गोड, रसाळ टॅंजेरिन संत्र्याचा यशस्वी प्रयोग

राशीन (ता. कर्ज, जि. नगर) येथील प्रयोगशील, प्रगतिशील व अभ्यासू शेतकरी अशोक भंडारी यांनी सुमारे २० एकरांत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या टॅंजेरिन संत्र्याची लागवड यशस्वी केली आहे. अत्यंत रसाळ, गोड चवीच्या या संत्र्याची एकरी उत्पादकता चांगली मिळवण्यासह त्यास बाजारपेठ हस्तगत करण्यातही ते यशस्वी झाले आहेत.
गोड, रसाळ टॅंजेरिन संत्र्याचा यशस्वी प्रयोग
OrangeAgrowon

विनोद इंगोले. सूर्यकांत नेटके

नगर जिल्ह्यात सुमारे ७५ हजार हेक्‍टरवर विविध फळपिकांची लागवड आहे. त्यात सर्वाधिक ३५ हजार हेक्‍टरवर डाळिंब आहे. उर्वरित पिकांचा विचार करता संत्रा, पेरू, द्राक्षे, मोसंबी, आंबा, सीताफळ आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील राशीन (ता. कर्जत) येथील अशोक फुलचंद भंडारी यांची प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी अशी ओळख आहे. त्यांचे एकूण ३५ एकर क्षेत्र आहे. सन १९९९ पासून ते फळपिकांची शेती करतात. दक्षिण नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच गणेश, आरक्ता, भगवा वाणांच्या डाळिंबाची त्यांनी २३ वर्षांपूर्वी लागवड केली. ३५ एकरांपैकी २५ एकर हे पीक होते.

या पिकाने चांगला आर्थिक आधारही दिला. मात्र डाळिंबाची शेती तुलनेने अधिक कष्टाची व जोखमीची आहे. तेलकट डाग व अन्य रोगांच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागल्याने त्यांनी हे पीक कमी करण्याचा निर्णय घेतला. आता या पिकाला हुकमी पर्याय मिळवण्याच्या प्रयत्नात ते होते.

पंजाबात मिळाला पर्याय

सुमारे आठ वर्षांपूर्वी भंडारी आपले मित्र श्री. पवार यांच्यासोबत पंजाब येथे गेले होते.
त्या वेळी होशियारपूर भागात खासगी बागा पाहत असताना सेवानिवृत्त जिल्हाधिकाऱ्यांकडे संत्राची दोन वैशिष्ट्यपूर्ण झाडे पाहण्यास मिळाली. त्याची चव गोड व रसही भरपूर होता. फळाची कातडी कडक होते. झाडावरून पडल्यानंतर फार नुकसान होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर लागवड होणारा हा टॅंजेरिन प्रकारातील संत्रा होता. त्याची विविध वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर हे पीक घेऊन पाहायचे भंडारी यांनी ठरवले. पंजाब कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. गुरुविंदरसिंग बाजवा यांनी या बागा पाहण्यासाठी भंडारी यांना मदत केली. त्यांच्याच सहकार्यातून १५० रोपे तेथून आणून आपल्या राशीन येथील बागेत त्यांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली.

टॅंजेरिन संत्र्याची शेती

सुरुवातीच्या रोपांपासून चांगले उत्पादन मिळाल्याचे आढळल्यानंतर मग निवड पद्धतीने चांगली रोपे वेगळी काढण्यात आली. त्यांच्यापासून क्षेत्रविस्तार करण्याचे ठरवले. आज भंडारी यांच्याकडे जुनी व नवी लागवड अशी मिळून आजमितीला टॅंजेरिन संत्र्याची वीस एकर लागवड असून सुमारे साडेतीन हजार झाडे आहेत. भारी जमिनीत १५ बाय १२ फूट, तर हलक्या मुरमाड जमिनीत १५ बाय १९ फूट अंतरावर लागवड केली आहे. एकरी सुमारे २५० ते ३०० झाडे बसतात.

टॅंजेरिन संत्रा व शेती ः वैशिष्ट्ये

-भंडारी सांगतात, की टॅंजेरिन संत्रा चवीला गोड व अत्यंत रसाळ आहे. स्पेन, अमेरिकेत
लागवड होते. त्याला डायसी असेही संबोधले जाते. त्याची टिकवणक्षमता चांगली आहे. सुमारे २५ दिवस जरी हे फळ सावलीत खुल्या वातावरणात ठेवले तरी टिकते. त्यातील ज्यूसचे प्रमाणही चांगले राहते. नागपुरी संत्र्यांप्रमाणे त्याची वरची कातडी पोकळ नसून ती कडक आहे.
-झाडाच्या फांद्या मजबूत, काटक असल्याने फळे आल्यावर झाडांना बांबूचा टेकू देण्याची गरज नाही.
-भंडारी यांनी यंदा आंबे बहर धरला आहे. मात्र आतापर्यंत बहुतांश हस्त बहर व काही मृग बहर घेतला आहे. ऑक्‍टोबरला (पाऊसकाळ संपल्यानंतर) नोव्हेंबरपासून बाग ताणावर सोडली जाते. त्यानंतर १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बागेला पाणी दिले जाते. ऑगस्ट- सप्टेंबर कालावधीत फळे बाजारपेठेत येतात. उत्तर प्रदेशात थंडी आपल्यापेक्षा अधिक असते. त्यामुळे आपल्याकडे त्यांच्यापेक्षा एक महिना हे फळ विक्रीस तयार होते. साहजिकच त्याला दर अधिक मिळवण्याची संधी असते.
आपल्याकडे या फळाचा रंग हिरवा- पिवळा असा मिश्र येतो. उत्तर प्रदेशात याच थंडीमुळे त्याला भगवा रंग येतो.
-भंडारी सांगतात, की टॅंजेरिन संत्र्याचे माझ्या बागेत झालेले प्रयोग यशस्वी झाल्यानंतर डॉ. गुरुविंदरसिंग यांनी आपल्या विद्यापीठातही त्याच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहेत. तेथील शेतकरीदेखील हे पीक घेऊ लागले आहेत.

उत्पादन

लागवडीनंतर सुमारे तीन वर्षांनी फळ येण्यास सुरुवात होते. साधारण पाच ते सहा वर्षांनी
प्रति झाड ८० ते १०० किलोपर्यंत फळ उत्पादन मिळू शकते. एकरी व्यवस्थापन खर्च सुरुवातीची तीन वर्षे ७५ हजार रुपये, तर त्यानंतर किमान एक लाख रुपये येतो. भंडारी म्हणतात, की एकरी एकरी २५० झाडे, प्रति झाड ८० ते १०० किलो फळ व किलोला ३५ रुपये दर मिळाला तरी हे पीक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक आधार देऊ शकते.

बाजारपेठ व विक्री

भंडारी सांगतात, की सुरुवातीला नातेवाईक, मित्रमंडळी यांना संत्रा दिला. पुणे, मुंबई येथील व्यापाऱ्यांनाही तो दाखवला. व्यापाऱ्यांकडूनही त्याला मागणी आली. वरून रंग हिरवा असल्याने ग्राहक हे कच्चे फळ आहे का असे विचारायचे. पण व्यापाऱ्यांनी त्यांना चव पाहण्यास सांगितले. ग्राहकांमधून चांगला प्रतिसाद येऊ लागला. मग उत्साह वाढला. आज पुणे, मुंबई येथे व्यापाऱ्यांना तो पुरवला जात आहे. त्यास किलोला ५०, ६० रुपयांपासून ते कमाल १०० रुपयांपर्यंतही दर मिळाला आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने ३० परदेशी लिंबूवर्गीय फळपिकांच्या चाचण्यांवर भर दिला आहे. आपल्या भागात त्यांची उत्पादकता, गुणवत्ता अभ्यासली जात आहे. निष्कर्ष पाहून त्यांच्या प्रसारणाला मान्यता दिली जाणार आहे.
डॉ. दिलीप घोष, संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय फळपिके संशोधन संस्था, नागपूर
प्रयोगातील वाण नागपुरी संत्र्याला स्पर्धा देऊ शकत नाही. भौगोलिक वातावरणाचा फरक पडत असल्याने उत्पादकता आणि गुणवत्ता संबंधित देशातील किंवा त्या भागाप्रमाणे मिळणे अपेक्षित राहत नाही.
डॉ. अंबादास हुच्चे- ७५८८००६११८ प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय लिंबूवर्गीय फळपिके संशोधन संस्था, नागपूर
सन २०१२ मध्ये खासगी कंपनीने शेतकऱ्यांना लागवडीसाठी १७ परदेशी संत्रा वाण उपलब्ध करून दिले. तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या भागाच्या उत्कर्षासाठी यातील काही वाण चाचणीअंती शेतकऱ्यांसाठी लागवडीसाठी मिळावे अशी मागणी केली. त्यानुसार कंपनीच्या पुढाकारातून पंजाब कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचण्या घेण्यात आल्या. त्याआधारे सहा वाण या भागात येत असल्याचे स्पष्ट झाले. यात डायसी वाणाचा समावेश आहे. पंजाब परिसरात त्याची उत्पादकता २० टन प्रति एकर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. स्थानिक वातावरणानुसार उत्पादकतेत फरक पडू शकतो.
डॉ. गुरुविंदरसिंग बाजवा उद्यानविद्या शास्त्र शास्त्रज्ञ (पंजाब कृषी विद्यापीठ)

सीताफळ, चिंच, सफरचंदही

सातत्याने प्रयोग करण्याची आवड असलेल्या भंडारी यांनी आठ वर्षांपूर्वी आठ एकरावर सीताफळ, एक एकर सफरचंद व पाच एकरांत तमिळनाडू कृषी विद्यापीठाकडील चिंच वाणाच्या २५० रोपांची व्यावसायिक पद्धतीने लागवड केली आहे. तीन वर्षांनी चिंचेचे उत्पादन सुरू होईल. सध्या दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ४० गावरान जांभळाची झाडेही आहेत. आता टॅंजेरिन संत्र्याची रोपे नेटहाउसमध्ये तयार करण्यास सुरुवात केली असून १० हजार रोपे तयार देखील झाली आहेत.

पाणी व्यवस्था

भंडारी वीस वर्षांपासून ठिबक सिंचनाचा वापर करतात. एक शेततलाव, विहीरी आहेत. पंधरा वर्षापासून स्वयंचलित ठिबक यंत्रणा उभारली आहे. अशी यंत्रणा या भागात उभारण्यात आघाडी घेण्याऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. बागेसाठी व्यवस्थापक असून पाच ते सहा कायमस्वरूपी मजूर आहेत.

संपर्क ः अशोक भंडारी, ९३७१०१६६५६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com