच्या कांद्याचेही दर्जेदार व एकरी १२ ते १४ टनांपर्यंत उत्पादन घेण्यापर्यंत यश मिळवले आहे. त्यातून श्रम, वेळ व खर्चातही बचत साधली आहे.

नाशिक जिल्ह्यातील धोडंबे (ता. चांदवड) येथील दीपक उशीर यांची प्रयोगशील कांदा उत्पादक (Onion Producer Farmer) अशी ओळख आहे. त्यांची सुमारे ४ ते ५ एकर शेती आहे. पैकी दरवर्षी दोन एकर खरीप कांद्याचे क्षेत्र (Area Under Kharif Onion) असते. सन २०१९ पूर्वी ते सपाट वाफा पद्धतीने त्याची रोपवाटिका (Onion Nursery) तयार करायचे. मात्र अतिवृष्टी (Heavy Rain) व मातीतील मर व अन्य बुरशीजन्य रोगांमुळे (Fungal Disease) रोपवाटिका बाधित होऊन मोठे नुकसान व्हायचे. त्यामुळे आगामी कांदा लागवडी पूर्ण होत नसायच्या. रोपवाटिका तयार केल्यानंतर १५ दिवसांनंतर नुकसान दिसून यायचे. त्यामुळे दुबार रोपवाटिका तयार करण्याची वेळ यायची. बियाणे, त्यावरील खर्च, मशागत, श्रम वाया जात. त्यानंतर दीपक यांनी तज्ज्ञांचे सल्ले घेतले. सुधारित रोपवाटिका तंत्रातील बाबी आत्मसात केल्या. त्यातूनच यशस्वी कांदा उत्पादनातील निम्मी लढाई दीपक यांनी जिंकली. तीन- चार वर्षांत अपेक्षित बदल फळे दिसून आली आहेत.

...असे वापरले सुधारित रोपवाटिका तंत्र

--पीक फेरपालट पद्धतीने कामकाज करून त्या क्षेत्रावर उन्हाळ्यात नांगरणी

-रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर टाळून अधिकाधिक सेंद्रिय- जैविक पद्धतीचा वापर करण्यावर भर दिला. तीन गायी असल्याने शेणखत उपलब्ध होते. तणनाशकाचा वापर करीत नाहीत.

-रोपवाटिकेसाठी उंच भागावरील हलकी ते मध्यम ज्यामध्ये पाण्याचा निचरा होईल अशा जमिनीची निवड केली. लव्हाळा, हरळी आदी तणे असणारी तसेच पाणी साचणारी सखल जमीन टाळली जाते.

Onion
Onion : देशात कांदा लागवडीत घट

-प्रामुख्याने गादीवाफ्यावर (बेड) रोपे निर्मिती सुरू केली. त्याची रुंदी एक मीटर व उंची सहा इंचांच्या वरती ठेवली. बेडच्या वापरामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांभोवती पाणी फार काळ साचत नसल्याने रोपे कुजत नाहीत. पुनर्लागवडीवेळी रोपे सहज उपटून काडी जाड व लवकर तयार होते.

-माती एकसारखी बारीक करून ती व्यवस्थितरीत्या सपाट करून चार दिवस आधी ‘कॉपर’युक्त बुरशनाशकाची धुरळणी. १० गुंठ्यांसाठी शेणखत ५० किलो, निंबोळी पेंड २५ किलो व ट्रायकोडर्मा एक किलो, ह्युमिक ॲसिड व मायकोरायझा समप्रमाणात मिसळून पेरणीपूर्व समप्रमाणात मात्रा.

-प्रति सात किलो बियाण्यास २५ ते ३० ग्रॅम ट्रायकोडर्मा वापर

-बीजप्रक्रियेनंतर बियाणे सुकवून बेडच्या सरीत उभे राहून समप्रमाणात पेरणी

Onion
Onion : कांद्राप्रश्‍नी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

-बियाणे मातीत मिसळण्यासाठी पंजाच्या साह्याने हलवून ते मातीआड.

-बुरशींचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठ दिवसांच्या अंतराने द्रव स्वरूपातील ट्रायकोडर्माची फवारणी

-उगवण झाल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने नीम ऑइल फवारणी

-रोपे तयार होण्याच्या अवस्थेत फुलकिडे आणि शेंडा जळणे यांच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीडनाशकांचा वापर.

-रोपे सुमारे ४५ दिवसांची झाल्यानंतर ट्रायकोडर्माची आळवणी व पुनर्लागवड.

प्रवाही सिंचन टाळून रेनपाइपचा वापर :

१० गुंठे क्षेत्रावर सुमारे १० ते ११ किलो बियाणे वापरले जाते. त्यातून घरच्या दोन ते अडीच एकरांसाठी

रोपांची उपलब्धता होते. प्रवाही पद्धतीने सिंचन न करता पहिले सिंचन बियाणे मातीआड केल्यानंतर

रेनपाइपद्वारे होते. वाफसा व पावसाचा अंदाज स्थिती तपासून पुढील सिंचन त्याद्वारे होते.

त्यातून रोपांना समप्रमाणात पाणी मिळते.

झालेले फायदे :

-अतिवृष्टी झाली तरी जास्तीत जास्त एक ते दोन टक्केच रोपांचे नुकसान होण्याची शक्यता.

-मररोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रोपांची संख्या टिकली.

-रोपे सशक्त, पांढऱ्या मुळ्यांचे अधिक प्रमाण व प्रतिकारशक्ती अधिक असल्याने वाढीसाठी पोषक.

-दुबार रोपवाटिका तयार करण्याचे संकट टळले. त्यामुळे खर्च, श्रम व वेळेची बचत.

-पुनर्लागवड करताना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी

-काढणीस आलेल्या कांद्याची गुणवत्ता ए ग्रेडची.

-पूर्वी एकरी आठ ते साडेआठ टन उत्पादन मिळायचे. आता ते १०, १२ ते १४ टनांपर्यंत पोहोचले आहे.

अभ्यासूवृत्तीमुळे यश

कांदा उत्पादनात प्रयोगशील वृत्ती हे दीपक यांचे वेगळेपण आहेच. शिवाय मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे ते भागधारक असून, त्यांच्या शास्त्रीय शिफारशीनुसार व्यवस्थापन करतात. ‘एनएचआरडीएफ’चे माजी अतिरिक्त संचालक डॉ. सतीश भोंडे, कृषी विभाग आदींचेही

मार्गदर्शन त्यांना मिळते. चर्चासत्रे, कृषी प्रदर्शनांना भेटी, निफाड येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रातून जैविक निविष्ठा खरेदी अशीही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. माती सुपीकता जपण्यावरही भर दिला आहे. त्यासाठी दरवर्षी हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धैंचा पेरणी करून तो शेतात गाडला जातो. त्या क्षेत्रातच कांदा पुनर्लागवड केली जाते. रब्बीत बीजोत्पादनही करतात.

दीपक उशीर ७५८८५१५७३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com