लाकडी तेलघाणा उद्योगातून उभे राहतेय आशादायक चित्र

शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख. मात्र नजीकच्या काळात अनेक शेतकरी नगदी पिकांसोबतच कृषिपूरक व्यवसायांवरही लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामध्ये रेशीम व्यवसाय आघाडीवर आहे. शुभमसारखे उच्चशिक्षित युवकही लाकडी तेलघाण्यासारख्या छोट्या शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये उतरत आहेत. अशाच प्रकारे छोटे मोठे प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास यवतमाळमध्येही नक्कीच आशादायक चित्र उभे राहील.
Lakadi Tel Ghana Business
Lakadi Tel Ghana BusinessAgrowon

देशाची खाद्यतेलाची गरज (India's Need Of Edible Oil) पूर्ण करण्यासाठी विदेशातून तेल आयात (Edible Oil Import) करावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होते. तेल उत्पादनामध्ये (Oil Production) देश स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. सोबतच यांत्रिक तेलघाण्याच्या (Tel Ghana Machinery) निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे त्यातील पोषक घटकांची हानी होते. ते टाळण्यासाठी अलीकडे लाकडी तेलघाण्याकडेही (Lakadi Tel Ghana Business) लोक वळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही काळात सुमारे १५ लाकडी तेलघाणे सुरू झाले. यामुळे तेलबिया लागवडीलाही चांगली चालना मिळाली असून, रोजगारनिर्मितीही होत आहे. येथील शुभम दिघाडे या युवकानेही लाकडी तेलघाणा व्यवसायाच्या बळावर आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल केली आहे.

Lakadi Tel Ghana Business
Palm Oil Export: पामतेल निर्यात धोरणात सातत्य राखण्याची गरज

दिघाडे कुटुंबीय हे बाभूळगाव तालुक्यातील गवंडी खेर्डा येथील मूळ रहिवासी. गावी शेती असली तरी वडील शासकीय सेवेमध्ये कार्यरत असल्यामुळे यवतमाळ येथेच स्थायिक झाले. शुभमने प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमधून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणादरम्यान ‘कोल्ड प्रेस’ तंत्रज्ञानाची माहिती मिळाली.

यांत्रिक पद्धतीने तेल काढताना तापमान ४०० ते ७०० अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. या वाढलेल्या उष्णतेमुळे अनेक पोषक घटक नष्ट होतात. मात्र कोल्ड प्रेस प्रक्रियेत ४० अंशांपेक्षा कमी तापमानात तेल काढले जाते. यामुळे तेलातील ओलेईक ॲसिडसारखी अनेक महत्त्वाची मेदाम्ले, ॲण्टिऑक्सिडेण्ड घटक, जीवनसत्त्व इ, जीवनसत्त्व के, जीवनसत्त्व सी इ. नष्ट होत नाही. असे तेल आरोग्यासाठी चांगले असते. अशा तेलाचा वापर करण्याचा आग्रह धरला जातो. हृदयरोगापासून बचावासाठी उच्च तापमानामध्ये तयार झालेले तेल टाळण्याचा सल्ला वैद्यकीय शाखेतील तज्ज्ञ देतात. परिणामी, लाकडी तेलघाण्यावर गाळलेल्या तेलाला मागणी वाढत आहे. ही बाब जाणून शुभमने या व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित केले. या व्यवसायातील बारकावे जाणून घेण्यासाठी नाशिक येथील खादी ग्रामोद्योग मंडळ आणि त्यानंतर मुंबई येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले.

Lakadi Tel Ghana Business
Edible Oil : खाद्यतेल, डाळींमध्ये आत्मनिर्भरतेचा मार्ग

व्यवसायासाठी आवश्यक पंधरा किलो प्रति तास क्रशिंग क्षमतेच्या लाकडी तेलघाण्याची किंमत अडीच लाख रुपये होती. ते गुजरात येथून खरेदी केले. २०१८ मध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. वाघापूर रोडस्थित राधाकृष्णनगरीमध्ये घराजवळच्या भागात ५०० चौरस फूट शेड उभारण्यात आले. एकूण त्यावर दोन लाख रुपयांचा खर्च झाला.

आपला व्यवसाय करण्याचे ध्येय असल्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणामध्ये सहा महिन्यांची इंटर्नशिप केली. त्यातून व्यवसायाचा चांगला अनुभव मिळाला. तसेच त्यातून मिळालेले मानधन (सुमारे एक लाख रु.) साठवून ठेवले. त्यात कुटुंबीयांकडून अडीच लाख रुपये घेत व्यवसाय तातडीने सुरू केले. त्यानंतर व्यवसायातून उभ्या राहत असलेल्या रकमेतून शेड वाढवणे व कच्चा खरेदी यात अधिक रक्कम गुंतवत गेलो. वीजजोडणी, कच्चा माल, खाद्य परवाना यावर दीड लाख रुपये याप्रमाणे प्रकल्पाचा एकूण खर्च सहा लाख रुपयांच्या घरात गेला.

हळूहळू बाजारपेठ तयार केली

कृषी विभागानेही शुभमच्या उपक्रमाची दखल घेत मुख्य रस्त्यावरील कृषी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या काही गाळ्यांपैकी एक गाळा उत्पादित तेलाच्या विक्रीसाठी भाडेकराराने उपलब्ध करून दिला. वर्तमानपत्रातून माहिती पत्रके पोहोचवत लाकडी तेलघाणा व त्यापासून उत्पादित तेलाच्या आरोग्यासाठी असलेल्या महत्त्वाचा प्रसार करण्यात आला. त्यातून अनेक ग्राहक जोडले गेले. २०१९ मध्ये कोरोना काळात टाळेबंदीमुळे काही प्रमाणात अडचणी आल्या, तरी खाद्य व्यवसायांवर तुलनेने कमी बंधने होती. ग्राहकांना तेलाची विक्री घरपोच देत मार्ग काढला. त्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांचा फायदा झाला. कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढली. त्याचाही फायदा व्यवसायवृद्धीसाठी झाला. उद्योगातून चांगले उत्पन्न सुरू झाले. अवघ्या दीड वर्षातच ‘ब्रेक इव्हन पॉइंट’ पार केला. खऱ्या अर्थाने नफा मिळू लागला. या नफ्यातून कुटुंबीयांकडून घेतलेले पैसेही परत केले.

...असे आहे गणित

-एक किलो तेल उत्पादनासाठी अडीच ते तीन किलो शेंगदाणे लागतात. सध्या शेंगदाण्याचा दर १०० रुपये प्रति किलोपर्यंत आहे. चांगल्या प्रीच्या शेंगदाण्यांमध्ये ४० टक्के तेल राहते. म्हणजेच साधारणतः १०० किलो शेंगदाण्यापासून चाळीस किलोपर्यंत तेल मिळते. उर्वरित ६० टक्के ढेपही पौष्टिक असते. तिची पशुखाद्यासाठी ३० ते ३५ रुपये प्रति किलो या प्रमाणे विक्री केली जाते. महिन्याला दोन ते तीन टन ढेप विकली जाते. शेंगदाण्यासोबतच तीळ आणि जवस या तेलाला देखील ग्राहकांची मागणी वाढत आहे.

- गाळून किंवा काढून देण्याचा दर प्रति किलो ३० रुपये असा ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी स्वतःसाठीही आवश्यकतेनुसार तेल काढून घेऊ शकतात. अशा प्रकारे काढलेले तेल सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते.

कच्च्या मालाची खरेदी थेट शेतकऱ्यांकडून

तेल गाळपासाठी शेंगदाणा, तीळ, जवस अशा तेलबियांची खरेदी थेट शेतकऱ्यांकडून केली जाते. तेलबियांचा दर्जा पाहून दर निश्‍चित केले जातात. चांगल्या प्रतिसाठी बोनस म्हणून अतिरिक्त रक्कमही दिली जाते. सध्या प्रक्रियेसाठी आवश्यक करडई, सूर्यफूल, खोबरे इ. बाजारातून खरेदी करतात. विशेषतः भुईमूग शेंगांचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून शेंगांची खरेदी होते. त्यामुळे चांगल्या प्रतीचा शेंगदाणा प्रक्रियाकामी उपलब्ध होत असल्याचे शुभमने सांगितले.

तेलबियांची सातत्यपूर्ण उपलब्धतेसाठी काही शेतकरी बचतगटांशीही संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून आजवर २५० ते ३०० शेतकरी या व्यवसायाशी जोडलेले आहेत. भविष्यात व्यवसाय वाढवतानाच पाच हजार शेतकऱ्यांशी तेलबिया खरेदी संदर्भात करार करण्याचे नियोजन करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात शेंगदाणा, तीळ या तेलबियांचे उत्पादन होते. मात्र जवस उत्पादकांची संख्या कमी आहे. येत्या काळात जवस, करडई उत्पादनालाही प्रोत्साहन देण्याचा मानस असल्याचे शुभमने सांगितले.

...असा आहे तेलाचा दर (रुपये प्रति किलो)

- शेंगदाणा : २६०

- तीळ : ४५०

- जवस :४२०

- करडई : ३५०

- सूर्यफूल : ३५०

- खोबरेल तेल : ४५०

--

शुभम दिघाडे, ८८८८९९९६२२

(नेचर्स फॅक्ट्री, लाकडी घाणा तेल, दुकान २, तालुका फळरोप वाटिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, गार्डन रोड, यवतमाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com