शेतकऱ्यांना संघटित करून साधली दुग्धव्यवसायात प्रगती

नागपूर येथील मंगेश खुमाजी पवनीकर यांनी केवळ ५० हजार रूपयांत दुग्धव्यवसाय सुरू केला. सातत्य, विस्तारीकरण, खर्चाचे योग्य नियोजन, टीमवर्क, गुणवत्ता, शेतकऱ्यांचे संघटन आदी वैशिष्ट्ये जपली. त्यातून आज दररोज सातहजार ते आठहजार लिटर दूध संकलन, विविध प्रक्रिया पदार्थ निर्मिती व ग्राहकांची विश्‍वासवृध्दी करून आर्थिक प्रगती करणे पवनीकर कुटुंबाला शक्य झाले आहे.
Dairy Industry
Dairy IndustryAgrowon

नागपूर येथील मंगेश पवनीकर यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायात २००२ च्या सुमारास पदविका घेतली. त्यानंतर आघाडीच्या तीन कंपन्यांसोबत वेगवेगळ्या विभागात १४ वर्षे नोकरीचा भक्कम अनुभव घेतला. नोकरी सुरू असतानाचा स्वतःचा दुग्धव्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयातून अधिक्षक पदावरून निवृत्त झालेले वडील खुमजी यांच्यासह, आई प्रमिला, पत्नी रूपाली यांची मोठी मदत झाली. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रदिप भोयर व पशुचिकित्सक डॉ.अशोक दोड यांचे मार्गदर्शन मिळाले.

चुकांमधून शिकवण

सुरवातीला पाच लिटर दूध खरेदी करून प्लॅस्टिक पिशवीतून विक्री सुरू केली. परंतु व्यवसायाचा अनुभव नसल्याने ग्राहकांना विकलेले दूध खराब होण्याचे प्रकार वाढले. ग्राहक पुन्हा खरेदीला फिरकेनासे झाले. काहीतरी चुकत असल्याची जाणीव झाली. कमी गुंतवणुकीत व्यवसाय करायचा हे सुरवातीपासून पक्के असल्याने जुना फ्रिज खरेदी केला. दूध संकलन आणि विक्री दहा लिटरपर्यंत वाढविली. शिल्लक दुधापासून दही, चक्‍का, श्रीखंड असे पदार्थ तयार करण्यावर भर दिला. ग्राहकांना ते पसंत पडू लागले. यातूनच उत्साह वाढत गेला.

Dairy Industry
Dairy IndustryAgrowon

दूध पाईश्चरायजरेझन व पुढील प्रक्रियेची तयारी.

व्यवसायवृद्धी

दूध तापविण्यासाठी १०० लिटरचा गंज व २० हजार रुपयांत जुना कॅटल खरेदी केला. दूध संकलन १५० लिटरपर्यंत पोचले. नागपूर व लगतच्या जिल्ह्यांतून दूध खरेदीसाठी अनेक कंपन्यांची मोठी स्पर्धा आहे. ती पाहता मंगेश यांनी अन्य कंपन्यांच्या दरापेक्षा एक रुपया अधिक देण्याचे जाहीर केले. मग दुग्धोत्पादक दूध पुरवण्यासाठी पुढे आले. आज वर्धा, नागपूर जिल्हा, कुही तालुका, मध्यप्रदेशातील मुलताई आदी मिळून एकूण सातहजार ते आठ हजार लिटर दूध संकलित होते. फॅट, एसएनएफ या आधारे दर निश्‍चीत होतो. गाईच्या दुधाला ३५ रुपये (६ फॅट व ९ एसएनएफ) तर म्हशीच्या दुधाला ४५ रुपये प्रति लिटर दर दिला जातो.

मजबूत विक्रीव्यवस्था

नागपूरच्या मध्यवर्ती भागात दूध प्रक्रिया प्लांट व ‘विक्री काऊंटर’ आहे. येथून ५०० लिटरची दररोज किरकोळ विक्री होते. शिवाय सुमारे सहा भागांत ‘फ्रॅचायजी’ तत्त्वावर आऊटलेटस सुरु केली आहेत. यांच्यासह डेअरी व हॉटेल व्यावसायिक मिळून दररोज पाचहजार ते सहा हजार लिटर दुधाचा पुरवठा होतो. सुमारे साडेतीन हजार लिटर दुधापासून पदार्थ तयार केले जातात.

Dairy Industry
Dairy IndustryAgrowon

प्रक्रियाजन्य पदार्थ

पदार्थ विक्री

  • -दही- महिन्याला कढी दही (किलोला ५० रू.) आणि मलई दही (८० रू.) मिळून ३० हजार लिटरची विक्री.

  • -खवा- एक किलो खव्यासाठी पाच लिटर म्हशीच्या दुधाची गरज

  • राहते. गाईचे दूध असल्यास हे प्रमाण सहा लिटर राहते. महिन्याला सरासरी एक हजार किलो विक्री.

  • -रसगुल्ले- दोन हजार नगांची दररोज निर्मिती. पाच रुपये प्रति नग दर.

  • -पनीर- १५० ते २०० किलो दररोज निर्मिती. किरकोळ ३०० रुपये तर २५० रुपये प्रति किलो घाऊक विक्रीचा दर.

  • -श्रीखंड- दररोज १०० किलो निर्मिती. १०० लिटर दह्यपासून ४० किलो श्रीखंड मिळते. किरकोळ दर २२० रुपये तर घाऊक दर १६० रु.

Dairy Industry
Dairy IndustryAgrowon

दूध वितरण व्हॅन

दुग्धव्यवसायातील बाबी

१) पाच ते सहा गावांमध्ये ५०० लिटर क्षमतेचे बल्क कुलर ठेवले आहेत. एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. त्याद्वारे दूध संकलन व त्यातील घटक मोजणी होते. हे दूध कंपनीच्या वाहनाने नागपुरात आणले जाते. दर दहा दिवसांनी पेमेंट देण्यात येते. सुमारे ७०० शेतकरी व्यवसायासोबत जुळले आहेत.

२) तीन लाख कॅलरी निर्माण करणारा हॉट वॉटर जनरेटर प्रकल्पस्थळी बसविला आहे. बाजारात

तो पाच लाख रुपयांना मिळतो. परंतु मंगेश यांनी आपल्या गरजेनुसार अवघ्या सव्वा दोन लाखांत तो तयार केला. प्रकल्प ठिकाणची पाईश्‍चरायझर यंत्रणाही जुनी खरेदी करून ती व्यवस्थित करण्यात आली. १२ बाय दहा फूट आकाराचे दहा टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज आहे. दही तयार करण्यासाठी इनक्‍युबेशन रूमची गरज राहते. ती देखील कमी खर्चांत तयार केली आहे. अशा प्रकारे शक्‍य तिथे खर्चात बचत करून यंत्रणा उभारणे व कंपनीचा फायदा वाढविण्यावर भर दिला आहे.

३) शेतकऱ्यांकडून अधिक प्रमाणात दूध पुरवठा व्हावा, त्यांना जनावरे घेणे सोयीचे व्हावे यासाठी

२० हजार रुपयांची मदत दिली जाते. त्याचा परतावा दुधाच्या हिशोबातून पुढे होतो. या योजनेमुळे जनावरांची संख्या ४५ ते ५० ने वाढली आहेत.

४) व्यवसायाच्या माध्यमातून सुमारे २८ व्यक्‍तींना रोजगार मिळाला आहे. ‘प्रमुख’ नावाने प्रकल्प उभारण्यात आला होता. परंतु हा ट्रेडमार्क आधीच नोंदणीकृत असल्याने प्रकर नावाने ट्रेडमार्क आणि लोगो नोंदणी झाली आहे.

Dairy Industry
Dairy IndustryAgrowon

मंगेश व रूपाली हे पवनीकर दांपत्य.

मॉडेल फार्म

व्यवसायवृध्दीसाठी दुग्धोत्पादकांना प्रशिक्षित करणेही गरजेचे असते. त्यासाठी खिंडसी येथे मॉडेल डेअरी फार्म उभारला आहे. त्याठिकाणी प्रशिक्षण सोय केली जाणार आहे. सध्या २५ म्हशी आणि ९ गाई आहेत. ३०० लिटर दूधसंकलन दररोज होते. पशुखाद्य तयार करण्याचा कारखाना या ठिकाणी आहे. सवलतीच्या दरात त्याचा पुरवठा होतो. शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर औषधे पुरविण्यावर भर आहे.

संपर्क- मंगेश पवनीकर- ८४२१९९७६६०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com