शेतमजुर बनला यशस्वी दुग्ध व्यावसायिक

परभणी जिल्ह्यातील बलसा (ता. परभणी) येथील एकेकाळी कृषी विद्यापीठात मजुरी करणाऱ्या शेख दस्तगीर यांनी अत्यंत कष्टातून, कुशल आर्थिक नियोजनातून व संघर्षातून आणि विशेष म्हणजे शून्यातून आपल्या कुटुंबाची उल्लेखनीय प्रगती साधली आहे. कृषी विद्यापीठातील सेवा बजावण्यासह एकहाती सांभाळलेला दुग्ध व्यवसाय आणि शेती यांची यशस्वी सांगड त्यांनी घातली आहे.
शेतमजुर बनला यशस्वी दुग्ध व्यावसायिक
Dairy BusinessAgrowon

बलसा (ता. जि. परभणी) येथील शेख दस्तगीर शेख महेबूब यांनी पंचक्रोशीत यशस्वी दुग्ध व्यावसायिक (Sucessful Dairy Business) अशी ओळख तयार केली आहे. एकेकाळी हे कुटुंब भूमिहीन होते. आई- वडील मजुरी करून कुटुंबाची उपजीविका चालवीत. बलसा गावची जमीन कृषी विद्यापीठासाठी (Agriculture University) संपादित करण्यात आली. शेख दस्तगीर यांना १९८९ मध्ये प्रकल्पग्रस्त कोट्यातून तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठात कुशल मजूर म्हणून रोजंदारीवर (प्रतिदिन १९ रुपये ४० पैसे) काम मिळाले. मात्र चरितार्थ तेवढ्यावर चालू शकत नसल्याने १९८९ मध्ये म्हैस खरेदी करून दुग्ध व्यवसाय (Dairy Business) सुरू केला. दररोज सकाळी परभणी शहरात दुधाची विक्री करून दस्तगीर कृषी विद्यापीठामध्ये कामास जात.

Dairy Business
मुरघास तंत्रज्ञानाने सावरला दुग्ध व्यवसाय

व्यवसायाचा विस्तार

सहा ते सात वर्षांत म्हशीची संख्या १५ ते १६ पर्यंत वाढली. दररोज ४० लिटर दूध संकलित होऊ लागले. परभणी शहरात घरोघरी जाऊन दुधाची विक्री सुरू होती. दरम्यान, बलसा गावाचे पुनर्वसन परभणी ते पिंगळी रस्त्यावरील जागेत झाले. त्यामुळे जागेची अडचण व चाऱ्याची समस्या निर्माण झाली. मग २००६ मध्ये काही म्हशीची विक्री केली. परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील दत्तधाम परिसरात जिजाऊ नगर येथे दोन प्लॉट खरेदी केले. त्या ठिकाणी ७२ बाय ३० फूट जागेत गोठ्याची उभारणी केली.

Dairy Business
विना मजूर दुग्ध व्यवसाय दांपत्याने केला यशस्वी

गोठा व्यवस्थापन

एका बाजूने लोखंडी पत्रा, दुसऱ्या बाजूस लाकूड, पाचट अशी गोठ्याची व्यवस्था आहे. त्यामुळे आवश्यक तापमान राखता येते. सिमेंटच्या गव्हाणीच्या दोन्ही बाजूंनी दिवसभरात आलटून पालटून जनावरे बांधण्यात येतात. जमिनीवर सिमेंट काँक्रीट आणि फरशी आहे. त्यामुळे गोठा स्वच्छ ठेवता येतो. पाण्यासाठी हौद व चारा साठविण्यासाठी जागा आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातून सेवानिवृत्त संभाजी लोखंडे हे मित्र २००६ पासून दस्तगीर यांच्यासोबत आहेत. गोठ्याशेजारीच त्यांचे घर आहे. चारा, पाणी, खुराक या जबाबदाऱ्या ते सांभाळतात. त्यांना दररोज दोन वेळा एक लिटर दूध आणि प्रति महिना वेतन देण्यात येते. वर्षभरासाठी ज्वारीच्या कडब्याच्या दहा हजार पेंढ्या लागतात. घरच्या शेतातून निम्मी गरज भागते. वेळच्यावेळी लसीकरण होते.

दुधाचे ‘मार्केट’

सध्या जाफराबादी सहा म्हशी व चार होलस्टिन फ्रिजियन गायी आहेत. म्हशीचे दररोजचे मिळून ४० लिटर तर गायींचे २० लिटरपर्यंत दूध उपलब्ध होते. जाफराबादी म्हशी दुग्धोत्पादनात सरस आहेत. त्यांचा भाकड काळ कमी असतो. म्हशीच्या दुधाचा घरोघरी रतीब घालण्यात येतो तर गायीचे दूध डेअरीला पुरविले जाते. म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ७० रुपये तर गायीच्या दुधाला ३८ रुपये दर मिळतो. प्रक्रिया व्यावसायिकांकडून पनीर निर्मितीसाठी गायीच्या दुधाला मागणी असते. त्यासाठी दररोज चार ते पाच लिटर दूध पुरवले जाते. परभणी येथील बाजारात म्हशींची खरेदी विक्री होते.

दररोजची कसरत

तब्बल २५ वर्षे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध ठिकाणी रोजंदारीवर काम केल्यानंतर शेख दस्तगीर यांना २०१५ मध्ये सेवेत कायम करण्यात आले. सध्या ते अन्न तंत्र महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक असून त्यांच्याकडे रोखपाल पदाचा कार्यभार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पावणेसहा पर्यंत कार्यालयीन वेळ असते. सेवा निवृत्तीसाठी पाच वर्षे शिल्लक आहेत. निवृत्ती वेतन नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसायातूनच अधिकाधिक पुंजी जमा करण्याचा प्रयत्न आहे. दस्तगीर सन १९८९ पासून ते आजगायत दररोज सकाळी पाच ते नऊ दुग्ध व्यवसायात राबतात. दिवसभर विद्यापीठात श्रम करून घरी आल्यानंतर काही उसंत घेतात. पुन्हा रात्री १० वाजेपर्यंत व्यवसायात ते स्वतःला गुंतवतात. शेण काढणे, दूध काढणे, दुचाकीवरून कॅन घेऊन परभणी शहरात घरोघरी जाऊन दूध पुरवणे आदी कामांत सतत गर्क असतात. अनेक ग्राहक त्यांनी पूर्वीपासून टिकवलेले आहेत.

शेती आणि प्रगती

घरापासून आठ किलोमीटरवरील पोरजवळा शिवारात टप्प्याटप्प्याने मिळून साडेसहा एकर जमीन घेतली आहे. नोकरी व दुग्ध व्यवसाय सांभाळून शेतीकडेही दस्तगीर तेवढेच एकहाती लक्ष देतात. घरच्या ज्वारीतून धान्यासह कडबा मिळतो. सिंचनाची सुविधा नाही. शेजाऱ्यांकडून पाणी घेण्यात येते. वर्षाला २० ट्रॉली शेणखत मिळते. त्याचा घरच्या शेतीत वापर होतो. एकेकाळी भूमिहीन असलेल्या या कुटुंबाने आज अविरत कष्ट, आर्थिक नियोजन, व्यावसायिक दृष्टिकोन आदी गुण आत्मसात करून उल्लेखनीय प्रगती केली.

प्रकल्पग्रस्त म्हणून कृषी विद्यापीठात कुशल मजूर म्हणून काम मिळाले होते तरी सेवा कायम नव्हती, त्यामुळे दुग्ध व्यवसायात खंड पडू दिला नाही. कौशल्याच्या बळावर मुलीचे लग्न केले. मुलगा एजाजला उच्च शिक्षण दिले. तो एमटेक (अन्न तंत्र) असून, औढा नागनाथ येथे महाविद्यालयाच्या सेवेत ‘लेक्चरर’ आहे. आई-वडिलांना २०११ मध्ये सौदी अरेबियात हाज यात्रेलाही नेण्यातही दस्तगीर यांना यश मिळाले. मध्यंतरी दोन प्लॉट घेऊन पुढे त्यांची चांगल्या दराने विक्री करून उत्पन्नही कमावले.

शेख दस्तगीर, ९४२२८५८७६७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com