Poultry Farming : दुष्काळी पट्ट्यात यशस्वी केला कुक्कुटपालन व्यवसाय

चास (जि. नगर) येथील माजी सैनिक सुभाष गोंडाळ यांनी सतरा वर्षे यशस्वी देशसेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी बंधू गुलाब गोंडाळ यांच्या मदतीने भोयरेपठार (ता. नगर) येथील डोंगराळ भागात करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुपालन व्यवसायास सुरुवात केली.
Poultry Industry
Poultry Industry Agrowon

Poultry Farming नगर तालुक्यातील पश्चिम भागात पाण्याचा शाश्वत स्त्रोत नसल्याने येथील शेती पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकरी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत आहेत.

चास (ता.नगर) येथील सुभाष लिंबाजी गोंडाळ व गुलाब लिंबाजी गोंडाळ हे दोघे बंधू. सुभाष यांनी कृषी पदविका तर गुलाब यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांच्या एकत्रित कुटुंबाची बारा एकर शेती आहे.

पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतीमध्ये पारंपारिक पिकांची लागवड (Traditional Agriculture) केली जाते. सुभाष यांनी १७ वर्ष भारतीय सैन्य दलात नोकरी केली. पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी चासपासून १० किमी अंतरावरील भोयरे पठार शिवारात ब्रॉयलर कुक्कुटपालनास (Broiler Poultry) सुरुवात केली.

सुरुवातीची २० हजार कोंबड्यांची बॅच यशस्वी झाल्यानंतर यंदा दोन शेड उभारत २६ हजार कोंबड्यांचे संगोपन ते करत आहेत.

Poultry Industry
Poultry Farming : तंत्रज्ञानयुक्त नावारूपास आलेला पोल्ट्री उद्योग

करार पद्धतीने कुक्कुटपालनास सुरुवात

सेवानिवृत्तीनंतर शेतीला पूरक व्यवसाय करायचा असे सुभाष गोंडाळ यांनी ठरवले होते. त्यासाठी अकरा वर्षांपूर्वी भोयरे पठार येथील माळरानावर १ एकर जागा घेतली होती. निवृत्तीनंतर मित्र भास्कर भोर यांच्या सोबत चर्चा करून करार तत्वावर कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचे निश्चित केले. खासगी कंपनीसोबत करार पद्धतीने ऑगस्ट २०१७ मध्ये व्यवसायास सुरुवात केली.

त्यासाठी २०१७ मध्ये ३९ लाख रुपये खर्च करून २० हजार पक्षी क्षमतेची दोन शेड उभारली. त्यासाठी भाऊ गुलाब गोंडाळ यांची मदत मिळाली. तीन वर्ष व्यवसाय सुरळीत सुरु चालल्यानंतर पुन्हा त्यात वाढ करण्याचे ठरवले.

Poultry Industry
Poultry Farming : ‘परसबागेतील कुक्कुटपालन’व्यवसायाद्वारे करा अंडी उत्पादन

मागील दोन वर्षांपुर्वी पुन्हा चार एकर जागा खरेदी करून १३ हजार क्षमतेची प्रत्येकी दोन शेड उभारली. त्यासाठी सुमारे ५६ लाख रुपये खर्च आला. कुक्कुटपालनातून मिळालेली रक्कम आणि बँकेकडून कर्ज घेऊन रक्कम उभी केली.

व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच खासगी कंपनीसोबत करार केलेला आहे. त्यानुसार कंपनीद्वारे प्रति किलोस साडेसहा रुपये दर मिळतो. असे दर महिन्याला साधारण ५ ते साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

Poultry Industry
Poultry Industry : कोंबडीपालन व्यवसायाच्या समस्या जाणून करा उपाय

पाच वर्षांपासून सेंद्रीय शेती

सुभाष गोंडाळ यांनी कुक्कटपालनासह शेतीकडेही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कुक्कुटपालनातून वर्षाला सुमारे ५०० ते ५५० टन कोंबडी खत उपलब्ध होते. मागील ५ वर्षांपासून त्यांनी या खताचा आपल्या शेतीमध्ये वापर करण्यास सुरुवात केली आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णतः बंद केला आहे. शिल्लक राहिलेले कोंबडीखत १२० रुपये प्रति ३० ते ३५ किलो दराने जागेवरच विक्री होते.

‘ऑपरेशन पराक्रम’ मध्ये सहभाग

सुभाष गोंडाळ यांची २००० मध्ये सैन्याच्या रणगाडा विभागात नेमणूक झाली. त्यांनी राजस्थान, हरियाना, पंजाबमधील पठाणकोट, जम्मू-काश्मीरमधील सांबा भागात सुमारे १४ वर्षे सेवा बजावली.

दिल्ली संसदेवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर त्यांची वर्षभर भारत-पाकिस्तान सीमेवर नेमणूक करण्यात आली. त्या ‘ऑपरेशन पराक्रम’ मध्ये सुभाष गोंडाळ यांचा सक्रीय सहभाग होता. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या टीमद्वारे ४ अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.

Poultry Industry
Poultry Disease : कोंबड्यातील मुख्य जीवाणूजन्य आजार

कुक्कुटपालनाचे गणित

करार केलेल्या कंपनीकडून पिल्ले, खाद्य, औषधे पुरवठा आणि वेळेवर लसीकरण केले जाते. कुक्कुटपक्ष्यांना पाणी, खाद्य देणे, गव्हाचा भुसा (तुस) खरेदीसह व इतर कष्टाच्या कामांसाठी चार मजूर ठेवले आहेत. शिवाय सुभाष हे सर्व कामांमध्ये स्वतः ठेवून असतात.

पंचेचाळीस दिवसांनी कंपनीकडून शेडवरच वजन करून कोंबड्यांची खरेदी होते.

साधारण ४५ दिवसांमध्ये एक कोंबडीचे वजन साधारण ३ किलोपर्यंत मिळते. त्यासाठी साधारण साडेचार किलो खाद्य लागते. त्यानुसार कंपनीला साधारणपणे ९५ रुपये प्रति किलो उत्पादन खर्च येतो. यावरच सर्व आर्थिक गणित अवलंबून आहे.

कंपनीला उत्पादन खर्च जितका कमी येईल तितका अधिक मोबदला त्यांना मिळतो. म्हणजेच उत्पादन खर्चात वाढ झाल्यास कंपनीद्वारे प्रति किलोस ४० पैसे कमी केले जातात. तर खर्च कमी झाल्यास ४० पैसे अधिक रक्कम दिली जाते.

कोंबड्यांचे अपेक्षित वजन मिळविण्याकरिता कोंबड्यांचे वयानुसार वजनाचे दर ४ दिवसांनी मोजमाप केले जाते. कंपनीतील मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार खाद्याचे नियोजन केले जाते. जेणेकरून अपेक्षित वजन मिळेल.

पिल्ले आणल्यापासून सातव्या, बाराव्या आणि २१ व्या दिवशी लसीकरण होते.

एक बॅच गेल्यानंतर दुसऱ्या बॅच साधारण २० दिवसांनी सुरु केली जाते. या काळात शेड, खाद्य आणि पाण्याची भांडी आदींची स्वच्छता केली जाते.

साधारण ६५ दिवसांची एक बॅच याप्रमाणे १३ महिन्यांत साधारण ६ बॅच होतात.

- सुभाष गोंडाळ ८७१५८३६५८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com