Edible Oil : उद्योजकतेचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ झाला यशस्वी

नाशिक येथील गायत्री शुक्लेश्‍वर वर्पे यांनी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख तयार करण्याचे व ‘ड्रीम प्रोजेक्ट’चे ध्येय ठेवले. मेहनत, प्रशिक्षण, उत्तम निर्मिती व गुणवत्तेशी तडजोड नाही हे गुण बाळगले. त्याआधारे लाकडी घाण्यावर आधारित विविध खाद्यतेल उत्पादनांची निर्मिती केली. वर्षाला ५० लाखांपर्यंत उलाढाल करीत ‘किचनधारा’ ब्रॅंडद्वारे त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
Edible Oil
Edible OilAgrowon

लाकडी घाण्यावर (Lakdi Ghana) आधारित विविध खाद्यतेल उत्पादनांच्या निर्मितीत (Edible Oil Production) उद्योजिका म्हणून नाशिक येथील गायत्री शुक्लेश्‍वर वर्पे यांनी नाव मिळवले आहे. माहेरी सात्रळ (जि. नगर) येथे वडील तुकाराम कडू यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे प्रथम वर्ष कला शाखेपर्यंतच गायत्री यांचं शिक्षण होऊ शकले. तिघे भाऊ व्यवसाय करायचे. आपणही उद्योजक व्हावं अशी गायत्री यांची पूर्वीपासूनची इच्छा होती. वरवंडी (जि.नगर) येथील शुक्लेश्‍वर वर्पे यांच्यासोबत त्या विवाहबद्ध झाल्या. पती इलेक्ट्रिक इंजिनिअर असून, नाशिक येथे त्यांचा व्यवसाय आहे. गायत्रीही घरची जबाबदारी सांभाळून त्यांना मदत करू लागल्या. मुलगी दहावीत गेली की उद्योजक होण्याचा मनातला ‘ड्रीम प्रोजेक्ट सुरू करायचा असे त्यांनी पक्के केले होते. त्यानुसार पावले टाकायला सुरुवात केली. पतीनेही मोलाची साथ देताना पंखात बळ भरले.

Edible Oil
Edible Oil : खाद्यतेल कंपन्यांचं मापात पाप बंद होणार?

व्यवसायाचा श्रीगणेशा

व्यवसायाचा शोध घेताना खादी व ग्रामोद्योग संस्थेच्या जिल्हा कार्यालयाची मदत झाली. त्या वेळी लाकडी घाण्यापासून तेलनिर्मितीचा पर्याय चांगला वाटला. ग्राहकांकडून या तेलास मागणीही होती. त्यानुसार २०१६ मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण पूर्ण केले. सन २०१७ मध्ये बँकेचे अर्थसाह्य घेऊन लाकडी घाणा खरेदी केला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे व्यवसाय नोंदणी केली. प्रकल्पासाठी कायमस्वरूपी जागा म्हणून पतीच्या मदतीने नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरात गाळा खरेदी केला. उद्योजक म्हणून स्वतःतील कौशल्य, क्षमता अजमावण्यासाठी कच्चा माल खरेदी, उत्पादन, व्यवसाय नोंदी, मालाची विक्री अशा सर्व जबाबदाऱ्यांवर गायत्री यांनी पूर्ण लक्ष दिले. एकेक प्रकारचे तेल उत्पादन सुरू झाले. आयुर्वेदाचाही अभ्यास केला.

आजचा तेलनिर्मिती उद्योग-

-उत्पादनांची मागणी वाढल्यानंतर सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे प्रकल्प स्थलांतरित.

- ‘गायत्री फूड्स अँड एनर्जी प्रॉडक्ट्स’ असे कंपनीचे नाव. ‘किचनधारा’ हा उत्पादनाचा ब्रँड.

-शेंगदाणा, मोहरी, जवस, खोबरे, बदाम, काळे व पांढरे तीळ, करडई आदी

८ प्रकारची खाद्यतेले उत्पादने. शेवगा बियांपासून ‘मोरिंगा ऑइल’ बनविण्याचे प्रयत्न.

-१००,२५०, ५०० मिलिपासून १ व ५ लिटर आकर्षक पॅकिंग व ब्रॅण्डिंग.

-प्रति लिटर दर ३३० रुपयांपासून ते १६००, ३५०० रुपयांपर्यंत.

-मुंबई- मंत्रालय परिसरातील ‘महाखादी’ प्रदर्शनात उत्पादनांचे अनावरण.

Edible Oil
Edible Oil : खाद्यतेल, डाळींमध्ये आत्मनिर्भरतेचा मार्ग

-सध्या दैनंदिन २० हजार रुपयांपर्यंत, तर वार्षिक सुमारे ५० लाखांच्या उलाढालीपर्यंत टप्पा.

-सध्या २५ लाख रुपयांचा अद्ययावत प्रकल्प माळेगाव (सिन्नर) येथे प्रगतिपथावर. वाटचालीत खादी ग्रामोद्योगची अनुदानाची मोठी मदत.

--वर्षभर हंगामनिहाय मागणी अभ्यासून उत्पादन निर्मिती.

-खर्च वजा जाता १० ते १५ टक्के नफा.

-तेल काढणीनंतर उपलब्ध पेंडीला जनावरांच्या खाद्यासाठी चांगली मागणी. परिसरातील गोठेधारकांना संपर्क करून त्याची मागणी. त्यातून दुय्यम नफा मिळतो.

-प्रयोगशाळेत नमुने तपासून तेलाची विक्री.

-स्वतंत्र संकेतस्थळ, सोशल मीडिया व राज्यस्तरीय ग्रामोद्योग

प्रदर्शनांद्वारे मार्केटिंग.

-‘फूड सेफ्टी’, शॉप ॲक्टचे परवाने.

-प्रगती, उन्नती व वैभव या मुलांचीही होते मोलाची साथ.

कष्टांची तयारी

सुमारे ८५ हजार रुपयांची गुंतवणूक सुरुवातीला केली. पहिल्या दिवशी १६ किलो शेंगदाणे घेऊन घेऊन उत्पादन सुरू केले. आज तीन घाणे आहेत. कच्च्या मालाची गुणवत्ता चांगली असेल, तर उतारा चांगला मिळतो त्यादृष्टीने त्यावर लक्ष केंद्रित केले. कधी कामगार गैरहजर असल्यास एकाचवेळी दोन घाणे चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले. विक्री व्यवस्था सुरू करताना अनेक कष्ट घ्यावे लागले.

गुणवत्तेला प्राधान्य देत बाजारपेठ

सुरुवातीला आठवड्यातून एक- दोन ग्राहक घ्यायचे. त्यांना ‘कोल्ड प्रेस’ पद्धतीची उत्पादन पद्धती समजून सांगितली. उत्पादनाचे तांत्रिक निकष पाळले. गुणवत्तेशी तडजोड केली नाही. कुठलीही भेसळ नसल्याने व पारदर्शकतेमुळे ग्राहकांचा विश्‍वास बसत गेला. तेलाच्या गुणवत्तेची हमी देताना ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्‍नाचं समाधान केलं. घाण्यावर तयार केलेले तेल अधिक नैसर्गिक, चवीला ताजे व आरोग्यदायी असल्याचे पटवून दिले. तेलाची गुणवत्ता, गंध व चव त्यांच्या पसंतीस उतरली. सुरुवातीला विक्रीसाठी कर्मचारी नियुक्त केले, मात्र अपेक्षित परिणाम न मिळाल्याने गायत्री यांनी सर्व भार उचलत व्यावसायिक आखणी करून बाजारपेठ मिळवली. नैसर्गिक घटकांपासून उत्पादित तेलाचे गुणधर्म, उपयुक्तता व वापर पद्धती सांगण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप बनविले. या सर्व प्रयत्नांमधून ग्राहक कायमस्वरूपी टिकवले. आज नाशिक येथे ‘आउटलेट’ आहे. पुणे, मुंबई येथे थेट ग्राहक तयार झाले आहेत. यासह औरंगाबाद, नाशिक येथील प्रदर्शनांतूनही उत्पादनांची प्रसिद्धी होते.

स्वप्न सत्यात उतरले

आज माहेरची आणि सासरकडील मंडळींनाही गायत्री ‘उद्योजिका’ झाल्याचा अभिमान वाटतो. सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या वतीने तसेच सकाळ माध्यम समूहाच्या वतीने ‘वूमन्स आयकॉन’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.

संपर्क : गायत्री वर्पे, ७७६७८१०२१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com