Agriculture Biodiversity : कृषिजैवविविधता अन लोकजीवनाच्या नोंदी

मागील काही लेखांमधून आपण जैवविविधतेच्या नोंदणीबाबत चर्चा केली. महत्त्व, उपयुक्तता आणि संवर्धनाच्या पद्धती संवर्धनाची गरज याबाबत माहिती घेतली आहे. आजच्या लेखात आपण कृषी जैवविविधता,पाळीव प्राणी,जनावरांचे बाजार,लोकजीवनाबाबत माहिती घेणार आहोत.
Biodiversity
BiodiversityAgrowon

शेतजमिनीच्या संदर्भात पिबीआर प्रक्रियेत पारंपारिक जातींचे जतन,शेत शिवारातील जंगली वनस्पतींचे जतन (Wild Herbs Conservation ),भूसंधारण (Land Conservation) आणि जलसंधारण (Water Conservation),नव्याने घडविलेल्या जातींचे नोंदणी पिकांच्या फळझाडांच्या फुलझाडांच्या सर्व विभिन्न जातींची माहिती यात नोंदविता येते. वनस्पतींच्या जातींचे संरक्षण, शेतकरी व वनस्पती उत्पादकांचे हक्क यांच्या संरक्षणासाठी प्रभावी प्रणाली स्थापन करण्याची तरतूद करण्यासाठी आणि वनस्पतींच्या नवीन जातींच्या विकासाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या योगदानाच्या संदर्भात त्यांच्या हक्कांना मान्यता देणे आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक मानले गेले आहे. नवीन वनस्पती जातींच्या विकासासाठी वनस्पती आनुवंशिक संसाधन सुधारणे आणि उपलब्ध करणे आणि त्यांचे रक्षण करता येईल. हा शेतकऱ्यांचा हक्क आहे.

https://plantauthority.gov.in/ या संकेत स्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. थोडक्यात पिबीआर च्या प्रक्रियेत नोंदींचा उपयोग स्थानिक जातींचे संरक्षण करता येईल आणि त्यांना मान्यता मिळेल.याच्या प्रोत्साहनासाठी अशा जातींच्या नोंदी झाल्यावर काही बक्षिस/अनुदान आणि प्रमाणपत्र दिले जाते.

१) शासनाने निर्धारित नोंदणी पत्रकामध्ये एकूण ३२ प्रपत्र आहेत ज्यातून माहिती गोळा करावयाची आहे. ती माहिती योग्य रित्या आणि अचूकपणे नोंदविता यावी ,अचूक माहिती असल्यास नेमके नियोजन करता येते अन्यथा नियोजन चुकते आणि पुढील दिशा देखील चुकीच्या सर्वेक्षणावर आधारलेली असते.

२) या नोंदी करण्यासाठी जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि माहिती संकलन करण्यासाठी तयार केलेल्या गटाने नकाशा सोबत ठेवावा आणि प्रत्यक्ष माहितीचे संकलन सुरू करावेत.

३) काही माहिती प्रत्यक्षात फिरून घेता येऊ शकते तथापि काही माहितीबाबत गावातील जुन्या जाणत्या लोकांना भेटून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून घ्यावी लागेल. केवळ ग्रामपंचायत कार्यालयात बसून या माहितीचे एकत्रीकरण आणि संकलन करता येणार नाही.

कृषी जैवविविधता :

- पहिल्या भागात एकूण पाच अनुसूची होत्या, ज्यामध्ये माहिती आपण संकलित केलेली आहे असे गृहीत धरून आता दुसऱ्या भागामध्ये संकलित करावयाची माहिती आपण पाहणार आहोत. पहिले प्रपत्र आहे गावातील पिकांबाबत माहिती गोळा करण्याचे आहे. या माहितीपत्रकात एकूण १४ रकाने आहेत. या प्रत्येकाचे विश्लेषण आपण याठिकाणी करणार आहोत. गावातील सर्व हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांच्या नोंदी यामध्ये करावयाच्या आहेत.

२) यामध्ये सर्वसाधारणपणे पिकाचे नाव, शास्त्रीय नाव, (शास्त्रीय नाव लगेच माहिती नसल्यास ते सर्व माहिती संकलित झाल्यानंतर देखील त्याच्यापुढे लिहिता येऊ शकेल, यासाठी आपल्या तज्ञ समितीमध्ये एक व्यक्ती शास्त्रीय माहिती असणारी असणे गरजेचे आहे) यानंतर स्थानिक नाव नोंदवावे. ही जात कोणत्या भागात येते, त्याचप्रमाणे गावातील त्या पिकाचे एकूण क्षेत्र किती? तसेच लागवडीखालील क्षेत्र पूर्वी किती होते आणि आज किती आहे याची नोंद करावी.

३) पूर्वीचा कालावधी कोणता होता,ही माहिती स्थानिकांच्या चर्चेतून नोंदवून घ्यावी. तो कालावधी तुम्हाला निर्धारित करता येऊ शकेल, पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली किंवा घट झाली हेही लक्षात येऊ शकेल. यानंतर या जातींच्या विशेष बाबींचा उल्लेख करावयाचा आहे. यामध्ये बुटकी,उंच,कमी पाण्यात येणारी,किडींना बळी न पडणारी इत्यादी.तसेच कुठल्या हंगामामध्ये हे पीक घेता येते याचीही नोंद करायची आहे.

४) या पिकाच्या उपयोग कोणत्या कारणासाठी होतो, उदाहरणार्थ

जनावरांना चारा, सरपण, घरे शाकारण्यासाठी, कुंपणासाठी इत्यादी. संबंधित जाती बाबत तांत्रिक ज्ञान, नोंदणी करून घेऊन ती त्यात लिहून ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ खपली गव्हाचे क्षेत्र मोठे होते तथापि आज त्याचे क्षेत्र अत्यंत कमी झाले आहे. या खपली गव्हाची विशेष तांत्रिक बाब म्हणजे याच्यामधून ऊर्जा खूप मिळते. सातारा मधील पुसेगाव येथे हरभऱ्याचे एक विशिष्ट वाण आहे केवळ ओलाव्यावर येते. त्याची पुरणपोळी ही अत्यंत चवदार असते. अशा प्रत्येक पिकांची तांत्रिक माहिती स्थानिकांकडे असते या ठिकाणी संकलित करावी.

५) पिकाबाबत काही विशिष्ट आणि इतर माहिती असल्यास ती येथे नोंदवावी. या पिकाचे बियाणे किंवा रोपांची उपलब्धता कोठून होते? हे देखील नोंदवून ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक पिकाबाबत संपूर्ण माहिती असणारी प्रत्येक गावात किमान एक तरी व्यक्ती असते, जिला आजपर्यंतच्या स्थित्यंतराची सर्व माहिती असते. त्यांचे नाव शोधून त्याची नोंद करावी.

६) या प्रपत्रात ज्वारी, तेलबिया, बटाटे, व्यापारी पिके, भाजीपाला इतर सर्व पीक वर्ग याची नोंदणी करावी.

Biodiversity
जैवविविधता नोंदणी पत्रकासाठी माहिती संकलन

फळपिके :

- नोंदणीच्या तक्त्यामध्ये फळपिकांची वर्गवारी केलेली आहे. यामध्ये फळपिकांची माहिती नोंदवून ठेवावी. -फळांचे नाव, त्याचे शास्त्रीय नाव, कोणत्या परिसरात, जमिनीत लागवड होते. एकूण क्षेत्र, पूर्वीचे क्षेत्र आणि आताचे क्षेत्र, त्याच्या बिया अथवा रोपे कोठे मिळतात? फळधारणेचा कालावधी कोणता असतो? या फळाचे विशिष्ट गुणधर्म, तसेच त्याचा वापर आणि त्याची विक्री कोठे हो?ते याबाबत नोंदी कराव्यात.

- शेवटच्या तक्त्यामध्ये या फळपिकाची संपूर्ण माहिती ज्या व्यक्तीकडे असेल, त्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी नमूद करावे.

वैरण पिके :

- नोंदणी तक्त्यामध्ये वैरणीच्या संबंधातील माहिती एकत्र करावयाची आहे. याचीही वरील दोन्ही तक्त्याप्रमाणेच माहिती गोळा करावयाची आहे. यामध्ये सदर वैरणीची पिके हे पूर्वापार घेतले जात काय? तसेच काही पिके ही नैसर्गिकरित्या विशिष्ट भूभागावर येतात का? जसे की, नदीकाठच्या भागांमध्ये असलेले गवत,तसेच डोंगरदऱ्यातून उगवणारे गवत इत्यादी.या सर्व नोंदी येथे येणे गरजेचे आहे.

Biodiversity
Biodiversity : जैवविविधता व्यवस्थापन समितीसाठी अनुसूची

तणांची माहिती :

- या तक्‍यामध्ये तणांचा बाबत माहिती गोळा करावयाची आहे. तणांचे नाव, त्याचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव, कुठल्या पिकांवर त्याचा परिणाम होतो? त्यांना पोषक वातावरण कोणते असते? आजची स्थिती आणि पूर्वीची स्थिती ,म्हणजे वाढ अथवा घट इत्यादी. तसेच त्यांचा उपयोग काय आहे किंवा कसे त्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत देखील माहिती असावी.

- काही तांत्रिक ज्ञान असल्यास माहिती नोंदवावी. त्या गावातील याबाबत संपूर्ण माहिती असणाऱ्या व्यक्तीचे नाव देखील नोंदवून घ्यावे.

पिकावर येणाऱ्या किडी :

- नोंद तक्त्यामध्ये किडीचे किंवा त्या प्रकाराचे नाव, कोणत्या पिकावर प्रादुर्भाव होतो, त्याचे स्थानिक नाव, त्याला कुठल्या प्रकारचे वातावरण पोषक असते? कुठल्या वेळी आणि कुठल्या हंगामामध्ये याचे प्रमाण अधिक असते याचीही नोंद घ्यावी.

- किडीचे नियंत्रण,व्यवस्थापन कसे करता येऊ शकेल किंवा कसे करतात, याबाबत माहिती नोंदवावी. सोबत असणारे तंत्रज्ञान आणि समाज ज्ञान याचीही नोंद यामध्ये करणे गरजेचे आहे.

Biodiversity
Biodiversity : जैवविविधता नोंदींतून हरित रोजगार

जनावरांचे बाजार :

- माहिती पुस्तिकेमध्ये गावातील जनावरांच्या बाजाराबाबत माहिती नोंदवावी. यामध्ये बाजाराचे नाव, ठिकाणाची माहिती, तसेच बाजार कधी भरतो?आठवडी, पंधरा दिवसाला, महिन्याला भरतो का वर्षातून काही वेळेस भरतो हा उल्लेख करावा. उदाहरणार्थ, नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगाव येथे ज्याला घोड्याचे माळेगाव असे म्हणतात. येथे वर्षातून एकदा घोड्यांचा बाजार भरतो. खंडोबाच्या देवस्थान समोर मोठा उत्सव असतो.

- काही ठिकाणी जनावरांचे आठवडी तर काही ठिकाणी पंधरा दिवसाचे बाजार असतात. प्रत्येक ठिकाणची त्यांची वारंवारिता वेगळी असते. त्याची नोंद या ठिकाणी घेणे गरजेचे आहे.

- सर्वसाधारणपणे या बाजारामध्ये किती जनावरे येतात? आणि त्यांची विक्री खरेदी किती होते? याचीही नोंद घ्यावी. सर्वसाधारणपणे कोठून जनावरे विक्रीसाठी येतात आणि विकत घेणारे लोक कोण आहेत याचीही नोंद या ठिकाणी असावी.

बाजारातील इतर नोंदी ः

- गावामध्ये मासळी बाजार असल्यास त्याची स्वतंत्र माहिती घ्यावी. येथे कुठल्या प्रकारचे मासे विक्रीसाठी येतात, आणि या माशांचे स्रोत काय आहे? याची देखील या ठिकाणी माहिती असणे गरजेचे आहे.कोकणातील सातपाटी येथे माशांचा बाजार प्रसिद्ध आहे.

- काही ठिकाणी गाढवे, काही ठिकाणी म्हशी तर काही ठिकाणी शेळ्यांचा बाजार प्रसिद्ध आहेत. लातूर जिल्ह्यातील रेणापूर हा शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. देवणी येथील बाजार हा जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी मोठे केंद्र आहे. प्रत्येक बाजाराची वैशिष्ट्ये वेगवेगळे असते. अशा स्थानिक नोंदी या प्रपत्रात येणे गरजेचे आहे.

लोकजीवनाची नोंद ः

-आपल्याला स्थानिक लोकजीवन संबंधी माहिती गोळा करायची आहे. यामध्ये प्रपत्र क्रमांक सात मध्ये एकूण अकरा रकाने असून यामध्ये लोकसंख्या आणि तेथील समाज याबाबत माहिती, तसेच त्यांचे उपजीविकेसाठी असलेल्या बाबी, मूळ उपजीविका कोणती, मूळ व्यवसाय कोणता त्याला पूरक व्यवसाय आहे का ? तो कुठल्या एका विशिष्ट भूभागावर अवलंबून आहे, या व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या निविष्ठा किंवा कच्चा माल कोठून येतो, याची संपूर्ण माहिती नोंदवायची आहे.

- काही ठिकाणी झाडू तयार करतात. यासाठी शिंदीच्या झाडापासून किंवा नारळाच्या झावळ्या पासून झाडू तयार करतात. हे झाडू तयार करणारा एक विशिष्ट समाज आहे, तो समाज कोणत्या कालावधीमध्ये हा व्यवसाय करतो? त्याचा मूळ व्यवसाय कोणता ? या पद्धतीने नोंदी या ठिकाणी येणे गरजेचे आहे. त्यांच्या जाती उपजाती, पोटजाती याच्याही नोंदी घ्याव्यात. या ठिकाणी त्यांची सामाजिक स्थिती तसेच आर्थिक स्थिती काय आहे, त्याच प्रमाणे त्यांच्या जाती व पोटजाती, सामाजिक स्थिती आर्थिक स्थिती आणि अशी ही किती कुटुंबे आहेत याच्याही नोंदी यामध्ये येणे गरजेचे आहे.

कोकणातील घोरपी:

कोकणातील नद्यांवर काम करत असताना त्यातील कोंडी किंवा डोहांचा अभ्यास करताना एक वेगळी माहिती हाती आली. या कोंडीत काही माश्यांचा विशिष्ट प्रजाती आहेत आणि त्या गोड्या पाण्यात वाढतात.त्यांना स्थानिक बाजारात मोठी मागणी असते .काही ठिकाणी तर दिवसातून दोनदा या ताज्या माशांचा बाजार भरतो. याचे अचूक ज्ञान असलेला एक समाज आहे, त्याचे नाव घोरपी समाज. यांची लोकवस्ती देवरुख येथे आहे. देवरुखमधील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना घेऊन आम्ही घोरपी समाजातील लोकांशी चर्चा केली.

या लोकांना काजळी नदी,तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नदीच्या कोंडी/डोहांची तसेच त्यातील पाण्याची माहिती आहे.तसेच त्यातील माशांचा विणीचा काळ, मासे पकडण्याचा वेळा इत्यादी सर्व माहिती होती. तथापि कोकणातील नद्यांमध्ये भरपूर गाळ साचल्याने या कोंडी गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे ते त्यांच्या व्यवसायापासून परागंदा झाले असल्याचे त्यांनी खंत व्यक्त केली.

भूभागाची नोंद ः

- यामध्ये पहिल्या रकान्यात एकूण भागामध्ये कृषी किंवा पिकाखाली असणारी जमीन, तसेच गावात काही तळे, तलाव वन तलाव, इत्यादी आहेत किंवा कसे? याबाबत माहिती द्यावी.

- काही पड जमीन असल्यास त्याची देखील नोंद या ठिकाणी करावी. या जमिनीचे वर्गीकरण, त्यांचे मालकी हक्क, तिथे सर्वसाधारणपणे कोणती झाडे आहेत, कोणत्या वनस्पती, पिके आहेत, कोणत्या प्रकारचे प्राणी, जंगली श्वापद, पक्षी, चिमण्या, इत्यादी यांच्या नोंदी कराव्यात.

- या पीक पद्धतीवर किंवा वनक्षेत्रावर कुठला विशिष्ट समाज किंवा व्यक्तींचा समूह अवलंबून असल्यास त्याचीही माहिती येथे द्यावी. या भूभागाचे व्यवस्थापन कसे होते त्याबाबत माहिती द्यावी.

- उदाहरणार्थ काही तलाव असतील तर त्या तलावांमध्ये मासेमारी करणारा विशिष्ट समाज आहे. काही ठिकाणी त्याला भोई म्हणतात काही ठिकाणी त्याला वेगळी नाव आहेत. तर याचा उल्लेख याठिकाणी करावा. गावातील कोण्या व्यक्तीकडे अथवा व्यक्तीच्या समूहाकडे याबाबत सविस्तर माहिती असल्यास त्यांची नावे पण या ठिकाणी नोंदवावीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com