शेतकऱ्यांची कंपनी ‘कष्टकरी’ त्यांची दमदार कामगिरी

पुणे जिल्ह्यातील मुखई (ता. शिरूर) येथील नवनाथ गरुड यांनी परिसरातील शेतकऱ्यांना संघटित करीत कष्टकरी राजा ॲग्रो शेतकरी कृषी उत्पादक कंपनी स्थापना केली. रासायनिक अवशेषमुक्त व सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व फळांचे उत्पादन व सक्षम विक्री व्यवस्था उभारत तीन वर्षांत वार्षिक ७० ते ८० लाख रुपये उलाढालीपर्यंत कंपनीने मजल मारली आहे.
Farmer Producer Company
Farmer Producer CompanyAgrowon

पुणे जिल्ह्यातील मुखई (ता. शिरूर) येथील युवा शेतकरी व कृषी पदवीधर असलेले नवनाथ गरुड रासायनिक अवशेषमुक्त पद्धतीने (रेसिड्यू फ्री) शेती करतात. भाजीपाला व विविध फळांची त्यांच्याकडे लागवड आहे. देशी गायींचे संगोपन ते करतात. केवळ स्वतःपुरती विक्री व्यवस्था निर्माण न करता, त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांनाही आपल्या सोबत घेत उत्पादन ते विक्री या टप्प्यावर मजबूत व्यवस्था उभारण्याचे ठरवले. याबाबत नवनाथ म्हणाले, की आमचा रांजणगाव, शिक्रापूर या परिसर औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाने वेढला आहे. या परिसरात शेतीक्षेत्र कमी होत चालले आहे. शिवाय हवामान बदल, पावसाची अनिश्‍चितता, बाजारभावांमधील चढ-उतार अशी संकटेही उभी आहेत. सायामुळे शेतकरी शेतीपासून लांब होत चालला आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन शेतीतील समस्या सोडवणे व प्रगती करणे गरजेचे झाले होते. सन २०१० मध्ये सिद्धिविनायक भाजीपाला उत्पादक गटाची स्थापना केली. त्या अंतर्गत उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकत्रित खते, बियाणे खरेदी सुरू केली. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेऊन दहा ड्रम स्लरी पद्धतीचा अवलंब सुरू केला. त्यातून रासायनिक खतांवरील खर्च २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश आले.

कंपनीची स्थापना

गटांद्वारे कार्यरत असणाऱ्यांसाठी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. त्या दृष्टीने २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावे या शेतकरी संघटनेच्या ब्रीद वाक्यानुसार गरुड यांनी पुढाकार घेत कष्टकरी राजा ॲग्रो शेतकरी कृषी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. यात अध्यक्ष पूजा नवनाथ गरुड तर संचालकांमध्ये सुनीता अशोक गरुड, श्रीधर अर्जुन गरुड, अनिकेत गणेश सोरटे, सुनील सीताराम गरुड व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नवनाथ अशोक गरुड जबाबदारी सांभाळत आहेत. कंपनीचे कामकाज प्रगतावस्थेत असतानाच कोरोनाचे संकट आले. मात्र याच संकटातच संधी शोधत कंपनीने थेट ग्राहकांना फळे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

कोरोना संकटात मिळवली संधी

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आले. मग कंपनीच्या सर्व सदस्यांसोबत चर्चा करून भाजीपाला व फळे बास्केट विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. कंपनीच्या अध्यक्षा पूजा नवनाथ गरुड यांनी गुगल फॉर्म सोशल माध्यमांवर सादर करून सुमारे पाच हजार ग्राहकांचा ‘डेटा बेस’ तयार केला. महिला ग्राहकांसोबत चर्चा करून दैनंदिन गरजेच्या शेतीमालांची यादी करून त्याप्रमाणे बास्केट डिझाइन केली. पुणे शहरातील विशेषतः नगर रोड, कल्याणीनगर, विमाननगर, येरवडा या परिसरांतील निवासी सोसायट्यांना बास्केट्‍स घरपोच पुरवण्यास सुरुवात केली. फळे व भाजीपाला अशी प्रत्येक बास्केटची किंमत ५५० रुपये ठेवण्यात आली. भाजीपाला बास्केटमध्ये २१ प्रकार, तर फळांमध्ये १० प्रकार होते. या काळात सुमारे ८० ते ९० लाख रुपयांची उलाढाल करण्यात कंपनीला यश आले.

उत्पादन व विक्री व्यवस्था

सध्या कंपनीची सभासद संख्या ५१८ आहे. रसायन अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादनाचे क्षेत्र सुमारे ५०० एकर तर सेंद्रिय शेतीखाली ८० ते ९० एकर क्षेत्र आहे. त्या अंतर्गत शेतकरी विविध फळभाज्या, पालेभाज्या, कंदवर्गीय आदी ४० ते ४५ प्रकारांचे उत्पादन घेतात. फळांमध्येही कलिंगड, खरबूज, विविध प्रकारचा आंबा, पपई आदी प्रकार घेण्यात येतात. निर्यातदार तसेच पुण्यातील सेंद्रिय उत्पादनांच्या विविध विक्री केंद्रांना शेतीमालाचा पुरवठा केला जातो. रविवार, बुधवार बास्केट पुरवठा कोरोना काळात तयार केलेल्या ग्राहकांच्या ‘डेटाबेस’चा उपयोग आजही होत आहे.

विविध निवासी सोसायट्यांना रविवार आणि बुधवारी किमान ५० व कमाल १०० बास्केट्‍सचा पुरवठा सुरू आहे. पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील पॅव्हेलियन मॉलमध्येही सेंद्रिय शेतीमालाच्या फार्मर्स मार्केट या उपक्रमातही कंपनीने सहभाग नोंदवला आहे.

भविष्यातील योजना

रसायनमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी ‘रोमीफ इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून कंपनीला मार्गदर्शन मिळत आहे. या संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नवनाथ गरुड कार्यरत आहेत. कंपनीने काळाची पावले उचलीत भविष्यात फ्रोझन भाजीपाला व निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी स्मार्ट आणि मॅग्नेट प्रकल्पांमध्ये पाच कोटींचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्याद्वारे भाजीपाला शीतकरण आणि प्रक्रिया यावर भर दिला आहे.

तीन वर्षांतील उलाढाल (रुपये)

२०२०-२१ - ८० लाख

२०१९-२० - १ कोटी

२०१८-१९ - ७० लाख

मी मेथी कोथिबींर, गवार, भेंडी आदींचे उत्पादन घेत आहे. त्यासाठी कंपनीकडून रसायन अवशेषमुक्त उत्पादनासाठी मार्गदर्शन मिळते. आम्ही कंपनीच्या शेतमालाची विक्री करतोच. पण ज्या शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करण्यात अडचणी येत आहेत अशांनाही मदत करतो. आम्ही यंदा देवगड भागातील बागायतदारांकडील आंबा घेऊन त्याचीही विक्री केली. जुन्नर भागातील हापूस आंब्यालाही बाजारपेठ देण्याचा प्रयत्न आहे.
संपर्क ः नवनाथ गरुड, ९६०४०४५०५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com