
सां गली जिल्ह्यातील आटपाडी हा दुष्काळी (Drought) तालुका आहे. अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंजून शेतीत प्रयोगशीलता दाखवली आहे. अलीकडे मात्र टेंभू योजनेच्या माध्यमातून (Tembhu Water Scheme) कृष्णा नदीचे पाणी फिरू लागले आहे. त्यामुळे तालुक्याची दुष्काळी ओळख पुसली जाऊ लागली आहे. बागायती क्षेत्र वाढू लागले आहे. आटपाडी म्हणजे माणदेशी अशीही ओळख असून, डाळिंबाचा (Pomegranate) तालुका अशी ओळख शेतकऱ्यांनी तयार निर्माण केली आहे. दर्जेदार उत्पादनातून शेतकरी निर्यातीवरही (Pomegranate Export) भर देऊ लागला आहे.
अनिल यांची डाळिंब शेती
भिवघाट ते आटपाडी या राज्यमार्गापासून पूर्वेला अवघ्या पाच किलोमीटरवर आटपाडी तालुक्यातील बनपुरी गाव वसले आहे. हे गावदेखील दुष्काळाच्या छायेतून सुटले नव्हते. जिकडे पाहावे तिकडे माळरानच दिसत होते अशी स्थिती होती. गावातील अनिल दत्तात्रेय महाजन यांनी डाळिंब शेतीत आपली ओळख तयार केली आहे.
सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव. मात्र बनपुरी येथील आत्या व तिचे पती महालिंग सदाशिव टिंगरे यांनी त्यांना लहानपणीच दत्तक घेतले. त्यामुळे अनिल येथेच राहून शेतीचा सारा व्याप सांभाळतात. मुळात अनिल यांना शेतीची होतीच. वडील डाळिंब, आले ही पिके घेत होते. त्यामुळे अनिल यांनी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकून घेतल्या होत्या. महालिंग यांनीही त्यांना प्रोत्साहन दिलेच शिवाय बीए.पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी हक्काने पुढाकारही घेतला. एकूण शेती १८ एकर आहे. पैकी डाळिंब साडेतीन एकर (भगवा वाण) आहे. ऊस दोन एकर तर आले दीड एकर आहे.
डाळिंब शेतीतील प्रयत्न
डाळिंब हे अनिल यांचे मुख्य पीक आहे. सुरुवातीला बनपुरी येथील शेतीत वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आले पिकाची लागवड केली. दोन वर्षे हे पीक घेतले. हळूहळू हंगामी पिकांचा अभ्यास सुरू केला. त्यातून ज्ञानवृद्धी झाली. वडिलांबरोबर चुलते विश्वनाथ यांनीही डाळिंब पिकाचा अभ्यास करून लागवड करण्याचा सल्ला दिला. त्यादृष्टीने नियोजन सुरू झाले. सन २०१३ मध्ये दुष्काळ पडला होता. गावात छावण्या उभारल्या होत्या. शिल्लक पाण्यातून डाळिंबाची बाग साधण्याचा प्रयत्न सुरू होता.
लागवड करून अडीच वर्षे झाली होती. निसर्गाच्या संकटाबरोबर त्या वेळी अजून एक संकट आले. ते म्हणजे अपघात झाला. दोन महिने घरीच थांबावे लागले. त्यामुळे नव्या बागेकडे दुर्लक्ष झाले. त्यातच पाऊस, बदलल्या वातावरणामुळे बाग काढावी लागली. पण अपयशावर मात करण्यासाठी पुन्हा जोमाने उभारून सन २०१७ च्या दरम्यान नव्याने लागवड करण्याचे धाडस केले. अनिल सांगतात, की डाळिंब पीक माझ्यासाठी नवे होते.
पण घरच्या मंडळींबरोबर मित्र अक्षय, सागर यांनी मदत केली. अनिल सांगतात की पूर्वीची विहीर होती. त्यावरच शेती पिकवली जायची. पण पाण्याची कमतरता भासणार हे लक्षात घेऊन अजून एक विहीर घेतली. त्याला मुबलक पाणी लागले. त्यातच शेताजवळूनच टेंभूचे पाणी पुढे गेले आहे. त्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी कधी कमी झाली नाही. वडील आणि मामांच्या (आत्याचे मालक) यांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही याची काळजी घेतली आहे. जिद्द, कष्ट, सातत्य कायम ठेवले. संकटे आली म्हणून रडत बसायचे नाही असा निर्धार केला.
जागेवरच मार्केट
एकरी १२ ते १३ टनांपर्यंत उत्पादन मिळते. तीनशे ग्रॅमच्या पुढे फळाचे वजन असते. ‘ए ग्रेड’च्या मालाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे व्यापारी थेट बांधावर येऊनच खरेदी करतात. अलीकडील दोन वर्षांत मध्यस्थांमार्फत युरोपलाही फळ पाठवले. त्यास किलोला १२७ रुपयांपर्यंत दर मिळाला. स्थानिक बाजारपेठेत प्रति किलो ९६ रुपयांपासून १०० ते १२० रुपयांपर्यंत दर सातत्याने मिळाला आहे. एकरी उत्पादन खर्च दोन ते अडीच लाख रुपये येतो.
बागेचे सुधारित व्यवस्थापन
अनिल यांनी बागेचे व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला. सुरुवातीपासून ते मृग बहरच घेतात.
अलीकडील वर्षांत वातावरणातील बदलामुळे बहर धोक्यात येत आहे असे लक्षात आले. त्यामुळे दीड एकरात यंदा आंबिया बहर धरण्याचे नियोजन केले आहे.
जून ते जुलै अखेरीपर्यंत छाटणीचे नियोजन होते.
बेड चाचरून घेतले जातात. सूत्रकृमीची समस्या आहे. त्यामुळे बाग विश्रांतीच्या काळात असताना मुळांवर असलेल्या गाठी रोटरच्या साह्याने काढून टाकल्या जातात. यामध्ये जमीन खालीवर होते. भुसभुशीत होते.
प्रति शंभर झाडांमागे एक ट्रेलर शेणखताचा वापर होतो.
छाटणीवेळी झाडाला इजा झाली असल्याने बोर्डो, तसेच कीटकनाशक व बुरशीनाशक यांची फवारणी केली जाते. त्यानंतर पानगळ केली जाते.
छाटणीनंतर पाच दिवसांनी पाणी सोडले जाते.
ऑक्टोबर ते पुढील दोन महिने म्हणजे काढणीच्या तीन महिने आधी जैविक स्लरीचा प्रति झाड एक लिटर याप्रमाणे वापर होतो. मजुरांकरवी ती झाडाला दिली जाते. तीस किलो शेण, प्रत्येकी अडीच किलो बेसन व काळा गूळ यांचे मिश्रण तयार करून ही स्लरी तयार केली जाते. सात दिवस मिश्रण ढवळत ठेवले जाते. या स्लरीच्या वापरामुळे मुळी कार्यरत राहते. फळाची चकाकी आणि आकार वाढीस मदत होते.
प्रति झाड २५ ते ३० किलो माल ठेवायचे नियोजन असते. प्रति झाड सुमारे सुमारे ९० फळे असतात.
ऑक्टोबर ते पुढे काढणीपर्यंत चार महिन्यांच्या काळात बागेवर प्लॅस्टिकचे आच्छादन केले जाते. त्यामुळे ‘सन बर्निंग’ होत नाही. बागेचे धुके, दव यांच्यापासून संरक्षण होते. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
अनिल महाजन, ९०६७५२८५२३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.