दहा एकरांत हायड्रोपोनिक्स तंत्राने ‘रेसिड्यू फ्री’भाजीपाला

तीन उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येत देवडी (जि. पुणे) येथे पॉलिहाउसेसमधून (Polyhouse) अत्याधुनिक हायड्रोपोनिक्स शेती (Hydroponics Farming) प्रकल्प १० एकरांत साकारला आहे. सुमारे ४२ प्रकारचा देशी- परदेशी भाजीपाला ‘रेसिड्यू फ्री’ (Residue Free) व ‘हायजेनिक’ पद्धतीने घेतला जात आहे. पुणे, मुंबईतील आघाडीचे सुपरमार्केट्‌स, होटेल्स, खरेदीदार कंपन्या व एकूणच ग्राहकांमध्ये ‘न्यूट्रीफ्रेश’ हा विश्‍वासाचा व लोकप्रिय ब्रॅण्ड तयार झाला आहे. महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचा हा पहिला प्रकल्प असावा.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

उच्चशिक्षण, ‘बिझनेस’ माइंड, दूरदृष्टी (व्हिजन), ‘फायनान्स’ विषयातील अभ्यास, कष्टांची तयारी आणि अशा विविध गुणांमध्ये कुशल असलेल्यांची ‘टीम’. बस्स! कार्पोरेट कंपनी भक्कमपणे उभी ठाकण्यासाठी हेच ‘पीलर्स’ महत्त्वाचे असतात. देवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील ‘न्यूट्रीफ्रेश’ कंपनी याच पिलर्सवर खंबीरपणे पाय रोवून उभी आहे. पुणे शहरापासून कोल्हापूर महामार्गावर सुमारे ३५ किलोमीटरवर आणि नारायणपूर फाट्यापासून आत कंपनीचे क्षेत्र आहे. तब्बल दहा एकरांत अत्याधुनिक हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने (Hydroponics Technology ) (मातीविना शेती) ४२ प्रकारचा भाजीपाला येथे नऊ पॉलिहाउसेस (Poly House) व नर्सरीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील असा हा पहिलाच प्रकल्प असावा. (Agriculture without Soil)

Agriculture Technology
जनावरांसाठी हायड्रोपोनिक्स चारा

कंपनीची जडणघडण

‘न्यूट्रीफ्रेश’चे तीन मुख्य युवा शिलेदार आहेत. ते म्हणजे संकेत मेहता (सहसंस्थापक व सीईओ), गणेश निकम (सहसंस्थापक) व योगेश मेमाणे (विभाग प्रमुख (ऑपरेशन). गणेश ‘बीएस्सी केमिस्ट्री’, एमबीए (फायनान्स) पदवीप्राप्त आहेत. वर्तमानपत्र वितरक म्हणून कात्रज (पुणे) भागात त्यांनी अनुभव घेतला. संकेत बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन) व एमबीए पदवीप्राप्त आहेत.

‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’त व्यवस्थापक असताना कृषी विषयातील ‘प्रोजेक्ट’ त्यांच्याकडे यायचे. ते पाहण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी जावे लागे. त्या वेळी शेतीतील ‘पोटॅंशियल’ त्यांच्या लक्षात येत होते. गणेश व संकेत यांची गाठभेट अशाच कामाच्या निमित्ताने झाली. ‘बिझनेस’, ‘फायनान्स’ हे दोघांचेही आवडीचे विषय. दोघांनाही चाकोरी सोडून स्वतःचं आकाश, विश्‍व तयार करायचं होतं. त्यासाठी शेती हे क्षेत्र अत्यंत योग्य असल्याचं त्यांना जाणवलं. गणेश यांचे वडील ऊसशेती करायचे. दोघांनी भागीदारीत इथेच ऊसशेती सुरू करून आधुनिक तंत्राद्वारे एकरी ११० टन उत्पादनाचा पल्ला गाठला. शेतीत काहीतरी करू शकतो हा आत्मविश्‍वास आला.

Agriculture Technology
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चारा

टीम झाली बळकट

इच्छाशक्ती आणि प्रयत्न योग्य दिशेने असतील तर नियतीही साथ देते असे म्हणतात. गणेश यांचे मावसभाऊ योगेश गुलाब, जरबेरा शेतीत नोकरी करायचे. मालक म्हणून आपल्याच शेतीत राबू या विचाराने त्यांनी योगेश यांना खंदे साथीदार म्हणून सोबत ‘जॉईन’ करून घेतलं. टीम बळकट झाली. पाच एकर जागा ‘लीज’ वर घेतली. पॉलिहाउसमध्ये ऑर्किडचं दर्जेदार उत्पादन घेण्यापासून ते पहाटे पुणे बाजार समितीत अत्यंत ताजा माल वेळेत पोहोचवण्यापर्यंतची साखळी यशस्वी केली. फुलशेतीचा अध्यायही यशस्वी पार पाडला. उमेद वाढली. महाराष्ट्र वखार महामंडळाकडून अडीचशे एकर जागा (फलटण) ‘लीज’वर मिळाली. तिथं सेंद्रिय पद्धतीने फळबागा फुलविण्याचे काम सुरू आहे. निर्यातीवर ‘फोकस’ आहे.

हायड्रोपोनिक्स शेतीचा अध्याय

आकाश कितीही भव्य, अमर्याद असो, मोठी भरारी घेण्याएवढी ताकद आपल्या पंखात असल्याची जाणीव या युवकांना झाली. सर्वेक्षणात ‘हायड्रोपोनिक्स’ शेतीची माहिती मिळाली. यात मातीची आवश्‍यकता नसते. पडजमीनही चालते. फक्त भांडवली गुंतवणूक खूप लागते. हे आव्हान पेलायचं ठरवलं. हॉर्टिकल्चर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून (तळेगाव) तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले.

पैसे उभारणं हे दिव्य होतं. बॅंकांचं कर्ज घेतलं. लीजवरील तसेच फुलशेतीतून उत्पन्न सुरू होतं. गणेश यांच्या वडिलांनी पेन्शनमधील वाटा दिला. देवडी गावात २०१८-१९ मध्ये १० एकर जमीन खरेदी केली. हायड्रोपोनिक्स शेतीला सुरुवात करण्यापूर्वी तिघांनी एक गोष्ट हुशारीने केली. प्रत्येकाने स्वतःला पडणारे प्रश्‍न एकमेकांना विचारायचे आणि एकमेकांनीच त्याची उत्तरे शोधायची. यातून आव्हाने, संकटे व संधी लक्षात येऊन वाट प्रकाशमान झाली. तहानभूक विसरून पायाला भिंगरी लावल्यागत या सल्लागाराला भेट, या पॉलिहाउसला भेट दे असं करीत संशोधन आणि विकास काम केलं.

उत्पादनास सुरुवात

डिसेंबर २०१९ पासून उत्पादनास सुरुवात झाली. तत्पूर्वी पुण्यातील काही फाइव्ह स्टार होटेल्स व मॉल्स यांच्याकडे नोंदणी व करार झाले होते. मार्च २०२० मध्ये कोथिंबीर, ब्रोकोली बाजारात सादर झाली आणि नेमका लॉकडाउन सुरू झाला. सगळे करार स्थगित झाले. पण टीमनं धीर सोडला नाही. उलट नवं काही घडवायचं, स्वतःला सिद्ध करायची संधीच दरवाजा ठोठावत होती. मग तिघांनीही विविध निवासी सोसायट्यांमध्ये ओळख काढून भाज्यांची ‘होम डिलिव्हरी सुरू केली.

ब्रॅण्डला ग्राहकांची पसंती

मालाची गुणवत्ता होती. शेतातच प्रतवारी, कमीतकमी मानवी स्पर्श वा हाताळणी, मातीचा संपर्क नाही, स्वच्छ, ‘रेसिड्यू फ्री’, हायजेनिक, घरी निवडण्याची गरज नाही, स्वयंपाकावेळी थेट कढईत टाकावा असा भाज्यांचा दर्जा. पनेट व प्लॅस्टिक बॅग पॅकिंग. साहजिकच न्यूट्रीफ्रेश ब्रॅण्डच माल अल्पावधीत ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाला. गुगल फॉर्म, व्हॉट्‌सॲप ग्रुप, वेबसाइट, ॲप, निवासी सोसायट्यांमध्ये गृहिणींद्वारेच मालाचा प्रसार करणारा मुंबईचा प्लॅटफॉर्म (ॲप) आदी माध्यमांतून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं. संकेत सांगतात की एका गृहिणीने ‘रेड कॅबेज’ आधारित ढोकळ्याची रेसिपी शेअर झाली. त्यानंतर मागणीत एवढी वाढ होत गेली, की याआधी ७० ते ८० लाल कोंबींची येत असलेली ऑर्डर दीडशेपर्यंत पोहोचली.

कोरोनानंतर नवं रूप

कोरोनानंतर कंपनी नव्या अवतारात जोमानं कार्यरत झाली. संकेत सांगतात की दोन महत्त्वाच्या गोष्टी समजल्या की मालाची गुणवत्ता शंभर टक्के हवीच. त्याचबरोबर खरेदीदारांना बाराही महिने सातत्याने पुरवठा करता येणं गरजेचं. जेवढा माल पुरवण्याची ‘कमिटमेंट’ दिली ती पाळता यायला हवी. या दोन बाबींमुळेच पुणे व मुंबईतील हॉटेल चेन्स, सुपरमार्केट्‌स आज न्यूट्रीफ्रेशचे नियमित ग्राहक झाले आहेत. पुण्यातील एका कॅफेची १८ ‘आउटलेट्‌स’ आहेत. त्यांनी फार्मला भेट देऊन माल ‘रेसिड्यू फ्री’ असल्याची खात्री केली आहे. स्विगीसारख्या कंपन्या ताजा भाजीपाला देत आहेत. त्यांनी हॉटेल- रेस्टॉरंट- कॅंटीन अशी साखळी विकसित केली आहे. त्यांनी न्यूट्रीफ्रेशसोबत करार केला आहे. ऑर्डर्समध्ये वाढ होऊ लागल्याने तळेगाव (पाच एकर) व करंदी (तीन एकर) येथे आठ एकरांत काही पॉलिहाउसधारकांसोबत काम सुरू केले आहे. १०० किलो ऑर्डरची ‘कमिंटमेंट’ दिल्यास त्याच्या दुप्पट (२०० किलो) उत्पादन घेण्यात येतं. उर्वरित मालाची अन्यत्र विक्री होते. ‘वेस्टेज’ टक्केवारी केवळ दोन टक्के असते.

न्यूट्रीफ्रेश कंपनी- ठळक बाबी

१) नऊ पॉलिहाउसेसमधून ४२ प्रकारच्या भाजीपाला प्रकारांचे उत्पादन. (उत्पादनांची विस्तृत श्रेणी.) उदा. चेरी टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, ब्रोकोली, लेट्यूस, रेड कॅबेज, झुकिनी, पार्सली, सेलेरी, आईसबर्ग, फ्लॉवर, कोथिंबीर, पालक, मेथी.

२) इटालियन बेसिल (तुळस) हा वेगळा प्रकार. काही हॉटेल्समध्ये सूपनिर्मिती किंवा हर्बल टीसाठी

त्याचा वापर. पूर्वी सॅंडवीचमध्ये मुख्य ‘बेस’ कोथिंबीर होता. आता इटालियन बेसिलचाही समावेश.

४) बीफस्टिक टोमॅटो- मॅकडोनाल्ड कंपनीला बर्गरसाठी काप करण्यासाठी ४५० ते ५०० ग्रॅम वजनाचा मोठा टोमॅटो लागतो. त्याचीही शेती पॉलिहाउसमध्ये होत आहे.

५) आधुनिक तंत्राने युक्त सुसज्ज नर्सरी.

६) न्यूट्रीफेशचे ग्राहक- बिग बास्केट, मॅकडोनाल्ड, ॲमॅझॉन फ्रेश, नेचर्स बास्केट, स्टार, रिलायन्स फ्रेश, ग्रॉफर्स, हायपरप्युअर, स्विगी इन्स्टामार्ट आदी.

७) ‘लॉजीस्टिक’साठी सहा व्हॅन्स. दोन कंपन्यांसोबत टायअप.

८) दर- ग्राहकांना परवडणारे. संकेत सांगतात की आमची भाजी पूर्ण वापरायोग्य असल्याने

कोणताही भाग वाया जात नाही. मोजलेली किंमत पूर्ण सार्थ ठरते. गृहिणींचा निवडण्याचा वेळ व त्रासही वाचतो.

९) वार्षिक उलाढाल- २५ ते ३० कोटी रु.

१०) गुंतवणूक- १० एकरांसाठी जागा, तंत्रज्ञान, विपणन, विक्री साखळीपर्यंत सुमारे २५ ते ३० कोटींपर्यंत किमान गुंतवणूक अपेक्षित.

मिळालेली प्रमाणपत्रे

-आयएसओ

-फूड सेफ्टी- एफएसएसएआय परवाना

-ग्लोबलगॅप- (हे प्रमाणपत्र असल्यानेच ‘ॲमॅझॉन फ्रेश’ कंपनीने नोंदणीकरण दिले.)

-हॅसेप

-‘फार्म टू फोर्क ट्रेसेबिलिटी’ आणण्याचा प्रयत्न. नेचर्स बास्केटमध्ये उपलब्ध उत्पादनांच्या स्टिकरवर बार कोड. तो स्कॅन करून संपूर्ण फार्मची ‘व्हर्च्युअल टूर’करता येते. येत्या काळात क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर थेट पॉलिहाउसमधील लाइव्ह कामे पाहता येतील.

ग्राहकांमध्ये विश्‍वासार्हता

-अपेडा प्रमाणित प्रयोगशाळेद्वारे भाज्या रासायनिक अवशेष मुक्त असल्याची खात्री करण्यात येते.

-प्रति नमुना ‘टेस्टिंग’साठी सुमारे सात हजार रुपये खर्च. मात्र ग्राहकांत विश्‍वास निर्माण होतो.

-उत्पादनांवरील स्टिकरवर प्रमाणपत्र क्रमांकांचा उल्लेख. ग्राहक वेबसाइटला भेट देऊन त्याआधारे ‘व्हेरीफिकेशन’ करू शकतात.

टिकवणक्षमता वाढवणारे पॅकिंग

-मॉडिफाइड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंगचा (एमएपी) वापर. लेझर परफोरेटेड प्लॅस्टिक बॅग.

-त्याला अत्यंत सूक्ष्म छिद्रे असून त्यातून बाष्पीभवन होत असल्याने भाजीपाला ठेवल्यानंतर वाफ धरत नाही. त्यामुळे मालाची टिकवणक्षमता वाढते.

-काही भाजीपाल्यांसाठी पनेट व त्यावर एमएपी बॅग असे दुहेरी पॅकिंग. जेणे करून माल अधिक ताजा राहतो. (प्रवासात फायदेशीर)

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

१) वाण व निविष्ठा-

-बियाण्यांसाठी दोन खासगी कंपन्यांसोबत टाय-अप. इटालियन बेसल वा सेज आदींचे बियाणे इस्राईलहून येते. त्याचे स्थानिक वितरक.

-तमिळनाडूतील कंपनीकडून कोकोपीटची खरेदी. (३० टक्के चिप्स व ७० टक्के कोकोपीट असे मिश्रण).

पाणी व अन्नद्रव्ये

-संपूर्ण दहा एकरांसाठी आरओ (रिव्हर्स ऑसमॉसिस) पाणी प्लांट व ‘ड्रीप ऑटोमेशन’ यंत्रणा.

-त्या माध्यमातून मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या स्पेशल ग्रेड विद्राव्य खतांचा वापर. कमतरतेची लक्षणे ओळखून व्यवस्थापन.

पीक संरक्षण

-प्रतिबंधक म्हणून नीम व करंज तेल आदींचा वापर.

-कीड पाणी, हवा व माती या तीन माध्यमातून येत असते. या ठिकाणी आरओ पाण्याचा वापर होतो.

हवा पॉलिहाउसद्वारे नियंत्रित ठेवली आहे आणि माती वापरलीच जात नाही. नीम ऑइलचे उत्पादन प्रकल्पस्थळी होते. एखाद्या किडी-रोगाचा प्रमाणाबाहेर प्रादुर्भाव झाला व सेंद्रिय घटकाद्वारे नियंत्रण शक्य होत नसेल तरच (क्वचित) रसायनांचा वापर होतो.

हायड्रोपोनिक्सच्या चार पद्धतींचा वापर

१) ट्रफ बॅग पद्धत-

-वेलवर्गीय पिके उदा. चेरी टोमॅटो, झुकिनी आदींसाठी.

-मातीऐवजी ७० टक्के कोकोपीट व ३० टक्के त्याच्या चिप्स असे मिश्रण. त्यामुळे हवा खेळती राहते. पाणी व अन्नद्रव्ये देण्यासाठी ठिबकचा वापर.

२) व्हर्टिकल फार्मिंग

संकेत-गणेश व योगेश यांनी पॉलिहाउसमधील व्हर्टिकल फार्मिंगचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन विकसित केले आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग असून चाचण्यांअंती तो यशस्वी झाल्याचा दावा आहे.

-कुंड्यांची सहा मजले (लेअर्स) रचना.

-एरोड्रीपरद्वारे १-३-५ व २-४- ६ पद्धतीने सिंचन. उदा. पहिल्या कुंडीला पाणी दिल्यानंतर ते तिसऱ्या व तेथून पाचव्या कुंडींत झिरपते.

-खुल्या शेतीत चाळीस हजार फुटांसाठी चाळीस हजार लिटर पाणी प्रति दिवस लागत असेल तर या पद्धतीत केवळ साडेतीन हजार ते चारहजार लिटर पाणी लागते. (अन्नद्रव्यांच्या काटेकोर वापरातून)

-कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन व पाण्याची मोठी बचत साध्य करण्याचा हेतू.

३) एनएफटी- (न्यूट्रीयंट फिल्म टेक्निक) - यात पाणी सतत ‘सर्क्युलेट’ होत असते. इनलेट पाइप्सद्वारे रोपांना पाणी व अन्नद्रव्ये देण्यात येतात. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर होतो.

-यात पाण्याची पीकनिहाय ‘सायकल’ असते. उदा. पहिली सायकल नर्सरीत २४ दिवसांची असेल, तर पुढची २४ दिवसांची सायकल रोपे लावलेल्या ठिकाणी पूर्ण होते. यात ईसी, पाण्याचे तापमान, आतील आर्द्रता ७५ ते ८० टक्के व तापमानही २५ अंश सेल्सिअस आसपास ठेवण्याचा प्रयत्न असतो. तापमान जेवढे थंड तेवढी उत्पादकता वाढते.

४) ग्रो बॅग-

यात जमिनीत रोवलेले लोखंडी खांब व त्या ‘स्ट्रक्चर’वरील ग्रो बॅग्जमध्ये भाज्या वाढविल्या जातात.

५) ‘डीब्ल्यूसी’( डीप वॉटर कल्चर) या आधुनिक पद्धतीवर काम सुरू आहे. यात वनस्पतींची मुळे पाण्यात बुडविलेली असतात. त्यांना ऑक्सिजन पुरविला जातो.

उत्पादन (प्रातिनिधिक)

१) ट्रफ बॅग-

बीफस्टिक टोमॅटो- प्रति झाड- ७ ते ९ किलो (एकरी सुमारे दहा हजार झाडे) (८ ते ९ महिने कालावधी)

काकडी- ४ ते ५ किलो प्रति झाड, चेरी टोमॅटो- अडीच ते साडेतीन किलो प्रति झाड. (एकरी १० हजार झाडे)

२) एनएफटी तंत्र-

-लेट्यूस- १५० ते १७० ग्रॅम प्रति झाड (एकरी ६० हजार झाडे) (४५ दिवसांचा पीक कालावधी), अन्य भाज्या- १०० ग्रॅम प्रति झाड उत्पादन.

कंपनीचे श्रमिकबळ

१) सुमारे ८२ महिला व २८ पुरुष कर्मचारी. छोटा बचत गट चालवणाऱ्या स्थानिक महिलांना कोरोना काळात रोजगार दिला. त्यांना महिन्यातून दोन सुट्ट्या. स्वतंत्र स्वच्छतागृहे. एखाद्या महिलेचे मूल सांभाळण्यासाठी स्वतंत्र महिलेची व्यवस्था. मजुरांसाठी ‘क्वार्टर्स.

२) कृषी विषयातील ॲग्रॉनॉमीस्ट. त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले आहे.

संपर्क ः योगेश मेमाणे, ८६००७७९१२१, ७५८८९४३७०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com