सेंद्रिय मिश्रफळबागेसह लोणची, पावडरी, तेलनिर्मिती

कोळपिंप्री (जि. जळगाव) येथील कृषिभूषण शेतकरी सतीश काटे यांनी २२ वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने मिश्रफळबाग शेती विकसित केली आहे. चिकू, आवळा, लिंबू, कढीपत्ता, शेवगा आदींचे मूल्यवर्धन करून लोणची, पावडर, तेलनिर्मिती व हर्बल टी उत्पादनांची निर्मिती ते करतात. सृष्टी ब्रॅंडच्या या सेंद्रिय उत्पादनांना मुंबई, ठाणे व पुणे भागात त्यांनी सक्षम ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे.
सेंद्रिय मिश्रफळबागेसह लोणची, पावडरी, तेलनिर्मिती
Organic FarmingAgrowon

कोळपिंप्री (ता. पारोळा, जि. जळगाव) शिवार कापूस पिकासाठी प्रसिद्ध आहे. मध्यम, हलकी जमीन या भागात आहे. काही भागांत जलसाठे बऱ्यापैकी आहेत. गावातील सतीश काटे २२ वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. आपल्या साडेपाच एकरांत त्यांनी मिश्रफळबाग शेती विकसित केली आहे. त्यात १०० झाडे चिकूची, लिंबाची (साई सरबती) बांधावर २५, शेतात २५०, शेवगा दोन हजार शेवगा, १०० आवळा, २०० सागवान, १५ रामफळ, १५ अंजीर, १० डाळिंब, १० सीताफळ, १० मोसंबी, चार आंबे व ५५ चंदनाची झाडे अशी ही समृद्धता आहे. बांधावर आठ कडुनिंब व नऊ उंबराची झाडे आहेत. एक विहीर आहे. देशी गायींचे संगोपन होते.

सेंद्रिय शेतीचा वसा

शेतीतील खर्च कमी व्हावा, मजूर, पाणी व अन्य समस्या दूर व्हाव्यात या दृष्टीने सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार पहिल्यापासूनच सतीश यांनी केला. त्यांची फळबाग घनदाट आहे. पक्ष्यांचा त्यात सहवास आहे. किडींचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. दशपर्णी तसेच निंबोळी अर्क, व्हर्मिवॉश, पपई अर्क अन्य सेंद्रिय निविष्ठा शेतात तयार केल्या जातात. शेतीचे सेंद्रिय प्रमाणीकरणही त्यांनी केले आहे.

प्रक्रिया उद्योगाचा मार्ग

पूर्वी सतीश शेतीमालाची विक्री बाजारात करायचे. त्यांच्या फळबागेची पाहणी करण्यासह सेंद्रिय शेतीमालाची माहिती घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी तज्ज्ञ, अभ्यासकांचा समूह आला होता. यातील काहींनी लिंबाचे लोणचे, पावडर आदींची मागणी केली. सतीश यांनी ती पुरवली. त्याच वेळी त्यांना प्रक्रिया व्यवसायाचा मार्ग मिळाला. लहान स्वरूपात व्यवसाय सुरूही झाला. सुरुवातीला प्रदर्शनांमधून तसेच विविध कार्यालयांमधून विक्री सुरू केली. उत्पादनांची चव व त्यांची वैशिष्ट्ये पाहता मागणी वाढत गेली. मग व्यवसायही वाढत गेला. आपल्या व्यवसायातून सुमारे आठ ते १० महिलांना रोजगार दिला आहे. पल्व्हरायजर, ड्रायर, लिंबू तसेच मिरची कापणी यंत्र, बॉटल पॅकिंग, शेवाग बी तेल काढणी यंत्र अशी यंत्रणा आहे. कच्च्या मालाची घरी शास्त्रीय पद्धतीने साठवणूक केली जाते.

मजुरी, वीज व अन्य बाबींवर एकूण खर्च किमान ३५ हजार रुपये आहे. उलाढाल १० लाख रुपयांपर्यंत गेली असून, उद्योगातून सुमारे ६० ते ७० टक्के नफा मिळवण्यापर्यंत यश मिळवले आहे.

विस्तारलेला आजचा व्यवसाय

-आजघडीला सुमारे पाच प्रकारच्या लोणच्यांची निर्मिती होते. उदा. लिंबू, लेमन क्रश (सालीसह),

लिंबू व हिरवी मिरची, ओल्या लाल मिरचीचा ठेचा, मिश्र लोणचे (आंबे हळदीसह)

-सुमारे पाच प्रकारच्या पावडरी. उदा. लिंबू, चिकू, कढीपत्ता, आवळा, शेवगा, गुळवेल.

-शेवगा बियांचे तेल, हर्बल टी

-सतीश यांची मुलगी सृष्टी बीएस्सी ॲग्री असून एमबीए करते आहे. तिचेच नाव ब्रँडनेमसाठी वापरले आहे.

-आवश्यक बहुतांश कच्चा माल स्वतःच्या फळबागेतून उपलब्ध होतो.

-घरानजीक ८८ बाय १२ फूट आकाराचे प्रक्रिया केंद्र उभारले आहे. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या खादी ग्रामोद्योग विभागाचे अर्थसाह्य झाले आहे.

विक्री व्यवस्था

पुणे, मुंबई, अंधेरी, नवी मुंबई, ठाणे, बेलापूर, नाशिक, पनवेल, डोंबिवली आदी भागांत कंपन्या व ग्राहक तयार केले आहेत. प्रसिद्ध हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत यांनाही काही उत्पादने पुरविली जातात. कोरोना काळात मुंबईतील उपनगरांमधील निवासी सोसायट्यांनाही त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने माल पुरवला आहे. सर्व प्रकारच्या पावडरींचे दर एक हजार रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहेत. १००, २०० व ५०० ग्रॅम या आकारातील पाऊचमध्ये ही उत्पादने उपलब्ध केली आहेत. शेवगा बिया तेलाचा दर प्रति १०० मि.लि.ला सहाशे रुपये असा आहे. सांधेदुखी, केस पांढरे होणे रोखणे आदी विविध समस्यांवर ते गुणकारी असल्याचे सतीश सांगतात. लोणच्यांचे दर किलोला २५० ते ३०० रुपये, तर ओल्या लाल मिरचीचा ठेचा ३०० रुपये किलो या दरात विक्रीस उपलब्ध आहे.

मार्गदर्शनासाठी सदैव तयार

सतीश यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) शिक्षण घेतले. जिज्ञासू वृत्ती, चिकाटी, सकस अन्य निर्मितीचा ध्यास यातून त्यांनी शेती व प्रक्रिया उद्योगात विकास साधला आहे. मुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाच्या ते सतत संपर्कात असतात. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, विषय विशेषज्ञ (अन्न व तंत्रज्ञान) तुषार गोरे यांचे मार्गदर्शन मिळते. अलीकडे बोलाई फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना सतीश यांनी केली आहे. या माध्यमातून कृषी प्रक्रिया व्यवसायाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. कृषिभूषण, शेतीनिष्ठ या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. आपल्या फळबागेत सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा त्यांनी आयोजित केल्या आहेत. एखाद्या वेळी कामात व्यस्त असल्यास शेतकऱ्यांनी फोन केल्यास ते संबंधित शेतकऱ्याला कधीही टाळत नाहीत. कामातून उसंत मिळाल्यानंतर त्याला पुन्हा सविस्तर फोन करून शंकांचे संपूर्ण समाधान करतात.

सतीश काटे, ९८९०८२५०३२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com