सोरतापवाडी झाले ‘नर्सरीचे हब’

पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी गाव हे विविध पिकांच्या रोपवाटिकेसाठी म्हणजे ‘नर्सरी हब’च झाले आहे. गावातील बहुतांश कुटुंबे या व्यवसायात गुंतली असून त्यांचे कौटुंबिक व शेतीचे अर्थकारण त्यातून सक्षम झाले आहे. मोठ्या आर्थिक उलाढालीसह ग्रामविकासातही गावाने उल्लेखनीय आघाडी घेतली असून, ‘स्मार्ट व्हिलेज’ अशी ओळख तयार केली आहे.
Nursery
NurseryAgrowon

पुणे- सोलापूर महामार्गावर पुणे शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर सोरतापवाडी गाव आहे. लोकसंख्या सुमारे १५ हजारांच्या आसपास असून, भौगोलिक क्षेत्र ८६४ हेक्टरपर्यंत आहे. गावातून दोन कॅनॉल्स जात असल्याने परिसर बागायती (Horticulture) आहे. वीस ते २२ वर्षांपूर्वी गावात मोठ्या प्रमाणात फुलशेती (Floriculture) व्हायची. ८० ते ९० टक्के शेतकरी फुलशेती (Flower Farming) (गुलाब, गुलछडी) आणि ऊस घ्यायचे. बदलत्या वातावरणात रोग- किडींचा प्रादुर्भाव, वाढता खर्च व तुलनेने मिळणारे उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. बाजारपेठेतील मागणी व संधी यांचा अभ्यास करता ‘नर्सरी’ (रोपवाटिका) (Nursery) हा पर्यायी व्यवसाय पुढे आला.

Nursery
Nursery : खात्रीशीर रोपांसाठी गावडे पाटील नर्सरी

नर्सरी व्यवसायाकडे वाटचाल :

सन १९९९ च्या दरम्यान गावातील दत्तात्रेय चौधरी, प्रवीण चौधरी, योगेश थेऊरकर, शशिकांत चौधरी सुहास चोरघे, अमित चौधरी आदींनी पुढाकार घेतला. टप्प्याटप्प्याने गावातील अन्य शेतकरीही या नर्सरी व्यवसायात उतरले. अडचणी व संकटांवर मात करीत तो विस्तारला. आजमितीस प्रत्येक कुटुंबाकडे दहा गुंठ्यांपासून दहा- पंधरा एकरांपर्यंत हा व्यवसाय आहे. गावात कुटुंब संख्या सुमारे एकहजार ते १२०० च्या दरम्यान असून जवळपास ४०० कुटुंबे या व्यवसायात गुंतली असावीत. सुमारे ५०० हेक्टर क्षेत्र त्याखाली असावे.

Nursery
Nursery: भाजीपाला पिकांची रोपवाटिका कशी कराल ?

व्यवसायाचे स्वरूप :

रोपनिर्मितीसाठी गावातील वातावरण पोषक आहे. त्यामुळे रोपांची वाढ व गुणवत्ता चांगली मिळते. रोपांची सुरुवातीची निगा, छोट्या पिशव्यांमधून मोठ्या पिशव्यांमध्ये स्थलांतर, कलमे बांधणे, प्रतवारी करणे, रोपांच्या वयानुसार किंमत ठरवणे, नेहमीच्या ग्राहकांना नवीन रोपांची माहिती देणे, वाहनांमध्ये रोपे भरून देणे आदी कामे व सेवांमध्ये गावातील शेतकरी कुशल झाले आहेत. ग्राहकांना चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध करून देण्याबरोबर उतिसंवर्धित रोपांची निर्मिती करण्यावरही भर दिला आहे. गावातील अमित चौधरी यांनी प्रयोगशाळा उभा केली आहे. त्याद्वारे शोभेची झाडे (इनडोअर प्लॅंट्‌स) देखील उपलब्ध केली जातात.

गावात तयार होणारी रोपे (प्रातिनिधिक)

शोभिवंत फुले ः गुलाब, मोगरा, जास्वंद, जाई, जुई, सदाफुली, चिनी गुलाब, पारिजात, मोरपंखी.

औषधी वनस्पती ः गवती चहा, कोरफड, तुळस, रुई, कांडवेल, गुळवेल.

फळझाडे ः नारळ, पेरू, डाळिंब, सीताफळ, कलमी आंबा, चिकू, जांभूळ.

वनवृक्ष ः वड, पिंपळ, करंज, कांचन, सिल्व्हर ओक, पाम, बॉटल पाम.

इनडोअर ः मनी प्लॅट, नागफणी, जामिया, स्नेकप्लॅंट.

मागणी व विक्री व्यवस्था

पुणे शहरासह, मुंबई, नगर, नाशिक, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून रोपांना मागणी आहे.

परराज्यांतील दिल्ली, हरियाना, चेन्नई, केरळ, पश्‍चिम बंगाल,

भोपाळ, गुजरात आदी ठिकाणीही

रोपे जातात. मोबाईल, ई-मेलवरून ‘ऑर्डर्स’ येतात. बांधकाम क्षेत्रातूनही मागणी वाढली आहे.

थेट विक्रीवर अधिक भर असल्याने वाहतुकीचा मोठा खर्च कमी होण्यास मदत झाली आहे.

दोन ते ५ वर्षे वयाची रोपे उपलब्ध केली जातात. वनस्पतीनिहाय प्रति रोप १५ ते कमाल ४५०० रुपयांपर्यंत त्यांचे दर असतात.

उलाढाल

गावात प्रति नर्सरीधारक महिना किंवा हंगामात एक ते दोन लाख रुपयांपर्यंत उलाढाल करतो. या माध्यमातून काही कोट्यवधींची उलाढाल करण्याची क्षमता गावाने तयार केली आहे. कुंड्या, कोकोपीट, लाल माती, पिशव्या, शेणखत विक्री अशा पूरक व्यवसायांनाही याद्वारे चालना मिळाली आहे. या व्यवसायात गावासह गावाबाहेरील तरुणांनाही रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रति नर्सरीधारकाकडे पाच ते दहा वा काही वेळा त्याहून अधिक मजूर काम करतात. प्रति दिन ४०० ते ५०० रुपये मजुरी मिळते.

ग्रामविकासातही आघाडी

सोरतापवाडीने ग्रामविकासातही आघाडी घेतली आहे. महिलांना नर्सरी व्यवसायासोबत रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शेतीमाल प्रक्रिया, भरड धान्य प्रक्रिया, केक, बिस्किटे, एम्ब्रॉयडरी आदींचा त्यात समावेश आहे.

वृक्षारोपणावर भर

गावात वड, पिंपळ, गुलमोहर, सिल्व्हर ओक अशी ८०० हून अधिक रोपांची लागवड आहे. त्यामुळे गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी दिसून येते. ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण यांचे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे प्रयत्न असतात.

ठळक बाबी

-स्वच्छ पाण्याचा पुरवठा व आजारांपासून प्रतिबंध म्हणून ग्रामपंचायतीतर्फे सुमारे ३०० कुटुंबांना

‘आरओ’ फिल्टर यंत्रणेचे पाणी मोफत उपलब्ध. असे तीन प्लांट बसविले आहेत. पुणे शहरातील समाजसेवकांचीही त्यासाठी मदत.

-ग्रामपंचायतीत सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर. गावातील दिवेही सौरऊर्जेवर चालवण्यासाठी

पुढाकार.

-गावात दररोज स्वच्छता. दर रविवारी गावातील काही समाजसेवकांचेही त्यासाठी योगदान.

प्लॅस्टिक बंदीही घालण्यात आली आहे.

स्मार्ट व्हिलेज पुरस्कार :

पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन, वृक्षारोपण, संवर्धन, करवसुली, सुविधा, पर्यावरण सौदर्य, संतुलित आरोग्य आदींसह महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात सोरतापवाडी आघाडीवर आहे. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत दहा लाख रुपये किमतीचा आर. आर. पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार (२०२१- २०२२) यंदाच्या १५ ऑगस्ट रोजी गावाला राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.

गावाने ‘नर्सरी’ व्यवसायात चांगलीच भरारी घेतली आहे. ‘स्मार्ट व्हिलेज’ पुरस्कारासाठी आमच्या गावाची झालेली निवड ही अभिमानाची बाब आहे. ग्रामस्थ, शासकीय पातळीवरील निधी, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत आदी सर्वांचे योगदान त्यामागे कारणीभूत आहे.

संध्या अमित चौधरी, सरपंच, सोरतापवाडी

जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणे व विकास मॉडेल उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शंकर कड, उपसरपंच,

९४२३०५५९६३

ग्रामस्थांनी बदलत्या काळानुसार व्यवसायात बदल केला आहे. पुणे शहराच्या आसपास हडपसर ते यवत या मुख्य महामार्गालगतच्या नर्सरींमध्ये सर्वाधिक व्यावसायिक सोरतापवाडीत आहेत.

अमित चौधरी, नर्सरी व्यवसायधारक, सोरतापवाडी, ९८५०११९९८८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com