
Ahmednagar : नगर तालुक्यातील वाळकी, देऊळगाव सिद्दी, गुंडेगाव तसेच श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, चिखली, मांडवगण परिसराला शाश्वत पाणी नाही. त्यामुळे या भागातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली आहे.
गुंडेगाव येथील रंगनाथ बाजीराव भापकर यांनी ३२ वर्ष प्राध्यापक म्हणून व ३ वर्ष संस्था निरिक्षक पदावर नोकरी केली. तीन वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले आहेत. पत्नी तारका याही मुख्याध्यापक असून मुलगा मंगेश अभियंता आहे.
रंगनाथराव यांची वडिलोपार्जित ११ एकर आणि ४ एकर स्वतः खरेदी केलेली शेतजमीन आहे. त्यांच्याकडे डाळिंब ५ एकर, संत्रा २ एकर, पेरू २ एकर आणि चिकू १ एकर क्षेत्रावर आहे. भापकर यांनी नोकरी करीत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यावर कायम भर दिला.
सहा वर्षांपूर्वी देशी गोपालन सुरु केले. गाईंच्या शेण आणि गोमुत्राचा वापर स्वतःच्या शेतीमध्ये करत उत्पादन खर्च कमी केला. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारला.
शेणापासून गांडूळखत, गोमूत्रापासून व्हर्मिवॉश निर्मिती करून विक्रीस प्राधान्य दिले. देशी गोपालनासह शेती कामांमध्ये पत्नी तारका यांची मोलाची साथ मदत मिळत आहे.ms
एका गाईंपासून सुरवात ः
रंगनाथ यांच्या वडिलांनी कायम शेतीसह देशी गोपालनाला प्राधान्य दिले. मध्यंतरीच्या काळात त्यात खंड पडला. वडिलांचे मित्र राजाराम भापकर यांनी सहा वर्षांपूर्वी एक देशी गाय भेट देत वडीलांच्या इच्छेनुसार रंगनाथ यांनी गोपालन सुरु करावे, अशी विनंती केली.
आणि एका गाईपासून गोपालनास सुरवात झाली. नोकरी करीत देशी गोपालनाचा विस्तार करण्याचे त्यांनी ठरविले. ज्यांना देशी गाय सांभाळणे शक्य नाही, त्यांनी आमच्याकडे आणून द्याव्यात, असे आवाहन केले.
लोकांनी आत्तापर्यंत सुमारे ४० देशी गाई त्यांच्याकडे आणून दिल्या आहेत. शिवाय कसायांकडून २० गाई सोडवून आणल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे ५८ देशी गाई आणि १३ वासरे आहेत.
गाईसाठी १० वर्षांपूर्वी शेडची उभारणी केली होती. मात्र, अलीकडे गाई आणि वासरांची संख्या वाढल्याने अल्प दराने १० एकर जमीन भाडेतत्त्वावर घेत तिथे मुक्त पद्धतीने गोपालन सुरु केले आहे.
गोमूत्र, शेणखताचा शेतीमध्ये वापर ः
- मागील ११ वर्षांपासून डाळिंब, पेरू, संत्रा फळपिकांसह चारा पिकांमध्ये शेणखत, व्हर्मिवॉश आणि गोमुत्राचा वापर करत आहेत. सुरवातीला बाहेरून खत आणि गोमूत्र खरेदी करून त्याचा शेतीमध्ये वापर केला जायचा.
मात्र, स्वतः देशी गोपालन सुरु केल्यानंतर शेणखत, गोमूत्राची उपलब्धता होऊ लागली. त्याचा शेतीत वापर सुरु केला.
- डाळिंब बागेत प्रति झाड २० किलो शेणखत वर्षातून २ वेळा, गोमूत्र महिन्यातून १ फवारणी, व्हर्मिवॉश महिन्यातून २ फवारण्या आणि पाण्याद्वारे एकरी २० लिटर प्रमाणे दिले जाते. शिवाय फूल आणि फळधारणेच्या वेळी जीवामृत, स्लरीचा गरजेनुसार सोडली जाते.
- संत्रा लागवडीत दरवर्षी मे महिन्यात २० किलो शेणखत, १ टन गांडूळखत एकरी मात्रा. फळ वाढीसाठी जीवामृत व स्लरी पाण्यातून वापर.
- पेरू बागेत बहार धरताना १० किलो शेणखत, ५ किलो गांडूळखत देतात. फुले आल्यानंतर परगीकरणासाठी मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी ताक, गुळाची फवारणी करतात.
शेततळ्याची उभारणी ः
प्रा. भापकर यांनी कृषी विभागाच्या मदतीने आठ वर्षांपूर्वी दहा गुंठे क्षेत्रावर शेततळे उभारला. मात्र, त्यातील पाणी कमी पडू लागल्याने तीन वर्षांपूर्वी स्वतः च्या खर्चाने एक एकर क्षेत्रावर सव्वा कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव नव्याने तयार केला. त्यात यंदा मत्स्यपालन केले आहे.
शेतीसाठी गोपालन ठरले वरदान ः
राज्यातील बऱ्याच डाळिंब बागांचे तेल्या रोग, पिनहोल बोररचा प्रादुर्भाव आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मोठे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कीड-रोगांच्या अति प्रादुर्भावामुळे बागा काढून टाकल्या आहेत.
मात्र, अकरा वर्षांत बागेतील एकाही झाडाचे कीड-रोगांमुळे नुकसान झाले नाही. देशी गायींच्या शेणखत आणि गोमुत्राचा वापर केल्याने हे नुकसान टाळणे शक्य झाले. तसेच उत्पादनातही वाढ झाली असल्याचे प्रा. भापकर सांगतात.
गांडूळ खताची विक्री ः
देशी गाईंच्या शेणखतापासून तयार केलेल्या गांडूळखताला अधिक मागणी आहे. दर महिन्याला सुमारे ५ टनावर शेणखत उपलब्ध होते. त्यापैकी १ टन शेणखत शेतीमध्ये आणि तर उर्वरित ४ टन गांडूळखत निर्मितीसाठी वापरले जाते. प्रतिकिलो १० रुपये दराने गांडूळखताची विक्री केली जाते.
शेणापासून विटांचा प्रयोग ः
प्रा. रंगनाथ भापकर यांनी देशी गाईंच्या शेणापासून घर बांधकामासाठी लागणाऱ्या पर्यावरणपुरक विटा तयार करण्याचा प्रयोग केला आहे. गायींचे सहा तासांच्या आतील ताजे शेण, माती व चुन्याचा वापर विटांच्या निर्मितीसाठी केला जातो.
या विटा मातीच्या विटांपेक्षा वजनाला हलक्या, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक आहेत. विटांना अधिक मागणी असल्याने उत्पादन वाढवणार आहे. त्यासाठी विटा तयार करण्याचे यंत्र खरेदी केले आहे. प्रा. भापकर यांनी मुलगा मंगेश यांच्यासह बिकानेर (राजस्थान) येथील डॉ. शिवदर्शन मलिक यांच्याकडे विटा तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.