Tur : तूरडाळीचा साई गावराणी ब्रॅण्ड

मुख्याध्यापक माधव राऊत (अंबोडा, जि. यवतमाळ) यांनी नोकरी सोडून शेतीमाल प्रक्रिया व्यवसायात पदार्पण केले. सुमारे १० वर्षांच्या अथक प्रयत्नांतून शेतकरी गट स्थापना, प्रक्रिया युनिट, त्याद्वारे तूरडाळ उत्पादन व त्याचा साई गावराणी हा ब्रॅण्ड लोकप्रिय केला. आता जोडीला तेलबियांपासून तेलनिर्मिती सुरू करून आर्थिक उलाढाल वाढवत स्थानिकांना रोजगार देण्याचेही काम केले आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

यवतमाळ जिल्ह्यात अंबोडा येथील माधव राऊत यांनी एमए (इतिहास), बीपीएड पर्यंत शिक्षण घेतले. विनाअनुदानित शाळेत १९९३ ते २००० या कालावधीत सहायक शिक्षक, मुख्याध्यापक अशी जबाबदारी सांभाळली. परंतु शेतीची (Agriculture) आवड व त्यातील प्रक्रिया उद्योगाची (Processing Industry) संधी ओळखून त्यातच पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भागात उत्पादित होणारी तूर व डाळीला (Tur Production) सातत्याने असलेली मागणी ओळखली. डाळनिर्मिती युनिट (Dal Production Unit) उभारण्यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज काढले. गावातील समविचारी शेतकऱ्यांना एकत्र करीत गटाची बांधणी केली. अलीकडेच पैनगंगा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीही (Painganga Agro Producer Company) स्थापन केली आहे.

तूरडाळीचे उत्पादन

पैनगंगेच्या काठावरील तुरीची पौष्टिकता आणि गोडवा काही औरच आहे. त्यामुळे महागाव, उमरखेड, आर्णी या भागातील वेगळेपण जपणाऱ्या या तुरीला ओळख मिळावी यासाठी माधव प्रयत्नशील आहेत. या तुरीला भौगोलिक निर्देशांक मिळावे यासाठी ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (अकोला) संपर्कात आहेत. राऊत यांच्या गटात दीड हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कृषी विद्यापीठाच्या सुधारित वाणांचे बियाणे ते आपल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी देतात. बाजारभावापेक्षा अधिक दर देत त्यांच्याकडून तुरीची खरेदी होते.

Food Processing
Food Processing : बिस्कीट प्रक्रिया उद्योगामध्ये तयार केली ओळख

डाळनिर्मिती

१) निर्मिती प्रक्रिया

-जानेवारी ते मे या कालावधीत होते प्रक्रिया. याच कालावधीत सूर्यप्रकाश भरपूर असतो.

-तूर वाळविण्यासाठी नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करता येतो. भुईमूग तेल लावणे व तुरीवरील टरफल काढण्यासाठी ही प्रक्रिया तीनदा व नैसर्गिकरीत्या होते.

-राऊत सांगतात की खासगी व्यावसायिक डाळीला चमक (पॉलीश) येण्यासाठी काही घटक, तेल, पाणी यांचा वापर करतात. यामध्ये तुरीचे वजन नाहक वाढते. मात्र आम्ही डाळनिर्मिती नैसर्गिक रित्या करीत असल्याने डाळीचेच वजन पूर्ण असते. शिवाय ती अधिक पौष्टिकही असते. केवळ टरफल काढण्यापुरताच तेलाचा वापर होतो.

Food Processing
Tur Rate : तुरीचा भाव कधीपर्यंत तेजीत राहणार?

२) उत्पादनक्षमता व दर

-प्रति तास बारा क्विंटल प्रक्रिया करण्याची यंत्राची क्षमता. मात्र ग्रामीण भाग असल्याने दिवसाला केवळ आठ तास वीजपुरवठा होतो. याच कालावधीत प्रक्रियेचे काम आटोपावे लागते.

-प्रति क्विंटल तुरीपासून ७० किलो डाळ, चार ते पाच किलो तुकडा व उर्वरित कोंडा मिळतो.

-डाळीचे भाव चढे असल्याने शेतकऱ्यांकडून ती थेट विकण्यावर भर राहतो. असे शेतकरी प्रक्रिया करून देण्याची मागणी करतात. त्यासाठी चारशे रुपये प्रति क्विंटल दर आकारला जातो. सध्या १२०

रुपये प्रति किलो असा डाळीचा बाजारातील दर आहे.

ब्रँड केला विकसित

दहा वर्षांच्या प्रयत्नांमधून साई गावराणी हा तूरडाळीचा ब्रॅण्ड लोकप्रिय केला आहे. अर्धा किलोपासून ते पन्नास किलोच्या पॅकिंगमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार ती उपलब्ध केली आहे. यवतमाळ बसस्थानकानजीक कृषी विभागाचे कार्यालय आहे. त्या मार्फत सहा गाळे शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध केले आहेत. माधवराव येथूनच आपली डाळ व शेतकऱ्यांचा माल, औषधी वनस्पती, हळद आदी शेतमाल यांची विक्री करतात. पुणे येथील महाराष्ट्र सहकार विकास मंडळालाही डाळ पाठवण्यात येते. पुणे, मुंबई येथील ग्राहकांकडून पाच किलोच्या पॅकिंगमध्ये (थैली) मागणी राहते. ३० व ५० किलो पॅकिंगसाठी प्लॅस्टिक बारदान्याचा वापर होतो.

आर्थिक उन्नती

प्रति हंगामात सुमारे सहा हजार ते सातहजार क्विंटल तुरीवर प्रक्रिया होते. दरवर्षी तेवढी विक्री वा आर्थिक उलाढाल करण्याचा प्रयत्न होतो. आज दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यापर्यंत मजल मारली आहे. माधव यांना पत्नी रेणुका यांची उत्पादन निर्मितीत महत्त्वाची मदत होते. दुर्गेश जाधव, तुकाराम चव्हाण यांचीही मोलाची साथ आहे. सर्वांच्या प्रयत्नांमधूनच व्यवसायातून आर्थिक उन्नती साधली आहे. मालवाहू वाहन घेतले आहे. बावीस लोकांना रोजगारही देण्याचे समाधान मिळवले आहे. घरची २० एकर शेतीही सोबत कसली जाते.

तेलनिर्मिती

मूल्यवर्धन केल्याने अधिक दर मिळतो ही बाब हेरलेल्या माधव यांनी अलीकडेच करडई, सूर्यफूल, जवस, भुईमूग, खोबऱ्यापासून तेल काढण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी सात लाख रुपये खर्चून यंत्रणा उभारली आहे. प्रति किलो भुईमूग शेंग दहा रुपये, तीळ १५ रु. करडई, जवस, मोहरी १२ रुपये याप्रमाणे प्रक्रिया दर आकारण्यात येतो. तासाला एक क्विंटल अशी तेलघाणीची क्षमता आहे. भुईमूग शेंगांपासून २७ ते २८ किलो तेल, ७२ ते ७३ किलो ढेप, तीळापासून ४५ किलो तेल, ५५ किलो ढेप तर करडईपासून २३ किलो तेल व ७६ ते ७७ किलो ढेप मिळते.

वाढता प्रतिसाद

शेतकऱ्यांसमोरच प्रक्रिया होत असल्याने त्यांचा विश्‍वास संपादन करण्यात यश मिळविले आहे. हा वाढता प्रतिसाद पाहात नातेवाइकांच्या मदतीने आणखी दोन तेलमिल उभारण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी माहूर, किनवट, दिग्रस, पुसद येथे ऑइलमिल होत्या. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल घेऊन जावे लागे. आता गावशिवारातच राऊत यांच्या माध्यमातून सोय झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा यात बचत होत आहे.

माधव राऊत, ९३७०२५२७६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com