Ratn Festival
Ratn FestivalAgrowon

उत्पादक ते थेट ग्राहक साखळी निर्मितीला चालना

रत्नागिरी येथे १९ ते २१ मे या कालावधीत रत्न कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन झाले. असे महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांना ताजा व प्रक्रियायुक्त शेतमाल, शोभिवंत वस्तू आदींच्या विक्रीसाठी थेट ग्राहक बाजारपेठ उपलब्ध होत असते. केवळ आर्थिक उलाढाल नव्हे तर पुढील काळासाठीही ग्राहकांचे ‘नेटवर्क’ सक्षम करण्याची ती संधी असते.

जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन मंडळ आणि जिल्हा परिषद पशू विभाग यांच्यामार्फत संयुक्तपणे पाच वर्षांपासून जिल्हास्तरावर कृषी महोत्सव व पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन होत आहे. पूर्वी दोन्ही उपक्रम स्वतंत्र घेतले जायचे. मात्र तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आरिफ शहा यांनी ते एकत्र घेण्याचा प्रस्ताव ठेवला. कोरोना संकट येण्याआधी म्हणजे सुमारे तीन वर्षांपूर्वी आयोजित महोत्सवात त्याचा प्रत्य आला. शेतकरी व बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीतून सुमारे पंधरा लाखांहून अधिक उलाढाल झाली. शेतकऱ्यांना एकमेकांशी संवाद साधता आला. आंबा बागायतदारांसाठी बायर-सेलर्स बैठकीचे आयोजन झाले. याच धर्तीवर कोरोनानंतर यंदा १९ ते २१ मे या काळात या रत्न कृषी महोत्सवाचे आयोजन झाले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानेही नुकताच सुवर्ण पालवी महोत्सव घेतला. त्यातील स्टॉलधारकही रत्नागिरीतील या महोत्सवात सहभागी झाले.

विविध उत्पादनांचे १२० स्टॉल

यंदाच्या महोत्सवात उमेद अंतर्गत सहभागी महिला बचत गटांचे पदार्थ, भाताच्या विविध जाती, नाचणी, कोकण मेवा, शोभिवंत वस्तू, वस्त्रे, रोपवाटिका, शेतीपयोगी यंत्रे, मत्स्य विषयक योजनांची माहिती देणारे स्टॉल यासह गायी-म्हशी, कोंबड्या, शेळ्यांचे प्रदर्शनात सादरीकरण झाले आहे. आंबा बागायदारांसाठी वीस स्टॉल राखीव ठेवण्यात आले आहेत.

कोकण मेव्यांचा महात्मा शेतकरी गट

रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे महात्मा बळी राजा शेतकरी गट कार्यरत आहे. हापूस, पायरी, मालगीस, रायवळ जातींच्या आंब्यासह आंबा- फणस पोळी, नाचणी लाडू, सफेद व पांढरे जाम, आवळा, करवंद, पापड, फेणी, रातांबा यासारखी वीसहून अधिक उत्पादनांची विक्री या गटामार्फत केली जाते. गटातील वीस सभासदांकडील उत्पादनांना अशा प्रकारे बाजारपेठ मिळत आहे. गेल्या वर्षी चिपळूण येथील कृषी महोत्सवातही त्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले होते. गटाचे अध्यक्ष विलास गोरीवले यांची हापूस आंब्याची अडीचशे कलमे आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक पेटी ते विकतात. सरासरी १२०० ते १५०० रुपये प्रति पेटी दर मिळतो. कृषी महोत्सवासह थेट ग्राहकांकडे आंबा पाठविण्यावर त्यांचा भर असतो. यंदाच्या रत्न कृषी महोत्सवात पायरी आंबा २५० रुपये, तर हापूस ३०० रुपये प्रति डझन दराने त्यांची विक्री सुरू आहे. पहिल्याच दिवशी दहा डझन आंबा त्यांनी विकला. यापूर्वीही कृषी विभागाच्या रत्नागिरी येथील महोत्सवात १५ ते २० हजार रुपयांची, तर जुलै २०२१ मध्ये पोमेंडी येथील रानभाजी महोत्सवात दहा हजार रुपयांची भाजी विकली. यात टाकळा, करटोली, काकवी, कुडा, भारंगी अशा सुमारे २४ भाज्या त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

संपर्क- विलास गोरीवले, ९६७३४८११५३

करवंटीपासून शोभिवंत वस्तू

रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील जीवन ज्योती हा महिलांचा बचत गट उमेदअंतर्गत स्थापन झाला. सन २०१९ मध्ये जिंदाल कंपनीने त्यांना टाकाऊपासून टिकावू वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले. त्याअंतर्गत ‘कॅन्डल होल्डर’, अगरबत्ती स्टॅण्ड, फ्लॉवर पॉट, चमचे, बाऊल्स, पेन स्टॅण्ड आदी विविध वस्तू महिलांनी बनविल्या. त्यासाठी लागणाऱ्या करवंट्या वाटद गावासह परिसरातील गावातील बागायतदार, व्यापारी यांच्याकडून घेतल्या. सुंदर कलाकुसर केलेल्या या वस्तूंना ग्राहक शोधण्याची वेळ आली नाही. जिंदाल कंपनीने जयगड येथे उभारलेल्या सिद्धिविनायक मंदिरात विक्री दालन उभारले आहे. तेथे या वस्तू ठेवल्या आहेत. गणपती, दिवाळी, उन्हाळी सुट्टीत जयगडला येणारे पर्यटक या वस्तू खरेदी करतात. किमान दहा हजार रुपयांची विक्री होते. गटाच्या समन्वयक दीक्षा निवळकर म्हणाल्या की महोत्सवही आमच्यासाठी चांगली संधी असते. आतापर्यंत जिल्ह्यात गणपतीपुळे येथे सरस प्रदर्शनातही आम्ही विक्री केली होती. दरवर्षी ऑर्डर्स आणि ग्राहक वाढत आहेत.

संपर्क ः दीक्षा निवळकर, ९८३४२३५९९१

शेळीपालनातून कमाई

सात वर्षांपूर्वी सोमेश्‍वर येथील शाहीद हुशये या तरुणाने शेळीपालनाला आरंभ केला. हैदराबाद येथून बोकड आणि बंगळूरहून शेळी आणली. आज त्यांच्याकडे १५ हून अधिक शेळ्या आहेत. हैदराबादी बोकडाला रत्नागिरीतील हवामान चांगले मानवत असून, वाढही चांगली असल्याचे शाहीद सांगतात. वर्षाला बोकड विक्रीतून सुमारे तीन लाख रुपयांची त्यांची कमाई आहे. सध्या त्यांच्याकडे एक लाख रुपये किंमत येऊ शकेल असा बोकड तयार आहे. इतरांकडील बोकड घेऊन त्यांची विक्री करण्याचा शाहीद यांचा व्यवसाय आहे. चांगल्या प्रकारे खाद्य नियोजन केल्यास वजन वाढते आणि किंमतही अधिक मिळते हे लक्षात घेऊन वर्षभराचे नियोजन केले जाते.

शाहीद हुशये, ९९२३६८१२९३

विकेल ते पिकेल या शासनाच्या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या; या मालाला बाजारपेठ देण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन होते. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात परिसंवादांमधून शेतकऱ्यांना माहितीही दिली जाते.
सुनंद कुऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com