भरडधान्यः मूल्यवर्धित उत्पादनांना मिळवली बाजारपेठ

उरुळी कांचन (पुणे) येथील महेश लोंढे यांनी अत्यंत जिद्दीने, चिकाटीने व अभ्यासातून विविध भरडधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला. आरोग्यदायी व पौष्टिक अशा या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना देशभरातील आश्‍वासक बाजारपेठ तयार करून दिली. आज वार्षिक उलाढाल २५ लाखांपर्यंत पोहोचवून येत्या काळात ती ३५ लाख रुपयांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
Millet
MilletAgrowon

मूळचे पंढरपूरचे असलेले व कृषी पदवीधर असलेले महेश लोंढे पुणे शहरानजीक उरुळी कांचन येथे स्थायिक झाले. त्यांच्या कुटुंबात सर्व शिक्षक. मात्र महेश यांनी शेतीवर आधारित उद्योग करण्याचे नक्की केले. ते सांगतात की, त्यासाठी प्रेरणादायी ठरली ती माझी आई. तिला मधुमेह होता. दर महिन्याला उपचारासाठी पाच हजार रुपये खर्च व्हायचा. मधुमेह नैसर्गिकरीत्या कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल यावर अभ्यास सुरु केला. जागतिक पातळीवर ५३७ दशलक्ष रुग्ण हे २० ते ७९ या वयोगटातील असल्याचे आढळले. मधुमेह आटोक्यात आणायचा तर जेवढे महत्त्व व्यायाम व पथ्याला दिले जाते तेवढेच महत्त्व पौष्टिक आहाराला दिले पाहिजे हे लक्षात आले. त्या दृष्टीने भरडधान्ये अत्यंत महत्त्वाची असल्याचे लक्षात आले. मग लोकांच्या आहारात ती कशा पद्धतीने आणता येतील याचा विचार सुरू झाला. इथेच उद्योगाची पायाभरणी झाली.

प्रशिक्षण व उद्योगाची उभारणी

महेश यांनी मग पुढचे पाऊल म्हणून हैदराबाद येथील भारतीय भरडधान्‍य संशोधन केंद्रात २०१८ मध्ये चार दिवसांचे प्रशिक्षण घेतले. उत्पादनांची यादी तयार केली. प्रक्रिया उद्योगासाठी राहत्या घरीच जवळपास एक हजार चौरस फूट जागा उपलब्ध केली. पिठाची चक्की, वजनकाटा व आवश्‍यक यंत्रसामग्री घेतली. उत्पादनांसाठी लागणारी काही धान्ये घरच्या शेतात पिकवण्यास सुरुवात केली. काही शेतकऱ्यांकडून घेतली जाऊ लागली. ज्वारी, बाजरी, नाचणी व राळ अशी धान्ये एकत्रित करून लाडू बनविले जाऊ लागले. श्रेणी वाढवत नाचणीचे लाडू, बिस्किटे, ज्वारी, बाजरी यांची बिस्किटे, पोहे, नूडल्स, रवा शेवया, उपमा रवा, इडली रवा, चिवडा, पीठ आदी उत्पादने तयार होऊ लागली.

कंपनी आली उदयाला

महेश यांनी ॲग्रो झी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड असे आपल्या कंपनीचे नामकरण केले आहे. तसा हा स्टार्ट अपच आहे. महेश सांगतात की मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिरिक्त चरबी, हृदयविकार, कुपोषण विशेषतः महिलांमधील ॲनिमिया अशा समस्या आज ज्वलंत आहेत. अन्नातील पौष्टिक घटकांबाबत अद्याप पुरेसे प्रबोधन होणे गरजेचे आहे. अशा बाबींचा अभ्यास करून कंपनीचे धोरण ठरवले. राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर विविध आरोग्य संस्थांचा अभ्यास केला.

उद्योगाचा विस्तार

महेश म्हणाले, की कंपनीचा संस्थापक होण्यापूर्वी सामाजिक संस्थांसोबत काम करण्याचा अनुभव गाठीशी होता. त्यातून समाजाची अन्नाच्या विविधतेची गरज माहिती होती. आदिवासी पाड्यात काम करीत असताना तेथे घेण्यात येणारे पारंपरिक नाचणी पीक लक्षात आले. उद्योग उभा कसा करायचे म्हटले, की त्यासाठी आवश्‍यक ज्ञान संकलन, माहिती, संशोधन महत्त्वाचे असल्याचे लक्षात आले. भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेत प्रशिक्षण घेतेवेळी उद्योग उभा करण्यासाठी आत्मविश्‍वास तयार झाला. तिथले अधिकारी आणि भरडधान्य उद्योगात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या व्यक्तींशी संपर्क वाढवला. त्या वेळी लक्षात आले की अनेक धान्ये भारताच्या उत्तर भागापेक्षा दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवली व खाल्ली जातात. यांत्रिकीकरणापासून ते विविध पदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेपर्यंत अनेक उद्योग दक्षिणेत आढळतात. त्यांच्याशी संपर्क वाढवले. महाराष्ट्रात देखील आदिवासी भागात (नाशिक, नगर, अकोले) अनेक भरडधान्ये घेतली जातात. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. बाजरीही चांगल्या प्रमाणात घेतली जाते. त्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी या बाबी अनुकूल ठरल्या. सुरुवातीला विक्री करताना काही अडचणी आल्या होत्या. कमी प्रतिसाद होता. मात्र ग्राहकांना महत्त्व पटवून देऊ लागले तशी परिस्थिती बदलू लागली. सध्या ‘मिलेट नाऊ’ या ब्रँडने उत्पादने बाजारात उपलब्ध केली आहेत. चालू वर्षी दिवाळीत जवळपास ५०० किलो लाडू, नवरात्रात दोन टन भगर व वरईचे पीठ विकले. लाडू, बिस्कीट, पोहे, नूडल्स, इडली, उपमा, रवा अशा विविध प्रकारची ७० हून अधिक उत्पादने १० टनांहून अधिक विकली. मिलेट तांदूळ २० ते २२ टन विकला आहे.

बाजारपेठेतील मागणी

महेश सांगतात, की बाजारपेठांमध्ये ज्वारी, सावा, बाजरी, नाचणी, भगर, राळ वरई, कोडो, सामा या धान्यांना चांगली मागणी आहे. त्यांच्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित अशी बेकरी उत्पादनांपासून ते पिठापर्यंत सर्व उत्पादने तयार केली जातात. त्यांना पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई आदी मोठ्या शहरांतून मागणी आहे. मधुमेह व लठ्ठपणा असलेल्यांकडून ही मागणी अधिक आहे. मात्र तेवढ्या प्रमाणात त्याचा पुरवठा होत नाही. त्यासाठी तो वाढवण्यावर काम सुरू आहे. भरडधान्यांपासून जास्त उत्पादन व उत्पन्न कशा पद्धतीने घेता येईल याबाबत शेतकऱ्यांसोबतही काम सुरू आहे. त्यांच्याकडील मालालाही योग्य दर दिला.

उत्पादनांची वैशिष्ट्ये

बहुतांश उत्पादने ग्राहकांपर्यंत २०० ग्रॅमपासून ते १ किलो पॅकिंगपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे ग्राहकांच्या गरजेनुसार हव्या त्या मापात ती उपलब्ध होतात. त्यांचे पॅकेजिंग ‘व्हॅक्यूम फ्री’ असल्याने टिकवण क्षमता सहा महिने ते एक वर्षांपर्यंत आहे. भरडधान्ये नैसर्गिकरित्या म्हणजे रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर न करता पिकवली जातात. ती ‘ग्लुटेन फ्री’ असून, त्यांच्यात अण्टिऑक्सिडेण्टचे प्रमाण चांगले आहे. शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणे, हृदय विकारावर नियंत्रण, चरबीचे प्रमाण कमी करणे, महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणे, रक्तदाब संतुलित ठेवणे आदी फायदे मिळतात. महेश सांगतात, की उत्पादनांचे ‘बायोफोर्टिफिकेशन’ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून नैसर्गिकरीत्या झिंक, कॅल्शिअम, लोह उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. काही उत्पादनांसाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांच्यासोबत दोन वर्षांचा करार केला आहे. पुणे, बारामती, हडपसर, फलटण अशा ठिकाणी प्रदर्शने भरवली. सोशल मीडियामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप, वेब पोर्टल प्लॅटफॉर्म उभारले. त्यातून ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.

समस्या व गुंतवणूक

व्यवसाय उभा करताना बियाणे, कच्चा माल ते ग्राहक उपलब्ध होण्यापर्यंत अडचणी येत होत्या. प्रथम प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रे उपलब्ध नव्हती. भरडधान्यांची टिकवण क्षमता कमी होती. या समस्या कशा पद्धतीने कमी करता येतील यावर काही दिवस काम केले. उद्योग उभा करण्यासाठी सुमारे पाच लाखांपर्यंत गुंतवणूक झाली. दोन लाखांपर्यंत खर्च हा प्रक्रिया यंत्रांसाठी होता. राष्ट्रीय कृषी योजना आणि केंद्रीय समाज कल्याण मंत्रालयाकडून ‘ॲग्री बिझनेस प्लॅन’ संबंधित वीस व्यक्तीची निवड केली. त्यात महेश यांच्या कंपनीचा समावेश झाला. शासनाकडून अनुक्रमे अडीच लाख आणि पाच लाख रुपयांचं ‘स्टार्ट अप’ भांडवल मिळाले. ‘यूथ एड’ व मुकुल माधव फाउंडेशनकडून २५ हजार रुपये मिळाले.

■ महेश लोंढे ८७९९९९६२५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com