Fig Spread : पुरंदरच्या ‘जीआय’ मानांकित अंजिराचे ‘स्प्रेड’ बाजारात दाखल

पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील पुरंदर हायलँड्‌स शेतकरी उत्पादक कंपनीने अंजीर स्प्रेड हे नावीन्यपूर्ण उत्पादन बाजारात दाखल केले आहे. स्थानिक बाजारपेठ मिळवण्यासह परदेशी बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून जर्मनी, जपान आदी देशांत त्याचे नमुने पाठवले आहेत. सोबतच अंजीर ज्यूस व शुगर फ्री जांभूळ स्प्रेड देखील बाजारपेठेत दाखल करण्यासाठी कंपनी सरसावली आहे.
Fig Spread
Fig SpreadAgrowon

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका अंजीर (Fig) फळासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी, प्रक्रियादार व बाजारपेठ व्यावसायिक यांनी एकत्र येत पुरंदर हायलँड्‌स शेतकरी उत्पादक कंपनी (Purandar Highland Farmer Producer Company) स्थापन केली. या वाटचालीत सुरुवातीला २०१९ मध्ये गट व २०२१ मध्ये कंपनीत रूपांतर झाले. कंपनीच्या माध्यमातून अंजिराचे निर्यातक्षम उत्पादन (Export Quality Fig Production) आणि देशांतर्गत बाजारपेठेत विक्री सुरू केली. अंजीर हे संवेदनशील आणि टिकवण कालावधी कमी असलेले फळ आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रिया (Processing) करून नावीन्यपूर्ण अंजीर स्प्रेड (Fig Spread) हे उत्पादन बाजारपेठेत सादर करण्याचे कंपनीने उद्दिष्ट ठेवले. त्यानुसार अलीकडेच ते बाजारपेठेत सादरही केले आहे.

Fig Spread
Fig : पुरंदरच्या अंजिराचं मूळ अफगाणिस्तानात

प्रक्रिया उद्योग

कंपनीचे अध्यक्ष राहुल उरसळ, १४ संचालक आदींनी पाठबळ दिले. संचालकांपैकी अतुल कडलग

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे प्रक्रियेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तालुक्यातील जाधववाडी येथे साडेसहा हजार चौरसफुटांचे शेड भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. येथे संपूर्ण ‘हायजेनिक’, नियंत्रित हवामान स्थितीत अंजिरावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी आवश्‍यक ‘मशिनरी’ व यंत्रणा उभारली आहे. यासाठी सुमारे ६५ लाखांचा खर्च आला. तर २५ लाख रुपयांचे कर्ज बँक ऑफ इंडियाकडून घेण्यात आले. सध्या प्रति बॅच एक टन अंजीर स्प्रेड उत्पादनाची क्षमता आहे.

उत्पादनाच्या चाचण्या

उत्पादनाची चव, टिकवण क्षमता, त्यातील पोषक पदार्थ यांच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत चाचण्या घेण्यात आल्या. विविध हॉटेल्स, गृहिणी, लहान मुले आदी ग्राहकांचा स्वादासाठी ‘फीडबॅक’ घेण्यात आला. पुणे शहरातील दोन ठिकाणी तसेच ‘ॲमेझॉन प्लॅटफॉर्म’ वर उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. विविध आवश्‍यक प्रमाणपत्रेही घेण्यात आली आहेत.

Fig Spread
ब्रॅंडेड अंजीर, सीताफळाला मिळ लागली देशांतर्गत बाजारपेठ

दर्जा व आकर्षक पॅकिंग

या स्प्रेडमध्ये अंजीर पल्पचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७५ टक्क्यांपर्यंत आहे. यात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह्‌ज, ॲडीटीव्हज वा रंगद्रव्ये यांचा समावेश नाही. त्यामुळे नैसर्गिक चव देणारे हे उत्पादन असल्याचे कंपनीचे संचालक सांगतात. काचेच्या २१० आणि ३० ग्रॅमच्या बाटलीचे आकर्षक पॅकिंग तयार करण्यात आले आहे. पुरंदर हायलँड्‌स व सुपर फीग असे दोन ब्रॅंडनेम तयार करण्यात आले आहेत. छोटे पॅकिंग तारांकित हॉटेल्समध्ये ब्रेकफास्टसाठी टेबलवर सादर करण्यासाठी उपयोगी ठरणारे आहेत. अशा पॅकिंगला चांगली मागणी असल्याचे कंपनीचे संचालक सांगतात. २१० ग्रॅमसाठी २२५ रुपये तर ३० ग्रॅम बॉटलसाठी ५० रुपये अशी किंमत आहे.

अंजीर ज्यूस व जांभूळ स्प्रेड

कंपनीने अंजीर ज्यूस या नव्या उत्पादनावरही लक्ष केंद्रित केले आहे. प्रयोग म्हणून १०० लिटर ज्यूस तयार करण्यात आला असून चव, टिकवण क्षमता आदी विविध पातळ्यांवर चाचण्या सुरू आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतात प्रथमच अशा प्रकारचा ज्यूस उपलब्ध होणार आहे. केवळ एक ते दोन उत्पादनांवर अवलंबून राहता येणार नाही. वर्षभर प्रकल्प सुरू राहिला पाहिजे या हेतूने विविध फळांवर प्रक्रियेचे प्रयत्न सुरू आहेत. जांभूळ स्प्रेड हे ‘शुगर फ्री’ असलेले नावीन्यपूर्ण उत्पादनही बाजारात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कोकणातून ‘फ्रोझन जांभूळ पल्प’ खरेदी करण्यात आला आहे शीतगृहात ठेवून त्यावर प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक पातळीवर उत्पादन यशस्वी झाले आहे. मधुमेह असणाऱ्या नागरिकांसाठी त्याचा विशेष फायदा होणार आहे. आंबा पल्पवरही काम सुरू आहे.

बाजारपेठांची तयारी

पुरंदर अंजिराला ‘जीआय’ मिळाला आहे. त्यामुळेच सुपर फीग नावाने त्याची विक्री करण्यात येत आहे. जर्मनीत अलीकडेच ताज्या फळांची सुमारे ५० किलोपर्यंत विक्री करण्यात कंपनीला यश आले आहे. कंपनीचे सागर धुमाळ, संपत खेडेकर, समील इंगळे आदींनी कोलकता, हैदराबाद, दिल्ली, बंगळूर, कोची, भोपाळ, इंदूर आदी ठिकाणी बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बंगळूर येथील एका कंपनीने स्वतःच्या ब्रॅंडने विक्री करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. एक टन खरेदीचे या कंपनीचे प्रयत्न आहेत.

परदेशी बाजारपेठ हेच लक्ष

प्रक्रियेसाठी लागणारी अंजिरे मीठा बहरात (फेब्रुवारी ते मे) कंपनीच्या खरेदी केंद्रावर संकलित केली जातात. साल काढून ‘स्लाइस फ्रोझन’ प्रक्रिया केली जाते. त्या मागणीनुसार प्रक्रिया करून स्प्रेड बनविले जात आहे., याच प्रमाणे सीताफळ आणि पेरूची खरेदी केली जाते. खरेदीच्या वेळी किमान आठ दिवस एकच दर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जागेवर चांगले दर मिळतात. कंपनीने मुख्यतः परदेशी बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रित करून तशी वाटचाल सुरू ठेवली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील काही निवडक भारतीयांनाही अंजीर स्प्रेड उत्पादन पाठवले आहे. परिसरातील अनेक लोकांना या उद्योगामुळे रोजगार मिळाला आहे.

शेतकरी गट, उत्पादक कंपनी आणि आता प्रक्रिया उद्योग अशा विविध टप्प्यांवरून आमची वाटचाल पाच वर्षांपासून सुरू आहे. भविष्यात नावीन्यपूर्ण प्रक्रिया उत्पादनांची बास्केट्‌स बाजारपेठेत सादर करण्याचे उद्दिष्ट आहे.

रोहन उरसळ

अध्यक्ष, ‘‘पुरंदर हायलँड्‌स’

संपर्क

रोहन उरसळ- ९८८१००१११९

अतुल कडलग - ९१३०७४१७०७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com