Poultry : अल्पभूधारकाचे ‘हॅचरी’सह कुक्कुट व शेळीपालन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळबांबर्डे (ता. कुडाळ) येथील हर्षद धामापूरकर या तरुणाने एक हाती ‘हॅचरी’ व त्यास गावरान कुक्कुटपालन, शेळीपालन आणि नव्याने बटेरपालनाची जोड दिली आहे. शेतीचे क्षेत्र अत्यंत अल्प असल्याने या पूरक व्यवसायांना एकहाती सांभाळत हर्षद यांनी कुटुंबाचे अर्थकारण मजबूत केले आहे.
Poultry
PoultryAgrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे गाव आहे. भातासह नारळ, सुपारी, कोकम (Kokam) अशी पिके गावात होतात. गावातील तेलीवाडी येथे हर्षद दत्ताराम धामापूरकर या युवकाचे घर आहे. बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संगणकीय (हार्डवेअर) पदविका घेतली. त्यांच्याकडे आठ ते दहा गुंठेच जमीन आहे. त्यामुळे पिके घेण्यावर मर्यादा आल्यानंतर हजारो तरुणांप्रमाणे त्यांनीही नोकरीसाठी मुंबईची वाट धरली. एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली देखील. परंतु पुढे नोकरीत मन रमेना. गावी जाऊन स्वतःचे काही करावे असे त्यांना सतत वाटू लागले. सोशल मीडियाद्वारे ते शेळीपालन (Goat Farming) , कुक्कुटपालन (Poultry Farming)आदींचे मार्गदर्शनपर व्हिडिओ ते पाहायचे. त्यातून शेळीपालन व्यवसाय करण्याचा विचार मनात आला.

Poultry
पोल्ट्री व्यवसाय झाला मुख्य आर्थिक कणा

गावी जाऊन पूरक व्यवसाय

पाच वर्षे नोकरी केल्यानंतर मुंबईला रामराम करण्याचा निर्णय घेत हर्षद यांनी गावचा रस्ता धरला. पण तेथे आल्यानंतरही अनेक प्रश्‍न समोर होते. शेती करण्यासाठी पुरेशी जमीन नव्हती. त्यामुळे उपलब्ध जागेचाच पुरेपूर वापर करण्याचे ठरविले. शेळीपालनाला पहिली पसंती दिल्यानंतर त्यादृष्टीने अभ्यास सुरू केला. काही शेतकऱ्यांचे ‘फार्म’ पाहिले. घरापासून काही अंतरावर भाडेतत्त्वावर जमीन घेतली. तेथे आवश्‍यक बांधकाम केले. संगणकीय क्षेत्रातील शिक्षण घेतले आणि आता शेळीपालन का सुरू केले अशा प्रकारची टिप्पणीदेखील काहींनी केली. त्यातच अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन करणार असल्याने ते यशस्वी होणार नाही असे देखील काही जण म्हणत होते. परंतु हर्षद यांनी अभ्यास व पद्धतशीर नियोजनातून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.

‘हॅचरी’ची उणीव भरून काढली

व्यवसाय सुरू असताना आजूबाजूला कुक्कुटपालन व्यावसायिकांचे निरीक्षणही सुरू होते. त्या वेळी उबवण कक्ष (हॅचरी) कुठे नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर ‘यू-ट्यूब’वर व्हिडिओ पाहिले. मग घरातील लाकडी बॉक्स व अन्य साहित्यांच्या आधारे सुमारे ५० अंडी उबविण्याची क्षमता असलेली छोटी हॅचरी तयार केली. परंतु अवघी पाच ते सहा पिलेच मिळाली. पुन्हा त्यात बदल केले. चार ते पाच महिन्यांत अपेक्षित ८० टक्के यश मिळाले. या हॅचरीची जिल्ह्यात चर्चा झाली. अनेक जण पाहण्यास आले. शेती क्षेत्रात कार्यरत भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनीही भेट देत प्रशंसा केली. जिल्ह्यात हॅचरीची उणीव असल्याचे सांगत मोठ्या क्षमतेची हॅचरी खरेदी करण्याचा सल्ला दिला. मग हर्षद यांनी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ‘स्कील इंडिया’ उपक्रमांतर्गत ‘हॅचरी ऑपरेटर’ हा दीड महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

Poultry
पोल्ट्री कंपन्यांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा

संकटातच प्रारंभ

सुमारे १२०० अंडी क्षमतेची हॅचरी (यंत्रणा) सुमारे एक लाख रुपयांना खरेदी केली. एका संस्थेचे कर्ज त्यासाठी घेतले. पिलांना मागणी येऊ लागली. परंतु काही दिवसांतच कोरोना संसर्ग वाढू लागला. त्याचा मोठा फटका प्रारंभीच व्यवसायाला बसला. त्यातून सावरत मागणीनुसार ‘बॅचेस’ तयार केल्या जात होत्या. या काळात काही पिले शिल्लक राहत होती. तीच मोकळ्या जागेत वाढविण्यात येऊ लागली. त्यामुळे उत्पादन खर्चही कमी झाला.

बटेररपालनाची जोड

दोन पूरक व्यवसाय हर्षद एकहाती सांभाळत होते. त्यातूनच बटेरपालनही आपण करू शकतो असा विश्‍वास हर्षद यांना वाटू लागला. मुंबईतील आरे वसाहतीतून त्याची १०० अंडी आणली. प्रवासात काही खराब झाली. उर्वरित अंड्यांमधून ५० पिले मिळाली. त्यांचे चांगले संगोपन सुरू करून अधिकाधिक उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आज सुरू आहे.

गावठी अंड्यांसाठी बाजारपेठ

हॅचरीसाठी हर्षद पूर्वी हैदराबाद येथून अंडी खरेदी करायचे. परंतु ती फुटण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यातून अंड्यांना स्थानिकसह मुंबईत बाजारपेठ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

व्यवसायातील ठळक बाबी

-शेळीपालनासह परसबागेतील कुक्कुटपालन यात सात वर्षांचा तर ‘हॅचरी’ व्यवसायात चार वर्षांचा अनुभव.

-घरगुती हॅचरीसाठी तीनहजार रुपये खर्च.

-एकदिवसीय पिलू प्रति २२ ते २५ रुपयांना तर एक महिन्याच्या पिलांची विक्री प्रति ९० ते १०० रुपयांना.

-हॅचरी ते पक्षी तयार होण्याचा कालावधी सुमारे २१ दिवसांचा.

-दर आठवड्याला मागणीनुसार २०० पिल्ले तयार करण्याचे नियोजन. वर्षभरात सुमारे पाच हजार पिलांची विक्री.

-वर्षभरात ५०० हून अधिक गावरान कोंबड्यांची सरासरी ५०० रुपये प्रति नग विक्री.

-वर्षभरात २० ते २५ शेळ्यांची (नर-मादीसह) विक्री.

-एकूण सर्वांतून वार्षिक उलाढाल- तीन लाख ३३ हजार रुपयांपर्यंत. बटेरांची विक्री सुरू झाल्यानंतर त्यात वाढ अपेक्षित आहे.

विक्री

-बोकडांना स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी. ‘फार्म’वर येऊन ३०० ते ३५० रुपये प्रति किलो खरेदी होते.

-गावरान कोंबड्यांनाही स्थानिक बाजारपेठ. उलट्या पिसाच्या कोंबड्यांची प्रति नग १२०० ते १५०० रुपये दराने विक्री. पिलांचे आगाऊ बुकिंग. अंडी प्रति नग ९ रुपये दराने विक्री.

संपर्क ः हर्षद धामापूरकर, ९५७९८७६३५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com