
पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कासेगावपासून पश्चिमेला पाच किलोमीटर अंतरावर भाटवाडी गावशिवार (Bhatwadi Village) आहे.
या गावातील कल्पना केसरे (Kalpana Kesare) यांनी उपक्रमशील महिलांना पूरक उद्योगातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी २०२० मध्ये पंचायत समितीकडे सौभाग्य स्वयंसाह्यता महिला बचत गटाची (Women self-help group) नोंदणी केली.
सध्या कल्पनाताई गटाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. पूरक उद्योगाची सुरुवात करताना कल्पनाताईंनी कुरडई, पापड यांसारखे उन्हाळी पदार्थ तयार केले.
गावशिवारातील अनेक कुटुंबातील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई येथे स्थायिक आहेत. या कुटुंबांच्याकडून कुरडई, पापडाची खरेदी सुरू झाली.
यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास केल्यावर त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची (Milk Processing ) संकल्पना सुचली.
प्रक्रिया उद्योगास सुरुवात ः
कल्पनाताईंना पहिल्यांदा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीची फारशी माहिती नव्हती. भट्टीवरील दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी असते हे लक्षात आल्यावर त्यांनी पलूस येथील बचत गटाशी संपर्क साधून दुग्धजन्य प्रक्रिया आणि पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रांची माहिती घेतली.
टप्प्याटप्प्याने परिसरातील ग्राहकांच्या मागणीनुसार दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीस सुरुवात केली. सुरुवातीला प्रक्रिया करताना दूध करपणे, खवा न बनणे अशा अडचणी आल्या.
परंतु हळूहळू त्यांनी प्रक्रियेमध्ये कौशल्य मिळविले. अनेक निरीक्षणे नोंदवून प्रक्रियेमध्ये बदल केला. टप्प्याटप्प्याने त्यांनी खवा तसेच पेढे निर्मिती आणि विक्रीस सुरुवात केली. गरजेनुसार प्रक्रियेसाठी डेअरीमधून दुधाची खरेदी केली जाते.
कल्पनाताईंकडे खवानिर्मितीसाठी चांगली यंत्रणा उपलब्ध आहे. सरासरी चार लिटर दुधापासून एक किलो खवा तयार होतो.
पेढ्यासाठी खवानिर्मिती करताना त्यामध्ये प्रमाणानुसार साखर आणि वेलदोडा पूड मिसळली जाते. खवा तयार झाल्यानंतर बचत गटातील महिलांच्या मदतीने मागणीनुसार पेढे निर्मिती केली जाते.
दुग्धजन्य पदार्थ निर्मितीच्या व्यवसाय करताना कुटुंबाचा व्याप कल्पनाताईंनी चांगल्या प्रकारे सांभाळला आहे. त्यांचे पती वायरिंगची कामे करतात. मुलगा सध्या इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे.
मजुरीवर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती ः
आज गावशिवारात बऱ्याच शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे आहेत. या शेतकऱ्यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रमासाठी पेढा, बासुंदीची मागणी असते.
ही मागणी लक्षात घेऊन कल्पनाताईंनी एक नावीन्यपूर्ण संकल्पना अमलात आणली. यामध्ये शेतकऱ्याने त्यांच्याकडील दूध द्यायचे आणि मजुरीवर पेढा, बासुंदी तयार करून घ्यायची.
या संकल्पनेला परिसरातील शेतकरी कुटुंबांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुटुंबाच्या मागणीनुसार दूध आटवून पेढे, बासंदी तयार करून दिली जाते. यासाठी प्रति लिटर दुधासाठी ६५ रुपये मजुरी आकारली जाते. कल्पनाताईंनी दूध प्रक्रियेमध्ये विविध प्रयोग केले. त्यांनी खरवसापासून बर्फी तयार केली आहे. यासदेखील ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
बचत गटांना मार्गदर्शन ः
सौभाग्य बचत गटातील महिलांचे पेढा, खवा, बासुंदी निर्मितीसाठी चांगले सहकार्य मिळते. गावात तीसहून अधिक महिला बचत गट विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
या महिला गटांच्या संघटक म्हणून कल्पनाताई काम पाहतात. या महिलांना विविध विषयांतील प्रशिक्षण तसेच कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन केले जाते.
तयार केला ब्रॅण्ड ः
योग्य गुणवत्ता आणि दर्जामुळे पेढे, खबा, बासुंदीला गाव परिसरातील ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. पेढ्यांची विक्री गावामध्ये तसेच वाटेगाव, काळमवाडी, नेर्ले, इस्लामपूर तसेच शिराळा आणि कराड तालुक्यातील काही गावांतून केली जाते.
गाव परिसरातील ग्राहक फोनवरून उत्पादनाची ऑर्डर देतात. सण-समारंभाची मोठी ऑर्डर असेल तर दूध डेअरीमधून जास्तीची दूध खरेदी केली जाते.
खवा आणि पेढ्याची पाचशे रुपये प्रति किलो दराने विक्री होते. मागणीनुसार बासुंदी निर्मिती केली जाते. बासुंदीची सत्तर रुपये पाव किलो या दराने विक्री होते.
कल्पनाताईंनी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी प्रमाणपत्र घेतले आहे. तसेच उद्योग आधार अंतर्गत नोंदणी केली आहे. बाजारपेठेत उत्पादनांना स्वतंत्र ओळख मिळण्यासाठी ‘सारथी फूड प्रॉडक्ट’ असा ब्रॅण्ड तयार केला आहे.
दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगातून सध्या दरमहा नऊ हजारांची उलाढाल होते. येत्या काळात ताक, दही, लस्सी तसेच पनीर निर्मितीचे नियोजन त्यांनी केले आहे.
सेंद्रिय परसबागेला चालना ः
दूध प्रक्रिया उद्योग करताना कल्पनाताईंनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी परसबागेला चालना दिली आहे. या परसबागेत विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.
त्यांच्याकडे खिलार गाय आहे. कल्पनाताई शेणखत, जिवामृत तयार करून परसबागेतील भाजीपाल्यासाठी वापरतात.
परसबागेच्या बरोबरीने त्यांनी घरच्या दोन एकर ऊस शेतीत आंतरपीक म्हणून भाजीपाला लागवड केली आहे. गावातील आठवडा बाजारात या भाजीपाल्याची विक्री केली जाते.
परसबागेच्या उपक्रमामध्ये वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, समन्वयक विजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
संपर्क ः कल्पना केसरे, ८७८८२६७३४१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.