
Success Story : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील ‘कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताच चौपटीने घ्यावे’...या ओव्यांनी सिंधी काळेगाव (जि. जालना) येथील उद्योजिका सीताबाई रामभाऊ मोहिते यांचे जीवन बदलले.
प्राथमिक टप्प्यांत सीताबाईंनी आवळ्यावर प्रक्रिया सुरू केली. आवळा कॅण्डी निर्मितीपासून (Making amla candy) सुरू झालेला उद्योग आता चौदा प्रक्रिया पदार्थांवर पोहोचला आहे. या उद्योगातून लाखोंची उलाढाल होत आहे. प्रक्रिया उद्योगाच्या वाटचालीमध्ये रामभाऊ यांची समर्थ साथ लाभली आहे.
केवळ अक्षर ओळखीपुरते शिक्षण घेतलेल्या सीताबाई आणि रामभाऊ मोहिते यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण. घोडेगाव शिवारात एकत्र कुटुंबात त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती. विभक्त झाल्यानंतर दीड एकर वाट्याला आली.
कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी सीताबाई आणि रामभाऊ यांनी १९९७ मध्ये खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात रोपवाटिकेचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सिंधी काळेगाव मध्ये सहभागी तत्त्वावर रोपवाटिका सुरू केली.
सुरूवातीस सामाजिक वनीकरण विभागासाठी आवश्यक रोपांची निर्मिती सुरू केली. २००३ मध्ये त्यांनी रोपवाटिकेतील आवळ्याच्या मातृवृक्षावर उत्पादित होणाऱ्या फळांवर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली.
२०० रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरुवात
सीताबाई मोहिते यांनी शिलकीत असलेल्या २०० रुपयांची गुंतवणुकीमध्ये दोन किलो आवळा कॅण्डी तयार केली. त्याची परिसरामध्ये विक्री करून प्रक्रिया उद्योगास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने ग्राहकांच्या मागणीनुसार प्रक्रिया उद्योगात वाढ सुरू केली.
हे करताना मिळणारे पैसे प्रक्रिया उद्योगात गुंतवणे सुरू ठेवले. २००५ मध्ये जालना येथे शेतकरी संघटनेच्या अधिवेशनातील स्टॉलवरून आवळा कॅण्डी, आवळा सरबत, वाळलेली हरभऱ्याची भाजी आदी पदार्थांच्या विक्रीतून १२०० रुपये नफा मिळाला. यातून नवीन ग्राहक जोडले गेले.
प्रक्रिया पदार्थांच्या विक्रीतून आलेल्या पैशातून सीताबाईंनी २००५ मध्ये बॅंक ऑफ बडोदा शाखेमध्ये श्री भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग या नावाने खाते उघडून व्यवहार सुरू केले. २००७ मध्ये सिंधी काळेगाव येथे अर्धा एकर जमीन विकत घेतली.
२००९ पर्यंत बॅंक खात्यावर झालेल्या व्यवहारामुळे बॅंकेने मोहिते यांना २२ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यामधून अर्धा एकर जागेवर प्रक्रिया उद्योगाची इमारत उभी राहिली. प्रक्रियेसाठी आवळा कीस यंत्र, आवळा फोडी निर्मिती यंत्र, आवळा मुरंबा निर्मिती यंत्र, बॉयलर आणि ड्रायरची खरेदी केली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आकर्षक पॅकिंग तयार केले.
केवळ आवळा कॅण्डी, सिरप निर्मितीपुरता मर्यादित असलेला प्रक्रिया उद्योगाला सीताबाईंनी टप्प्याटप्प्याने गती दिली.
बाजारपेठेच्या मागणीचा अभ्यास करून आवळा-गुलाब गुलकंद, आवळा चूर्ण, त्रिफळा चूर्ण, आवळा फेस वॉश, हर्बल चहा, आवळा मंजन, आवळा -शिकेकाई पावडर, आवळा केश अर्क, आवळा ज्यूस, गुलाब-आवळा सरबत, आवळा गूळ कॅण्डी, आवळा चटपटी मसाला कॅण्डी, आवळा सुपारी अशी चौदा उत्पादने बाजारपेठेत आणली. चहाचे मार्केट ओळखून अलीकडेच त्यांनी तुळस, गवती चहा, सुंठ, वेलची प्रमाणशीर एकत्र करून चहा मसाला तयार केला आहे.
इमारतीच्या तळघरात पाणीसाठा
पाण्याशिवाय शेती नाही हे लक्षात घेत प्रक्रिया उद्योगासाठी इमारतीची उभारणी करताना तळघरात दोन लाख लिटर पाणी साठविले जाईल असा टॅंक बांधला. त्यावर १५०० चौरस फूट प्रक्रिया उद्योगासाठी हॉल बांधला. त्यावर निवासाची व्यवस्था केली. इमारतीच्या तळघरात केलेला पाणीसाठा २०१२ मधील दुष्काळात रोपवाटिकेतील मातृवृक्षांसाठी उपयोगी ठरला.
उद्योगातील सातत्य...
-दर्जा, उत्पादनात सातत्य. दरवर्षी १० टन आवळ्यावर प्रक्रिया.
- तीन महिने प्रक्रिया आणि वर्षभर विक्री. १५ लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल.
-सहा शेतकऱ्यांकडून आवळ्याची खरेदी. बाजारभावापेक्षा एक रुपया चढा दर.
-नऊ मजुरांना बारमाही रोजगार.
-राज्यभरातील प्रदर्शनात स्टॉल लावून विक्री. आता निर्यातीसाठी प्रयत्न.
-राज्यभरात दीड हजार कायमस्वरूपी ग्राहक.
- उद्योगाविषयी १५०० व्याख्यानातून मार्गदर्शन.
-२००९ मध्ये सकाळ-मिटकॉनकडून सुवर्णपदकाने गौरव.
- थायलँडचा अभ्यास दौरा.
-मुलांचे उच्चशिक्षण. मुलगा शिवराज याची प्रक्रिया उद्योगात मदत.
संपर्क - सीताबाई मोहिते ९४०३८८६०४७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.