Onion Seed Production
Onion Seed ProductionAgrowon

Onion Seed Production : उत्तम बीजोत्पादन, यांत्रिक प्रतवारीद्वारे दर्जेदार कांदा बी निर्मिती

सातारा जिल्ह्यातील सायगाव येथील प्रगतिशील शेतकरी अजित आपटे यांची कांदा बीजोत्पादन करणारी तिसरी पिढी कार्यरत आहे. शेतकऱ्यांसोबत करार शेती, ग्रेडर, ग्रॅव्हिटी सेपरेटर या तंत्रज्ञानांचा वापर करून उत्तम गुणवत्तेचे कांदा बियाणे निर्मिती त्याद्वारे केली जाते. विक्रीचे स्वतःचे मॉडेल तयार करून शेतकऱ्यांना खात्रीचे बियाणे देण्यातही त्यांनी ओळख निर्माण केली आहे.

सातारा जिल्ह्यात सायगाव (ता. जावळी) येथील अप्पासाहेब आपटे यांची देशाच्या स्वातंत्र काळातील प्रगतिशील शेतकरी (Farmer) अशी ओळख आहे. पुणे येथे शेतमाल विकत असताना कांदा (Onion Seed) बी व्यवहार त्यांच्या बघण्यात आले. त्यांनी गरवा बी खरेदी करून आपल्या शेतात लागवड केली. तयार झालेले कांदाबी पुणे येथे विकण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या चांगला वाटल्याने टप्प्याटप्प्याने व्यवसायात वाढ केली.

Onion Seed Production
Onion Rate : नगरमध्ये दुसऱ्यांदा पडले कांद्याचे दर

गाव परिसरातील शेतकऱ्यांनाही त्यांनी या व्यवसायाचे धडे देत बीजोत्पादनांकडे वळविले. त्यांच्या बरोबरीने चिरंजीव श्रीकांत यांनीही जबाबदारी स्वतःकडे घेत व्यवसायात वाढ केली. त्यांचे चिरंजीव अजित यांनी बी कॅाम, एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी न करता शेतीचाच वारसा पुढे सुरू ठेवला. आपटे कुटुंबीयांची २० एकर बागायती शेती आहे. त्यात हळद, ऊस, कांदा बीजोत्पादन अशी पद्धती त्यांनी सुरू ठेवली. सुरुवातीच्या काळात हळद ते मोठ्या प्रमाणात करायचे.

हळद शिजवण्याचे कष्ट व खर्च वाढत असल्याचे जाणवले. त्या वेळी वाफेवर हळद शिजवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. ८०० किलो क्षमतेचा हळदीसाठी कुकरही तयार करून घेतला होता.त्याद्वारे कष्ट, आर्थिक व वेळेची बचत होण्यास मोठी मदत झाली.

यांत्रिक पद्धतीने बीजोत्पादन

अजित दरवर्षी तीन चे चार एकरांत कांदा बीजोत्पादन करतातच. शिवाय शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडूनही बीजोत्पादन करण्याची करार शेती सुरू केली. सुरुवातीच्या काळात काही अडचणींना सामोरे जावे लागे. बी काढण्यासाठी प्रथम बडवून काढण्याची पद्धत होती. मग बोंडाची मळणी यंत्राद्वारे करून पाहिली. त्यात बियाण्याची हानी होत नसल्याचे लक्षात आले. पुढील टप्प्यात अडीच लाख रुपये किमतीचे ग्रेडर खरेदी केली. त्यानंतर २०१० मध्ये तीन लाख किमतीचे ग्रॅव्हिटी सेपरेटर घेतले. आता या यंत्राद्वारे दर्जेदार बियाणे तयार होऊ लागले आहे.

Onion Seed Production
Onion Rate : देशात कांदा आवक घटल्याने दर वाढले | Agroowon | ॲग्रोवन

दर्जेदार बियाणेनिर्मिती प्रक्रिया

-करारातील शेतकऱ्यांना बीजोत्पादन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.

-त्यांच्याकडील कांद्याची बोंडे तयार झाल्यावर ती खुडली जातात.

- सहा- सात दिवस उन्हात सुकविली जातात.

- शेतकऱ्यांकडे मळणी यंत्र (थ्रेशर) पाठवण्यात येते. विशिष्ट चाळण लावून मळणी होते.

- थ्रेशरमध्ये तयार झालेले बी आपटे यांच्या प्रक्रिया जागेत येते.

- ‘ग्रेडर’मध्ये प्रक्रिया करून बारीक, अति बारीक तसेच हलके बी बाजूला निघते.

- त्यानंतर बियाणे ‘एलिव्हेटर’द्वारे ‘ग्रॅव्हिटी सेपरेटर’कडे जाते.

- त्यात उर्वरित हलके बियाणे वेगळे होऊन दर्जेदार वा उत्तम बियाणेच शिल्लक राहते.

- बीजप्रक्रिया होऊन ते विक्रीसाठी तयार होते. प्लॅस्टिक बॅग व बारदान पॅकिंग होते.

- १०० किलो बियाण्यांपासून प्रतवारीनंतर ८५ किलो दर्जेदार बियाणे तयार होते.

- यंत्राद्वारे दिवसाला दीड ते दोन टन बियाणे तयार होते.

Onion Seed Production
Onion Rate : कांदा दरात सुधारणा

कांदा बीजोत्पादन वैशिष्ट्ये

- ५० वर्षांहून अधिक काळ उत्तम दर्जाच्या बियाण्याची निर्मिती

- परिसरातील सुमारे १०० शेतकऱ्यांसोबतचे त्यासाठी ‘नेटवर्क’

-शेतकऱ्यांकडून घेताना व अन्य शेतकऱ्यांना तयार बियाणे विकताना दोन्ही वेळेस उगवण क्षमता तपासली जाते.

- एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे बियाणे विकले जात नाही.

-करार शेतीतील शेतकऱ्यांना प्रति किलो ६०० रुपये दर, तर विक्रीसाठी हा दर ७५० ते ८०० रुपये.

विक्रीचे असेही मॉडेल

अजित यांनी आपल्या बियाण्याचे विश्‍वासाचे नाव तयार केले आहे. त्यामुळेच वर्षाकाठी १० टन ते १५ टन बियाणे विक्री होते. विक्रीचे मॉडेलच त्यांनी विकसित केले आहे. यात परिसरातील प्रत्येक गावात खात्रीच्या व्यक्तीची नेमणूक केली आहे. त्याद्वारे त्या त्या गावात बियाण्याची विक्री होते. त्यासाठी योग्य कमिशनही दिले जाते. ‘एमबीए’चे शिक्षण असा प्रकारे प्रत्यक्ष उपयोगात येऊन ते यशस्वी झाल्याचे अजित सांगतात.

Onion Seed Production
Crop Loan : रब्बी पीककर्जाचे १३.६६ टक्के वाटप

बीजोत्पादनावर परिणाम

‘ॲग्रोवन’मध्ये जमिनीत बुरशीचा होत असलेला संसर्ग, रोपांना मर लागणे व त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचा लेख वाचनात आला. यावर उपाय म्हणून बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करण्याचे ठरविले. त्यासाठी पुणे येथील साडूंकडून विजेवर चालणारे यंत्र तयार करून घेतले. बी या यंत्रात टाकले जाते. एक किलोस दोन ते तीन ग्रॅम बुरशीनाशक पावडरचा वापर करून त्याचा उपचार केला जातो.

त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान कमी होत नसल्याचे आपटे सांगतात. अलीकडील काळात अवकाळी पाऊस, रोगराई आदी कारणांमुळे एकरी दोन ते अडीच क्विंटल बीजोत्पादन मिळते. मधमाशांच्या शंभर पेट्या ठेवल्या जातात. मात्र अवकाळी पावसात त्यांचा उपयोग न झाल्याने परागीभवन होत नसल्याच्या समस्या येत असल्याचे ते सांगतात.

अन्य शेती

आपटे ऊस, काकडी आदी पिके घेतात. बिग बास्केटला त्यांची काकडी जाते. आंबा, केळी व विविध फळांची झाडे आहेत. अजित ॲग्रोवनचे नियमित वाचक असून, आवश्यक कात्रणांचा त्यांची संग्रह केला आहे. कांदा बीजोत्पादनासह शेती घडवण्यात ॲग्रोवनचा मोठा वाटा असल्याचे ते सांगतात.

अजित आपटे-९८२२४५११४५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com