Poultry Business : संकटांशी झुंजत पोल्ट्री व्यवसायातून समृद्धी

विविध संकटांशी झुंज देत कोलगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील मनोहर ठिकार यांनी गावरान व ब्रॉयलर कोंबडीपालन व्यवसाय (पोल्ट्री) पंचवीस वर्षांपासून केवळ टिकवला नाही. तर धैर्य, जोखीम, सातत्य व उत्कृष्ट व्यवस्थापनातून विस्तार व काळानुरूप बदल करीत आर्थिक समृद्धी प्राप्त केली. कोकणातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख झाली आहे.
Poultry
Poultry Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप-सावंतवाडी मार्गावर कोलगाव आहे. सावंतवाडी शहरापासून नजीक असल्याने गावची विकासात घोडदौड आहे. भात, नारळ, सुपारी,नाचणी, मिरची, भाजीपाला पिके (Vegetable Crop) अशी विविधता गावात दिसते. याच गावातील मनोहर ठिकार यांनी पंचवीस वर्षांच्या दीर्घ अनुभवातून आदर्श पोल्ट्री उद्योजक (Poultry Business) म्हणून नाव मिळवले आहे. सन १९९५ च्या सुमारास मनोहर यांच्या वडिलांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे शेती व कुटुंबाची जबाबदारी मनोहर यांच्यावर आली. शिकायची प्रचंड इच्छा होती. परंतु कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे ते शेतीकडे वळले.

Poultry
Poultry Feed : कोंबडी खाद्यात ‘गवार मील' चा वापर

कुक्कुटपालन व्यवसायाची निवड

त्या काळात कोलगावमध्ये बारा ते तेरा वाड्या होत्या. बहुतांशी लोक चिकन खरेदीसाठी सावंतवाडी शहरात जायचे. गावातच चिकन उपलब्ध करून देण्याची हीच मोठी संधी असल्याचे मनोहर यांना जाणवले. पण जिल्ह्यात त्या वेळी प्रशिक्षणाची सोय नव्हती. मग कोल्हापूर येथे अंडी उबवण प्रक्रियेपासून ते पक्षी तयार करण्यापर्यंत एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. सोबत विपणन कौशल्याचे धडेही अवगत केले.

व्यवसायातील अनुभव

ब्रॉयलर कोंबड्याकडे ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेतला. व्यवसायासाठी आवश्यक भांडवल जमा करताना चांगलीच दमछाक झाली. परंतु उपलब्ध पुंजीतून या बाबी केल्या. दोनशे पिलांपासून व्यवसायाला प्रारंभ केला. पिलांच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. व्यवसायातील चढउतार, बारकावे, खाचखळगे यांचा अनुभव येत होता. उन्हाळ्यासाठी बांबू आणि नारळाच्या झावळ्यांचा वापर करून शेड उभारले. अशाप्रकारे तीन शेड उभ्या राहिल्या. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडील शेडसही भाडेतत्त्वावर घेतल्या आणि पूर्ण क्षमतेने मनोहर व्यवसायात उतरले.

Poultry
Poultry Deworming : कोंबड्यातील जंत निर्मूलन कसे कराल ?

स्वतःचे विक्री केंद्र

अधिक नफा मिळवायचा तर स्वतःचे चिकन सेंटर सुरू करण्याचा सल्ला मार्गदर्शकाने दिला. त्यानुसार घरालगतच नारळाच्या फांद्यांची शेड तयार करून केंद्रही सुरू केले. ग्राहकांना ताजे चिकन मिळू लागल्यामुळे नफ्यात वाढ होऊ लागली. वर्षभरात आज चार हजार किलोपर्यंत चिकनची विक्री होते.

संकटांशी झुंज

व्यवसायात जम बसला होता. चार हजार पक्षांची बॅच शेडमध्ये होती. अशात २००४ मध्ये बर्ड फ्लूचे संकट आले. त्यात दहा ते वीस रुपये प्रति किलो दराने कोंबड्यांची विक्री करावी लागली. मोठे आर्थिक नुकसान झाले. हा अनुभव अतिशय धक्कादायक, वेदनादायी होता. व्यवसायाची घडी क्षणार्धात विस्कटून जावी अशी स्थिती आली. पण मनोहर डगमगले नाहीत. संकटांशी झुंजून मार्गक्रमण करायचे असा निर्धार केला. या संकटाचे मळभ दूर होताच पुन्हा नव्या ताकदीनिशी वाटचाल सुरू ठेवली. सन २००६ मध्येही बर्ड फ्लूचे संकट आले. मात्र मागील अनुभव पाठीशी असल्यामुळे मोठा परिणाम झाला नाही. संसर्ग कमी होताना पिलांचे दर कमी होते. त्या वेळी पुन्हा पक्ष्यांची खरेदी केली. ते पक्षी वाढवून विक्री करेपर्यंत सावट पूर्ण दूर झाले होते. नुकसानीची भरपाई ज्यांचे पक्के शेड होते त्यांनाच मिळाली. त्यामुळे चार पाच शेड्‌स असूनही मनोहर यांना एकाच शेडच्या भरपाईवर समाधान मानावे लागले. चिकन गुनियाच्या साथीत केवळ नावाच्या साधर्म्यामुळे आर्थिक फटका सहन केला.

आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात

कुक्कुटपालनात २५ वर्षांचा अनुभव. ब्रॉयलर व गावरान पक्षी (अंड्यांसाठी) यांचे संगोपन.

वर्षाला ब्रॉयलरच्या प्रति चार हजार पक्ष्यांच्या चार बॅचेस.

वर्षभरात सरासरी २० हजार पक्ष्यांची विक्री.

दोन शेतकऱ्यांसोबत करार पद्धतीने उत्पादन.

ब्रॉयलर व गावरान पक्ष्यांसाठी (कावेरी) प्रत्येकी दोन हजार पक्ष्यांची दोन शेड्‌स.

सुमारे २०० गावरान पक्षी. दररोज सुमारे ५० ते १०० अंडी उपलब्ध.

ब्रॉयलर पक्ष्यांचे दर सातत्याने बदलतात. प्रति किलो ६०, ७० रुपयांपासून १०० रुपयांपुढे.

उत्पादन खर्च प्रति पक्षी किमान ७० ते ८० रुपये. तो कमी करून नफा वाढवण्याचा प्रयत्न.

ब्रॉयलर पक्ष्यांच्या वर्षाला होणाऱ्या बॅचेसवर वार्षिक नफा ठरतो. एखादी बॅच फेल गेल्यास अन्य बॅचेस आधार देतात.

बॉक्स पॅकिंगद्वारे अंडी विक्रीचा प्रयोग

मुंबईत मॉलमध्ये बॉक्समध्ये अंडी पाहण्यात आली. सहा अंड्यांच्या बॉक्सची किंमत १३० रुपये होती. मनोहर यांनीही हा प्रयोग करण्याचे ठरविले.

अलीकडील काही महिन्यांपासून १२ व सहा अंडी असे बॉक्स पॅकिंग. गोवा मार्केटला पुरवठा.

प्रति अंडे १० रुपये दर मिळतो. जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग असावा.

मनोहर सांगतात की खुल्या पद्धतीत अंडे ८ रुपयांना विकले जाते. पण त्याची विक्री जास्त फायदेशीर वाटते.

मनोहर ठिकार ९४२२०९०९०६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com