Grape Production : सोलापुरच्या राकेश काटकर यांनी ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षांचा तयार केला ‘माई फार्म’ ब्रॅण्ड

खुपसंगी (जि. सोलापूर) येथील राकेश काटकर यांनी पुणे येथील उद्योग सांभाळत ५० एकरांत विविध वाणांच्या ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षांची शेती केली आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनासह आधुनिक तंत्रज्ञान यंत्रणा उभारण्याबरोबर पुणे येथे माई फार्म ब्रॅण्डने थेट विक्री व्यवस्थाही उभारली आहे.
Grape Production
Grape ProductionAgrowon

Grape Rate : सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १२ किलोमीटरवर खुपसंगी व पंढरपुरातील करकंब येथे मिळून राकेश काटकर यांची एकूण ८० एकर शेती आहे. त्यात सर्वाधिक ५० एकरांवर आठ प्रकारच्या वाणांची द्राक्ष बाग आहेत. सुमारे २० एकर ऊस आहे.

राकेश यांनी ‘मेकॅनिकल इंजिनियरिंग’मध्ये पदविका घेतली. बीबीए, तसेच ‘एचआर’ व ‘ऑपरेशन’ विषयातून एमबीएच्या पदव्या घेतल्या.

सध्या ते ‘व्हेंडर मॅनेज इन्व्हेंटरी’ विषयातून ‘पीएचडी’ करीत आहेत. पुण्यात त्यांचा टेक्स्टाइल व पॅकेजिंग संबंधी यंत्रसामग्री निर्मिती उद्योग आहे. तो सांभाळण्याबरोबर ते सोलापूर जिल्ह्यातील

दोन्ही भागांकडील शेतीही तितक्याच उमेदीने पाहतात. भाऊ जयेश आणि महेश हे आपापल्या व्यवसायात स्थिर असून, त्यांचीही साथ मिळते.

Grape Production
Grape Crop Damage : ‘वादळी’ने सांगोल्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत

शेतीची धुरा घेतली खांद्यावर

राकेश यांचे वडील संभाजी यांना शेतीची पूर्वीपासून आवड होती. मात्र ते स्वतः इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांना आवड असूनही शेतीकडे तेवढा वेळ देता आला नाही. सहा वर्षांपूर्वी त्यांनी खुपसंगी आणि करकंब येथे शेती घेतली.

पहिल्याच प्रयत्नात (२०२०) द्राक्षासारख्या संवेदनशील पिकाची निवड केली. पण त्याच वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाला आणि मोठा आर्थिक फटका बसला. पुढील वर्षी सर्वत्र द्राक्षाचे उत्पादन अधिक झाल्याने दर पडले. सलगच्या या आर्थिक फटक्यामुळे वडिलांचा उत्साह काहीसा कमी झाला. वयोमानानुसार मर्यादाही आल्या. अखेर

शेतीची यापूर्वीचा फारसा अनुभव व माहिती नसताना राकेश यांनीच शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. कृषी प्रदर्शने पाहिली, व्याख्याने ऐकली. काही प्रशिक्षणे पूर्ण केली. त्यातून शेती विकसित करण्यास सुरुवात केली.

आज राकेश सुमारे ५० एकरांवर द्राक्ष बाग घेत आहेत. त्यात आरके व सुपर सोनाका प्रत्येकी चार एकर, एसएसएन व अनुष्का प्रत्येकी पाच एकर, माणिकचमन २० एकर, क्लोन २० एकर, फ्लेम सीडलेस दोन व कृष्णा सीडलेस अर्धा एकर अशी वाणांची विविधता ठेवली आहे.

शेतीतील व्यवस्थापन व सुविधा

-रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीचा मेळ घालताना ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनावर भर दिला आहे. त्यासाठी लागवड वेळापत्रक (शेड्यूल) तयार केले आहे. मोहाडी (नाशिक) येथील सह्याद्री शेतकरी कंपनीचे मार्गदर्शन पीक व्यवस्थापनात घेण्यात येते.

-व्हर्मिवॅाश, गांडूळ खत आणि जैविक स्लरीच्या वापरावर विशेष भर दिला आहे. गांडूळ खताचे सुमारे १९ बेड्‍स आहेत. त्याद्वारे व्हर्मिवॉशही मिळते.

-जैविक निविष्ठांचा वापर करायचा तर देशी गायींची आवश्‍यकता लागते. त्या दृष्टीने तीन थारपारकर, दोन गीर आणि १२ खिलार गायींचा समावेश आहे. त्यांच्यासाठी उत्तम पद्धतीचा गोठा बांधला आहे.

-शेण-गोमूत्राची स्लरी बागेला देण्यात येते. ठिबकद्वारे ती देण्यासाठी आठ फिल्टर युनिट्स शेतात बसवले आहेत.

-पाण्याच्या शाश्‍वत स्रोतासाठी दोन शेततळी उभारली आहेत. त्यासाठी १० एकर जागेचा वापर केला आहे. चार एकरांवरील जागेत पाच कोटी लिटर तर सहा एकरांवरील जागेत सात कोटी लिटर क्षमतेचे शेततळे आहे. पाच बोअर्स आहेत. त्याचे पाणी एकत्रितपणे शेततळ्यात आणून सोडले जाते. त्यात मासेपालनही केले आहे.

-शंभर टक्के ‘ड्रीप ऑटोमेशन’ यंत्रणा बसविली आहे.

-दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दोन ‘वेदर स्टेशन्स’ बसविली आहेत. त्याद्वारे पावसाचा अंदाज कळून येण्याबरोबर आर्द्रता, मातीचा ओलावा आदी बाबाही समजून येतात. त्यातून कीडनाशकांच्या फवारण्या योग्य वेळेत होऊन त्यावरील खर्चातही बचत झाली आहे.

-संपूर्ण शेतावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.

Grape Production
Grape Harvesting : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात

‘माई’ ब्रॅण्डने द्राक्षांची थेट विक्री

एकरी सरासरी १२ टनांपर्यंतचे उत्पादन मिळते. यंदा संपूर्ण क्षेत्रातून किमान ३०० टन किंवा त्यापुढे उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते २०० टनांपर्यंत होते.

सन २०२१ मध्ये अवकाळी पाऊस व प्रतिकूल वातावरणात मोठे नुकसान झाले. राकेश यांनी सूक्ष्म पद्धतीने बागेचे नियोजन व व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली खरी.

पण सर्वांत महत्त्वाची बाब होती ती विक्रीची. स्वतः उद्योजक असल्याने शिवाय तांत्रिक व व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्यांची भक्कम शैक्षणिक बाजू सोबत होती.

त्यातूनच आईच्या नावे ‘माई फार्म’ हा ब्रॅण्ड तयार करून दोन किलो आकर्षक बॉक्स पॅकिंगमधून द्राक्षांची पुणे येथे थेट विक्री व्यवस्था उभारली.

त्यासाठी मोबाईल व्हॅन्स तैनात केल्या. मनुष्यबळ उभारले. सध्या हडपसर, बाणेर, ताथवडे, कोंढवा, आठवडी बाजार, महोत्सव आदींमधून दररोज ७०० ते ९०० किलो व काही वेळा त्यातून अधिक विक्री थेट ग्राहकांना केली जात आहे.

बाजारात ज्या वेळी किलोला २० ते २२ रुपयांपर्यंत दर शेतकऱ्यांच्या हाती पडतो त्या वेळी काटकर यांना ५०, ६० ते ७५ रुपये दर मिळत आहे. दोन किलोच्या बॉक्सला १५० रुपये दर ठेवला आहे.

शेतीची साधना

शेतीला पूरक म्हणून कोंबडी, शेळी आणि मेंढीपालन सुरू केले आहे. सध्या ६० शेळ्या, १० मेंढ्या आणि ३०० कोंबड्या आहेत. आपली ज्ञानसंपदा समृद्ध करण्यासाठी राकेश यांनी असंख्य पुस्तकांचा संग्रह केला आहे.

त्यात कृषी विषयातही पुस्तकांचाही समावेश आहे. शेणापासून विविध उत्पादनेही तयार करण्यास सुरुवात केली असून, त्यास बाजारपेठ देण्याचा प्रयत्न आहे. ‘पद्मदीप’ (विटा) व यश नगरी (तासगाव) या दोन्ही शेतकरी कंपन्यांचे राकेश सदस्य आहेत.

संपर्क : राकेश काटकर, ८८५०६६६७२८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com