फळे- भाजीपाला पावडरींचा सात्त्विक ब्रॅण्ड

सातारा जिल्ह्यातील मालगाव येथील सात्त्विक नॅचरल फार्मिग शेतकरी गटाने फळे व भाजीपाला निर्जलीकरण प्रकल्प उभारून तो यशस्वी केला आहे. गेल्या दोन वर्षांत ५५ लाख ते एक कोटी रुपये उलाढाल गटाने केली आहे. सेंद्रिय प्रमाणीकरण करताना ताजा शेतमाल विक्री, तेलघाणा असे उपक्रम राबवून गटाने आपली आर्थिक ताकद मजबूत केली आहे.
फळे- भाजीपाला पावडरींचा सात्त्विक ब्रॅण्ड
Vegetable Agrowon

सातारा जिल्ह्यात फलटण रस्त्यावर सातारा शहरापासून १८ किलोमीटरवर मालगाव आहे. मुबलक पाणी असल्यामुळे उसाचे क्षेत्र (Sugarcane Acreage) अधिक आहे. विक्रम कदम हे गावातले प्रयत्नशील शेतकरी. सन २०१४ मध्ये त्यांच्या पुढाकारातून गावातील समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यातून सुमारे १५ शेतकरी सदस्य असलेला भैरवनाथ शेतकरी बचत गट (Farmer Self Group) स्थापना झाला. त्यातून कारले पीक घेतले. या काळात कारल्यावर निर्यातबंदी (Bitter Gourd Export) आली. मात्र स्थानिक बाजारात निर्यातक्षम मालाची विक्री करून चांगले उत्पन्न मिळवले.

सात्त्विक शेतकरी गटाची स्थापना

‘आत्मा’ अंतर्गत २०१५-१६ मध्ये याच सदस्यांनी सात्त्विक नॅचरल फार्मिग शेतकरी गटाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून विक्रम कदम तर उमेश साळुंखे सचिव झाले. अधिक कदम, शंकर कदम, सुनील कदम, सचिन कदम आदी सदस्यपदी निवडण्यात आले. सुरवातीपासून सेंद्रिय शेती करण्यावर भर राहिला. कृषी विभागाच्या सहकार्यातून अवजारे बँकही सुरू केली. गटशेतीच्या माध्यमातून विविध प्रकारचा भाजीपालाही पिकवला जात होता. काहीवेळा उत्पादन अतिरिक्त व्हायचे. साठवणुकीची सुविधा नव्हती. नाशवंत मालाची काहीतरी सोय करणे गरजेचे झाले होते. अशावेळी शेतमालावर प्रक्रिया करणे हा पर्याय समोर दिसत होता. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गटातील सदस्यांनी प्रक्रिया विषयाची प्रशिक्षणे घेतली. फळे व भाजीपाला निर्जलीकरण प्रकल्प उभारायचे ठरवले. कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांचे मार्गदर्शन घेतले. अवजारे बँकेतून मिळालेले उत्पन्न व कर्ज यातून सौर ऊर्जेवर आधारित सुकवणी यंत्र (सोलर ड्रायर), पल्व्हरायजर, पॅकिंग आदी ४२ लाख रुपये किमतीची साधने खरेदी करून व्यवसाय सुरू केला. मालगावला भाडेतत्वावर जागा घेत ७० बाय ३० फुटाचे शेड उभारले.

प्रक्रियेस सुरवात

गावपरिसरात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होते. ती सुकवणे, शिजवणे व पावडर निर्मिती ही वेळखाऊ प्रक्रिया होती. त्यावर उपाय म्हणून ‘सोलर ड्रायर’ चा वापर करून सुकवणे व पल्व्हरायजरचा वापर करून पावडर निर्मिती सुरू केली. यातून वेळेची बचत होऊन नुकसान कमी झाले. सध्या गटाच्या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे ३० टन हळद पावडर केली जाते. आले दरात चार- पाच वर्षांपासून मोठी घसरण झाल्याने त्यातील नफाही घटला आहे. अशावेळी पावडर तयार करण्यातून यावर मार्ग निघाला.

असा आहे प्रकल्प

सात्त्विक गटाकडून विविध प्रकारच्या भाज्या, आंबा, स्ट्रॅाबेरी, लिंबू आदी फळे तसेच आले, हळद यांच्यावर निर्जलीकरण प्रक्रिया केली जाते. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असून त्याची व कैरीची पावडर तयार करण्याचे काम सुरू आहे. दिवसाला सुमारे एक टन प्रक्रिया अशी प्रकल्पाची क्षमता आहे. दररोज साधारण प्रत्येक घटकावर सातशे ते आठशे किलो या प्रमाणात प्रक्रिया केली जात आहे.

लाकडी तेलघाणा

गटाने तीन वर्षापूर्वी लाकडी तेलघाणाही सुरू केला आहे. गटातील सदस्य तसेच गावातील अन्य शेतकऱ्यांकडील शेंगांपासून तेल काढून दिले जाते. शेतकऱ्यांना बियाणे दिले जाते व भुईमूग त्यांच्याकडून खरेदी केला जातो. दैनंदिन २५ ते ३० लिटर तेलनिर्मिती होते.

‘मार्केटिंग’ व विक्री

गटाने स्थानिक कृषी प्रदर्शने, व्हॉटस ॲप ग्रुप आदींच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांचा प्रचार केला. गटाकडून अजिंक्यतारा सात्त्विक ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनीही यापूर्वी स्थापन करण्यात आली आहे. आकर्षक पॅकिंगद्वारे सात्त्विक ब्रॅण्डने उत्पादनांची विक्री होते. मुंबई, पुणे येथे गटाने ग्राहक तयार केले आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेकजण नोकरी, शिक्षणासाठी परदेशात जातात. तेथे भारतीय भाजीपाला पुरेशा प्रमाणात मिळतोच असे नाही. अशावेळी प्रक्रिया केलेल्या पावडरींचा त्यांना उपयोग होतो. शिवाय केटरिंग, हॉटेल व्यावसायिक आदींनाही पावडरी पुरवल्या जातात. कंपनीने मागील वर्षी सुमारे ५५ लाख तर यंदा एक कोटी १० लाख रुपयांची उलाढाल केली आहे. सर्व प्रकारच्या कडधान्यांना मोड आणून त्यांची विक्रीही केली जाते. उद्योगातून गटास साधारणपणे दहा ते १५ टक्के नफा शिल्लक राहतो.

सेंद्रिय शेतीवर भर

गटात सुमारे १४३ सभासद आहेत. सातारा, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांसह रत्नागिरी भागातील शेतकरीही सभासद झाले आहेत. सेंद्रिय शेती तसेच प्रक्रिया व्यवसायाची प्रशिक्षणे गटाच्या माध्यमातून दिली जातात. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची काळजी शेतकरी घेतात. ‘आत्मा’ च्या माध्यमातून ‘पीजीएस’ प्रमाणीकरण केले आहे.

विक्रम कदम- ९७६६५५०५९१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com