Spices
SpicesAgrowon

Spices : शेतकरी कंपनीद्वारे मसाल्यांना दिली बाजारपेठ

ढगा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील युवक युवराज ठाकरे यांनी आपल्यातील अपंगत्वावर मात करीत युवा-भाग्य फूड्स प्रोड्यूसर शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. हळद, मिरची, धना आदी पावडरी, ढोकळा पीठ आदी विविध मसाला उत्पादनांची निर्मिती करून त्यास बाजारपेठही मिळवली आहे. या निमित्ताने गटातील शेतकऱ्यांकडील कच्च्या मालासही उठाव मिळाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील ढगा (ता. वरुड) येथील युवराज आनंदराव ठाकरे यांची दहा एकर शेती आहे. जन्मतः पायाने अपंग असल्याने विविध कामांवर मर्यादा होत्या. पण खचून न जाता हिमतीने व प्रयत्नपूर्वक त्यांनी ‘एटीडी’ व ‘जीडीए’पर्यंत शिक्षण घेतले. चार वर्षे खासगी संस्थेत कला शिक्षक म्हणून काम केले. परंतु त्यात मन रमले नाही. शेतीतच काही करावे असे मनात होते. वडील आनंदराव शेतीची (Agriculture) जबाबदारी पाहतात. सोयाबीन (Soybean), कपाशी आदी पारंपरिक पिके ते घेतात. ‘ड्राय झोन’ (Dry Land) असल्याने या भागात बोअरवेल घेण्यावर बंदी आहे. परिणामी, सिंचन सुविधा (Irrigation Facility) बळकटीकरणालाही मर्यादा आहेत. त्यामुळे प्रक्रिया उद्योग (Processing Industry) हा अधिक महत्त्वाचा पर्याय वाटला. (Spices Marketing Through Farmer Producer Company)

Spices
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसाले

कंपनीची स्थापना

सन २०२० मध्ये शेतीवर आधारित प्रक्रिया व्यवसायाचा विचार पुढे आला. त्यातून युवराज यांनी शेतकरी कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यातून युवा-भाग्य फूड्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. अध्यक्ष युवराज तर त्यांचे बंधू नितीन ठाकरे सचिव झाले. त्यांच्यासह ११ संचालक असून, कंपनीच्या भागधारकांची संख्या १२० आहे. बारमाही उद्योग सुरू राहील यादृष्टीने विचारमंथन सुरू झाले. त्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने अनेक व्यवसायांवर गंडांतर आले. मात्र खाद्य उत्पादने व त्यातही मसाले उत्पादनांना मागणी असल्याचे लक्षात आले. त्यासाठी आवश्‍यक ऑफलाइन प्रशिक्षणाला कोरोनामुळे मर्यादा आल्या. मग जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ते ऑनलाइन पूर्ण केले. प्रयत्नांती ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’कडून आठ लाख रुपयांचे कर्ज मिळाले.

Spices
`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे उपकेंद्र मंजूर करा`

उत्पादने निर्मिती

भांडवल उपलब्धतेनंतर पल्वरायजिंग, मिक्सिंग व पॅकेजिंग आदींसाठी यंत्रे घेण्यात आली. सुमारे चार लाख रुपयांचा खर्च झाला. साडेतीन हजार चौरस मीटर क्षेत्रावर प्रकल्पाची उभारणी केली. या ठिकाणी मिरची पावडर, हळदी, धना पावडर, खमंग ढोकळा पीठ, गहू आटा अशी उत्पादने तयार केली जातात. घरगुती ग्राहकांसाठी ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, ५०० ग्रॅम अशा पॅकिंगमध्ये तर मोठ्या व्यावसायिकांसाठी ४५ किलोच्या पॅकिंगमधून मिरची पावडरचा पुरवठा होतो. खमंग ढोकळा पीठ ५०० ग्रॅम, गहू आटा पाच किलो, ५० किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध केला आहे. प्रति किलो गहू आटा २५ रुपये, खमंग ढोकळा १८० रुपये, मिरची पावडर २०० रुपये, हळद पावडर १२० रुपये, धना पावडर १४० रुपये अशा वितरकांसाठीच्या किमती आहेत. उत्पादनांचे आकर्षक लेबल व पॅकिंग तयार केले आहे.
दहा महिलांना बारमाही रोजगार उपलब्धता झाला आहे.

Spices
नारळासह मसाले पिकांसाठी भाट्ये येथील संशोधन केंद्र

कच्च्या मालाची खरेदी

कंपनीचे भागधारक बहुतांश शेतकरी आहेत. त्यांच्याकडील शेतीमालाचे नमुने मागविले जातात. मालाचा दर्जा पाहून बाजारपेठेतील दरांपेक्षा काही रक्कम अधिक देऊन थेट खरेदी होते. यंदाच्या हंगामात पाच टन मिरचीची खरेदी झाली. कंपनीने पाच प्रकारच्या मिरची वाणांचे एकत्रीकरण करून नैसर्गिक लाल रंग व चव मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. हळद पावडर निर्मितीसाठी सेलम आणि वायगाव या दोन वाणांचा उपयोग होतो. यंदा सहा टन हळदीची खरेदी झाली. लोकवन गव्हाची खरेदी मध्य प्रदेशातील बाजारातून होते.

ढोकळा पीठनिर्मिती

खमंग ढोकळा पीठ नाशिवंत मालाच्या श्रेणीत येते. त्यामुळे बाजारातील मागणी लक्षात घेऊनच उत्पादन होते. महिन्याला सुमारे २०० किलोची मागणी असते. त्यासाठी हरभरा, मूग, तांदूळ चुरी व अन्य पाच डाळींचा वापर होतो. प्रति किलो पीठ तयार करण्यासाठी साहित्यावर १०० रुपये खर्च होतो. उत्पादनांसाठी आवश्यक ‘एफएसएसएआय’ परवाना प्राप्त केला आहे.

...अशी शोधली बाजारपेठ

सुरुवातीला नागपूर येथील परिचित, वैद्यकीय व्यवसायिकांना उत्पादनांचे नमुने देण्यात आले. चवीने भुरळ घातल्याने त्यांच्याकडून मागणी वाढली. मग नागपुरातील किरकोळ किराणा व्यावसायिक व मोठे मॉल यांच्याशी संपर्क साधत ऑर्डर्स मिळविल्या. नागपूर येथे दररोज सुमारे २०० किलोपर्यंत सर्व प्रकारच्या मसाल्यांची विक्री होते. कमिशन आधारे पाच वितरकांची नेमणूक केली आहे. काही घाऊक विक्रेते कंपनीतून थेट माल घेऊन जातात. वरुड तालुक्यातील काही विक्रेत्यांकडून मागणी असून, ऑनलाइन विक्री करणाऱ्या काही कंपन्यांच्या ‘प्लॅटफॉर्म’ वरही उत्पादने उपलब्ध केली आहेत. दीड वर्षाच्या कालावधीतच पहिल्या ऑडिटमध्ये कंपनीची उलाढाल आठ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

वार्तापटाची निर्मिती

अपंगत्व असल्याबाबत तक्रार करीत न बसता शेतकरी कंपनी स्थापन करून मसाला उद्योग उभारला व बाजारपेठ शोधली. अशा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या युवकांना इंदूर येथील एका संस्थेद्वारा राष्ट्रप्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी युवराज यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यावर प्रेरित होऊन कोलकता येथील सुबेंदू दास त्यांनी ‘आत्मनिर्भर’ हा वार्तापट (डॉक्युमेंटरी) तयार केली. आवश्‍यक प्रक्रियेनंतर ती प्रदर्शितच होईल.

संपर्क ः युवराज ठाकरे, ९७३०५४०३९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com