डाळमिलसह तेलघाणा व्यवसायातून तयार केली ओळख

कर्णवडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील रूपाली जाधव यांनी श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या माध्यमातून डाळ मिल व्यवसायास सुरुवात केली. सर्व उत्पादनांची ‘श्री साई डाळमिल ॲण्ड ऑइल मिल’ या ब्रॅण्डच्या नावाने विक्री करत यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख तयार केली आहे. व्यवसायाचा विस्तार करत गावातील इतर महिलांच्या हातालाही काम दिले आहे.
डाळमिलसह तेलघाणा व्यवसायातून तयार केली ओळख
Women EmpowermentAgrowon

खंडाळा तालुक्यातील मांढरदेवीच्या पायथ्याला डोंगराच्या खुशीत कर्णवडी हे १२७७ लोकसंख्या असलेले गाव. या गावातील रूपाली सत्यवान जाधव डाळमिल व्यावसायिक आहे. लग्नानंतर सुरूवातीच्या काळात अंगणवाडी सेविका होण्यासाठी आवश्यक कोर्स केला, पण नोकरी मिळाली नाही. तरीही हार न मानता रुपालीताईंनी यांनी जमेल ते काम करत आपले प्रयत्न सुरू ठेवले. व्यवसायाची आवड कायम असल्याने आपल्या आईकडील जुने शिलाई मशिन आणून शिलाईचे काम सुरू केले. जोडीला किराणाचे दुकान आणि ब्युटी पार्लरही सुरू केले. मात्र, या सर्व व्यवसायांमध्ये मर्यादा असल्याने त्यांनी नवीन व्यवसायाचा शोध सुरू ठेवला.

अंगणवाडीताईंच्या मार्गदर्शनाखाली २००४ मध्ये रूपाली जाधव व त्यांच्या सहकारी महिलांनी बचत गटाची सुरवात केली. सुरुवातील गटातील महिला प्रत्येक महिन्याला फक्त ५० रुपये बचत करत होत्या. पुढे २०११ नंतर प्रति महिला २०० रुपयांची बचत करू लागल्या. त्यावेळी बचत गटाची चळवळ ऐन बहरात होती. जिल्हा बँकेकडून व्यवसाय कर्ज सहाय्याची माहिती घेत महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले.

कर्णवडीत आज १४ बचत गट कार्यरत असून ते सर्व ‘उमेद’शी जोडले आहेत. गटातील रूपाली जाधव या अतिशय महत्त्‍वाकांक्षी असल्याने सुरुवातीपासूनच एखादा मोठा व्यवसाय सुरू करण्याची त्यांची इच्छा होती. या दरम्यान कमलाताई परदेशी यांच्या मार्गदर्शनपर व्याखानातून रुपालीताईंना ऊर्जा मिळाली. एखादी महिला उद्योगात कशाप्रकारे यशस्वी होते, कमलाताईंनी उत्तमरीत्या उपस्थिती महिलांना पटवून दिले. त्यातून रूपालीताईंनी गावामध्येच शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

डाळमिल व्यवसायाचा श्रीगणेशा ः

लोकांच्या दैनंदिन आहारात तूर, हरभरा, मूग, उडदाच्या डाळीचा समावेश प्रामुख्याने असतो. ही बाब ध्यानात घेऊन रूपाली यांनी डाळमिल सुरु करण्याचे ठरविले. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रत्यक्ष अकोल्याला जाऊन तेथील डाळमिल पाहिल्या. युट्यूब तसेच सोशल मिडियावर डाळ मिलची माहिती मिळाली. या व्यवसायाची माहिती घेत असताना खंडाळा तालुक्यात कुणीच हा व्यवसाय करत नसल्याचे लक्षात आले.

डाळमिल उभारणीसाठी भांडवलाची गरज होती. त्यासाठी बँकांच्या कर्ज योजनांची माहिती घेतली. पुढे कॅनरा बँकेकडून सुमारे ९ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यात स्वतःचे सुमारे १ लाख १० हजार रुपये घालून त्यांनी डाळ मिलसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी केली. असे करत रुपालीताईंनी कर्णवडीत ‘श्री साई डाळमिल’ नावाने ऑक्टोबर, २०१८ रोजी व्यवसायास सुरुवात केली. मिलसाठी तूर आणि इतर कडधान्ये लातूर, बार्शी, लोणंद आणि स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्यास सुरुवात केली. ‘श्री साई डाळमिल ॲण्ड ऑइल मिल’ या ब्रॅण्ड नावाने डाळ आणि तेलाची बाजारात विक्री केली जात आहे.

Women Empowerment
Women EmpowermentAgrowon

व्यवसायातील बाबी ः

- तूर, मूग, उडीद, हरभरा, घेवडा इत्यादींपासून डाळनिर्मिती.

- कच्च्या मालाची स्थानिक व लोणंद, शिरवळ परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी.

- ‘श्री साई डाळमिल ॲण्ड ऑईल मिल’ या ब्रॅण्डखाली अर्धा किलो, १ किलोचे पॅकिंग.

- विविध प्रदर्शात स्टॉलद्वारे डाळी आणि तेलाची आकर्षक पॅकिंग करून विक्री.

- दर्जेदार डाळीमुळे जागेवरूनच मोठी विक्री. भोर, शिरवळ, पळशी इत्यादी ठिकाणी डाळविक्री.

- वर्षाअखेर सुमारे २० क्विंटलपेक्षा अधिक डाळ निर्मिती.

- व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा एकही हप्ता न थकविता सर्व कर्जाची वेळेत परतफेड.

- व्यवसायातून खर्च वजा जाता सुमारे १५ टक्के नफा.

तेलघाण्यास सुरुवात ः

डाळमिल व्यवसायाला पूरक म्हणून रूपालीताईंनी गेल्या वर्षी तेलघाणा सुरू केला. या व्यवसायास ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात त्यांनी सुमारे बाराशे किलोपेक्षा अधिक तेलाची निर्मिती केली. बाजारात तेलघाण्यापासून काढलेल्या तेलाची वाढती मागणी पाहून त्यांनी दुप्पट क्षमतेने तेल उत्पादन देणाऱ्या तेलघाण्याची खरेदी केली आहे. तसेच भातासाठी मिनी राइस मिल घेतली आहे.

मदतीचा हातभार मोठा ः

या व्यवसायात पती सत्यवान आणि मुलगा पृथ्वीराज यांची मोठी मदत होते. तसेच उद्योग उभारणीसाठी कृषी विभागाचे समीर चव्हाण, ‘उमेद’चे श्री. खुंडे, श्री. चव्हाण, श्री. कुंभार, कृषी विभाग आणि बँकेतील अधिकारी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी श्रीकांत जाधव, राजेंद्र नलवडे यांची मदत झाल्याचे रूपालीताईंनी आवर्जून सांगितले. पुढील काळात ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

‘‘बचत गट सुरू केल्यानंतर माझ्यासह इतर सहकारी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्फूर्ती मिळाली. आमच्या गावात आज १४ बचत गट कार्यरत आहेत. त्यातून महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. अनेक महिला स्वतःचे उद्योग उभारू लागल्या आहेत.’’
रूपाली जाधव, ८८०६२४४४१२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com