Banana Farming : सोलापूर जिल्ह्यात वेलची, ‘रेड बनाना’ केळीवाणांचा यशस्वी प्रयोग

वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील यांनी धाडसाने व प्रयोगशील वृत्तीतून वेलची (Velchi Banana Verty) आणि रेड बनाना (Red Banana) या केळीच्या दक्षिण भारतातील व वेगळ्या वाणांची लागवड करून हा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन्ही वाणांचे मिळून सुमारे २० एकर क्षेत्र आहे. चांगले व्यवस्थापन सांभाळून दर्जेदार उत्पादन घेत रिटेल उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांकडून या केळ्यांना चांगली मागणी व दर मिळवण्यात पाटील यशस्वी झाले आहेत.
Red Banana
Red BananaAgrowon

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या (Ujani Dam) ‘बॅकवॅाटर’चा भाग असलेले वाशिंबे हे सोलापूर जिल्ह्याच्या टोकाचे करमाळ्यापासून ३० किलोमीटरवरील गाव आहे. साहजिकच पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने सर्वाधिक ऊस उत्पादन (Sugarcane Production) होते. अलीकडील काही वर्षांत उसाला केळीचा (Banana Cultivation) पर्याय मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे केळीचे क्षेत्र दिसते. वाशिंबे येथील राजाभाऊ पाटील यांनी प्रगतिशील, प्रयोगशील शेतकरी म्हणून नाव मिळवले आहे.

Red Banana
Banana Rate : देशी केळीला अपेक्षित दर नाहीच

केळी ठरला ‘टर्निंग पॉइंट

राजाभाऊंनी ऊस, डाळिंब आदी पिकांत विविध प्रयोग केले. सन २०११ मध्ये स्थानिक राजकारणातून एका कारखान्याने जाणीवपूर्वक ऊस नेला नाही. तेव्हापासून ते पर्यायी केळी पिकाकडे वळले. त्यानंतर आजतागायत ऊस घेतला नाही. खरं तर केळी पिकात कुशल होण्याच्या दृष्टीने हाच ‘टर्निंग पॉइंट’ ठरला असे म्हणता येईल. सुमारे १०-१२ वर्षांपासून पाटील कुटुंब केळी उत्पादनात कार्यरत आहेत. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासह विविध वाणांचे प्रयोग त्यांनी केले. उत्पादनवाढ मिळवली.

नव्या पिढीची शेती

राजाभाऊ यांचे चिरंजीव अभिजित यांनी २०१५ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. सोबत मधले बंधू अतुल यांनी कृषी विषयातील, तर धाकटे हर्षवर्धन यांनी बी.ए.ची पदवी घेतली. वडिलांची जिद्द, कष्ट यांचा वस्तुपाठ समोर ठेवून तिघा बंधूंनी शेतीतच करिअर करण्याचे ठरवले. यात शेती व्यवस्थापनासह ‘मार्केटिंग’ची जबाबदारी अभिजित यांनी उचलली आहे. आई-वडील, भाऊ, भावजय असे सर्वच कुटुंब राबत असल्याने शेतीतून समृद्धी आणण्यात त्यांना यश मिळाले आहे.

केळीची शेती

पाटील यांची एकूण ३० एकर शेती आहे. पूर्वी केळीचे उत्पादन होतेच. पण अभिजित यांनी त्यात बदल केला. सात-आठ वर्षांपूर्वी केळीच्या विपणना निमित्ताने ते तमिळनाडूमध्ये गेले असताना तिकडच्या रेड बनाना, वेलची आदी केळी वाणांची माहिती मिळाली. त्याची लागवड, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. ही केळी खाण्यासाठी गोड असू,न त्यांच्यात औषधी गुणधर्म आहेत. रोग प्रतिकारशक्ती आणि चयापचय शक्ती वाढण्यास ही केळी उपयुक्त आहेत. ‘क’ जीवनसत्त्व, अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण चांगले आहे. विविध आजारांवर ती फायदेशीर असून, त्यास चांगली मागणी आहेत. त्यामुळे त्यास नेहमीच्या केळीपेक्षा अधिक दर मिळतो अशा काही बाबी समजल्या. धाडस व जोखीम घेऊन या वाणांची लागवड करण्याचे निश्‍चित केले.

Red Banana
Banana Crop Insurance : केळी पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करू नये

नव्या वाणांचे प्रयोग

पुणे भागातील एका कंपनीकडून वेलची व रेड बनाना वाणांची रोपे आणली. त्या वेळी ही रोपे आम्ही फक्त दक्षिण भारतात पुरवतो. आपल्या वातावरणात ती चांगल्या प्रकारे वाढतील की नाही याची खात्री नाही. स्वतःच्या जबाबदारीवर त्यांचा प्रयोग करावा असे कंपनीकडून सांगण्यात आले. त्या अनुषंगाने ‘बॉण्ड’वर लिहूनही घेण्यात आले. आज वेलची वाणाच्या लागवडीला सात वर्षे, तर ‘रेड बनाना’ वाणाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही वाण चांगला ‘परफॉर्मन्स’ दाखवत असल्याचे अभिजित सांगतात. वेलची वाण १६ एकरांवर, तर रेड बनाना वाण चार एकरांवर आहे. दोन्ही केळी खाण्यास अत्यंत गोड आहेत.

रिटेल कंपनीकडून खरेदी

केळीच्या नव्या वाणांना आपल्याकडे फारशी पसंती दाखवली जात नाही. दक्षिण भारतात त्यांना सर्वाधिक मागणी आहे. निर्यात बाजारपेठही आहे हे लक्षात आले. अर्थात विक्री- दर, वाहतुकीचा प्रश्‍न होता. अभिजित सांगतात वेलची केळीचे २०१६ मध्ये पहिले उत्पादन आले. त्याची माहिती रिटेल क्षेत्रातील रिलायन्स कंपनीला मिळाली. त्यांचे प्रतिनिधी बागेत आले. त्यावेळी दीडशे टन केळीची खरेदी त्यांनी केली. किलोला ४५ रुपये दर मिळाला. त्यातून उत्साह वाढला. हळूहळू रिटेल उद्योगातील अन्य कंपन्यांनाही या केळीबाबत माहिती मिळाली. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री या शेतकरी कंपनीने संपर्क साधला. आज रिलायन्स, सह्याद्रीसह स्टार बझार, बिग बास्केट आदी कंपन्यांना केळी पुरविली जात आहेत. पाण्याने केळी धुणे, प्रतवारी आदी बाबी बागेतच केली जातात. कंपन्या क्रेट पुरवतात. त्याद्वारे पोचवण्याची व्यवस्था केली जाते.

लागवडीतील ठळक बाबी

टिश्यू कल्चर रोपांची लागवड. वेलची सात पाच बाय व सहा बाय पाच तर रेड बनानाची सहा बाय सहा फूट अंतरावर लागवड.

लागवडी आधी तीन ट्रॅाली शेणखत आणि मळी वापरली. रोटर वापरून खत मिसळून घेतले.

उजनी नदीचे बॅकवॉटर असले तर विहीर व बोअरवेलमधील पाण्याचा वापर केला जातो.

लागवडीनंतर पहिल्या महिन्यापर्यंत दर चार दिवसांनी १९ः१९ः१९ एकरी सहा किलो, १३ः०ः४५ आणि युरिया प्रत्येकी तीन किलो देण्यात येते.

त्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून चौथ्या महिन्यापर्यंत दर चार दिवसांनी १९ः१९ः१९ एकरी दहा किलो, युरिया आणि पोटॅश प्रत्येकी तीन किलो व महिन्यातून दोन वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्यात येतात.

चौथ्या महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंत दर चार दिवसांनी अमोनिअम सल्फेट एकरी सहा किलो, १३ः०ः४५ तीन किलो, पोटॅश आठ किलो आणि कॅल्शिअम नायट्रेट १२ किलो.

याच पद्धतीने पुढील मात्रांचे ‘शेड्यूल’ असते.

साडेतीन ते चौथ्या महिन्यात प्रति झाड दोन पाट्या शेणखत देण्यात येते.

वेलची केळी साधारण अकराव्या महिन्यात तर रेड बनाना १५ व्या महिन्यात काढणीस येते.

अभिजित सांगतात, की दोन्ही वाणांचा लागवड खर्च खूप आहे असे नाही. एकरी तो ७० हजार रुपये पहिल्या वर्षी येतो. वाणांच्या रोपांची किंमत प्रति नग २५ रुपये आहे. खोडव्याला हा खर्च अजून कमी म्हणजे २५ ते ३० हजारांपर्यंतच येतो.

व्यवस्थापन देखील नेहमीच्या केळीप्रमाणेच आहे. करपा व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो. मात्र फवारण्यांचे वेळापत्रक तयार केले आहे.

एकाचवेळी सर्व क्षेत्रावर उत्पादन न घेता प्रत्येकी तीन-चार एकराच्या प्लॅाटचे आलटून-पालटून असे डिसेंबर, मार्च, जुलै आणि नोव्हेंबर असे चार बहर निश्‍चित केले आहेत. त्यामुळे एकापाठोपाठ एक असे वर्षभर उत्पादन सुरू राहते.

सर्व पिकांना रासायनिक खतांचा वापर संतुलित पद्धतीनेच होतो. मात्र शेणखत आणि गोमूत्राची जोड दिली जाते. त्यासाठी १५ गीर गायींचा सांभाळ केला आहे. दोनशे लिटर बॅरेलमधील गोमूत्र प्रत्येकी ५० लिटर बॅरेलमध्ये संकलित करून ते दर ८ ते १० दिवसांनी बागेला सोडले जाते. ते ३ ते ४ एकरांसाठी पुरते. घरच्या स्वयंपाकासाठी ‘बायोगॅस’ वापरात आणला जातो. देशी दुधापासून तुपाची विक्री होते.

नेहमीच्या केळीच्या तुलनेत पाच पट दर

२०२० मध्ये वेलची केळीला प्रति किलो किमान ३० रुपये, सर्वाधिक ५८ रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये २०२१ मध्ये रेड बनानाला किमान ३० रुपये, सर्वाधिक ५५ रुपये, तर वेलचीला किमान ४५ रुपये, सर्वाधिक ६० रुपये व यंदा गेल्या महिन्यात (ऑगस्ट) रेड बनानाला किमान ५० रुपये, सर्वाधिक ६५ रुपये, तर वेलचीला किमान ५५ रुपये आणि सर्वाधिक ७५ रुपये दर मिळाला. नेहमीच्या केळीच्या तुलनेत हे दर किमान पाचपटांपर्यंत आहेत.

सफरचंद प्रयोग

सन २०१९ मध्ये दीड एकरावर एचएआरएमएन-९९ या सफरचंदाची लागवड केली आहे. हिमाचल प्रदेशातून त्याचे वाण आणले असून, संबंधित शेतकऱ्याने आपले नाव त्यास दिले असल्याचे अभिजित यांनी सांगितले. या फळाच्या लागवडीवेळी काहींनी जोखीम असलेला प्रयोग म्हणून वेड्यात काढले. पण गेल्या वर्षी ५०० किलो सफरचंदे मिळाली आहेत. त्यास किलोला ६० ते ६५ रुपये दर गुलटेकडी मार्केटला मिळाला आहे.

अन्य फळांचे प्रयोग

प्रयोगशील वृत्तीतून अभिजित यांनी अन्य फळांवरही लक्ष केंद्रित केले आहे. सन २०१५ मध्ये ‘व्हाइट’ प्रकारातील ड्रॅगनफ्रूट १५ गुंठ्यांत लावले. यंदा दीड एकरांत रेड प्रकाराची लागवड केली आहे. सध्या व्हाइटला किलोला १२० रुपये, तर रेडला १८० रुपये दर मिळतो आहे. केळीच्या ‘मार्केट’मध्ये चांगलेच पाय रोवल्यानंतर व्यापारी आणि कंपन्यांकडून अन्य फळांनाही मागणी वाढली आहे. सन २०१८ मध्ये साडेचार एकरांत सुपर गोल्डन सीताफळ असून उत्पन्नाचे तिसरे वर्ष आहे. त्यास आतापर्यंत किलोला सर्वाधिक १४० रुपये व सरासरी ६० रुपये दर मिळाला. बंगळूर, सोलापूर, पुणे- गुलटेकडी येथे बॉक्स पॅकिंगमधून त्याचा पुरवठा केला आहे. अभिजित म्हणाले, की माझ्या भागातील केळी उत्पादकांचा गट तयार केला असून, त्यांनाही नव्या वाणांबाबत प्रोत्साहित केले जात आहे.

अभिजित पाटील ८६०५०५९२९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com