
वाशीम जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत अशी शिरपूरची ओळख आहे. येथे प्रसिद्ध अंतरीक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर असून, देशभरातील भाविक वर्षभर भेट देतात. जैनांची काशी अशीही गावची पूर्वापार ओळख आहे. जानगीर महाराज संस्थान, मिर्झामीयाँ दर्गा ही स्थळे राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीके म्हणून ओळखली जातात. गावात कापड, सोने-चांदी, धान्य खरेदी-विक्रीची बाजारपेठ आहे.
हळदीत अग्रेसर
पूर्वी गाव पानमळे, केळीसाठी प्रसिद्ध होते. पुढे पाण्याची उपलब्धता कमी झाली. नंतरच्या काळात भाजीपाला उत्पादनात अनेक जण पुढे आले. सोयाबीनचा पर्याय मिळाल्यानंतर कपाशीचे क्षेत्र कमी झाले. मागील पाच- सात वर्षांत शेतकऱ्यांचा कल हळदीकडे वाढला. आज या पिकात शिरपूर हे जिल्ह्यातील
अग्रेसर गाव झाले आहे. शासकीय नोंदीनुसार गावात पावणेदोनशे हेक्टर हळदीचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांच्या मते ते दोन हजार एकर किंवा त्याहून अधिक असावे. ज्यांच्या शेतात विहीर, बोअर किंवा पाण्याची संरक्षित सोय आहे तो शेतकरी हे पीक घेतोच अशी स्थिती आहे.
उत्पादन, बाजारपेठ
एकरी सरासरी उत्पादन २० ते २५ क्विंटल (वाळवलेले) असून, काही शेतकऱ्यांनी ३५ क्विंटलचा टप्पा गाठला आहे. शिरपूरच्या हळदीची हिंगोली, वसमत, रिसोड या बाजारपेठांत विक्री होते. शिरपूरला उपबाजार आहे. पण व्यापारी खरेदी करीत नसल्याने अन्यत्र जावे लागते. तीन-चार वर्षांत क्विंटलला सरासरी पाच ते सात हजारांपर्यंत दर मिळाला. कोरोना काळ व त्यापूर्वीची दोन वर्षे सोडली तर दर चांगले मिळाले. दरांत चढ-उतार होत राहतात. नफ्याचे प्रमाण घटते. मात्र या पिकाने आर्थिक स्थैर्य दिले आहे. कर्जबाजारीपणा कमी होण्यास मोठा हातभार लागल्याचे शेतकरी सांगतात. एकरी ५० हजारांपासून ९० हजारांपर्यंत उत्पादन खर्च करणारे शेतकरी आहेत. मजुरीचे दर वाढले आहेत. निविष्ठांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. हळदीत सर्वांत जास्त खर्च काढणी व प्रक्रियेवर होतो. त्यामुळे खर्च कमी करणाऱ्या नवनवीन यंत्रांची गरज हळद उत्पादक व्यक्त करतात.
व्यवसाय वृद्धी
गावात एकूण ३० हजार ते ५० हजार क्विंटल हळदीचे उत्पादन होत असावे. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गावात येतात. शिरपूरची बाजारपेठ मोठी आहे. पन्नासहून अधिक गावांचा संपर्क आहे. शेतीतील प्रयोगशीलता वाढल्याने कृषी आधारित बाजारपेठही विस्तारत आहे. गावात ३० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र आहेत. ट्रॅक्टर्सची संख्या केव्हाच शेकडोंच्या घरात पोहोचली. अवजारे, यंत्रांची निर्मिती, ठिबक, स्प्रिंकलर आदी व्यवसाय वाढले. त्यातून रोजगार निर्माण झाला. शेतीत मजुरांना वर्षभर काम मिळाले. आज शेतीत काम करणारी महिला २०० रुपयांपर्यंत दररोज उत्पन्न मिळवते.
शेतीतील प्रयोगशीलता
गावचा संरक्षित शेतीकडे कल वाढला आहे. शेडनेट उभे राहत आहेत. कांदा बीजोत्पादन व्यावसायिक पद्धतीने घेतले जाते. त्याचे क्षेत्र सुमारे २०० हेक्टरपर्यंत असावे. ६५ हेक्टरवर फळबागांची नोंद आहे. गावाचे लागवड क्षेत्र ३४०२ हेक्टर असून, ८५३ हेक्टरवर सिंचनाची सोय झालेली आहे. मिर्झापूर लघू सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याचा फायदा लगतच्या गावांना होऊ लागला आहे.
प्रतिक्रिया
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.