
Success Story : सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे सर्वाधिक भातपीक घेतले जाते. तालुक्यातील बनपुरी हे वाल्मीकी पठाराजवळील छोटे गाव आहे.
येथील अभय अरविंद पवार यांनी एमएपर्यंत शिक्षण झाल्यानंतर ‘मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) म्हणून नोकरी सुरू केली.
फिरतीच्या या नोकरीत त्यांच्या पाहण्यात नाचणीची उत्पादने (Ragi Production) आली. आपल्याच भागात पिकणाऱ्या या नाचणीस चांगली बाजारपेठ व वाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपणही त्यात उतरावे असा विचार करून अभ्यास व माहिती घेऊन कामास सुरुवात केली.
सुरुवातीचा व्यवसाय
अभय यांची साडेचार एकर शेती आहे. त्यात भात व काही प्रमाणात नाचणी घेतली जायची. सन २००७ च्या सुमारास स्वतःच्या शेतातील नाचणीवर घरगुती स्तरावर प्रक्रिया सुरू करून सत्त्व तयार करण्यास सुरुवात केली.
‘एमआर’च्या नोकरीचा अनुभव असल्याने मार्केटिंग व विक्रीचे कौशल्य आले होते. ग्राहकांकडून उत्पादनांना पसंती मिळू लागल्यानंतर उत्साह वाढला. दोन वर्षांनंतर नोकरी सोडून केवळ व्यवसायावरच लक्ष केंद्रित केले. गावापासून जवळच ढेबेवाडी येथे गाळा घेऊन उत्पादन निर्मिती सुरू केली.
व्यवसायाची वृद्धी करताना पल्व्हरायजर, व्हायब्रो स्पिन, ड्रायर, ओव्हन, बिस्किट कटिंग आदी यंत्रसामग्री घेतली. दरम्यान, कुपोषित बालकांसाठी वर्षभर शासनासाठी नाचणी सत्त्वाचा पुरवठा केला. आरोग्यदायी खाणार त्याला संजीवनी देणार हे ‘स्लोगन’ तयार केले.
व्यवसायातील ठळक बाबी
-गोदाम, कार्यालय, उत्पादन, यंत्रे आदींच्या अनुषंगाने ढेबेवाडीत घेतले आठ गाळे.
-बनपुरीत १२ गुंठे जमीन खरेदी. आठ चौरस फूट जागेत प्रकल्प उभारणी.
-उद्योगाची सुरुवात २५ हजार रुपयांपासून केली. सन २०२० पर्यंत बॅंकेचे दीड कोटी रुपयांपर्यंत कर्ज होते. स्वतःकडील रक्कम ५० लाख रुपयांपर्यंत गुंतविली.
-रामायणात हनुमानाने संजीवनी बुटी आणून दिल्यामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले होते. त्याच धर्तीवर आपले पदार्थ ग्राहकांसाठी संजीवनी प्रमाणे आरोग्यदायी ठरावेत यादृष्टीने उत्पादनांना संजीवनी नाव दिले.
-नाचणी पदार्थांची निर्मिती सुरू असताना आपल्या भागात सर्वाधिक भात पिकतो व त्यास मागणी चांगली असते हे लक्षात आले. त्यादृष्टीने २०१९ राइस मिल सुरू केली. कोरोना काळात हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्याने तांदळाची मागणी कमी होऊन व्यवसाय तात्पुरता थांबला. तथापि, २०२१ मध्ये नव्या जोमाने सुरू केला.
-परिसरातील इंद्रायणी तांदळास चव असल्याने मागणी चांगली होऊ लागली. कारखान्याची प्रक्रिया क्षमता प्रतिदिन दोन टन तांदूळ अशी आहे. एक किलो ते ३० किलोपर्यंतचे पॅकिंग होते.
-स्वतःच्या शेताखेरीज पाटण व शिराळा तालुक्यांतील मिळून २५७ शेतकऱ्यांकडून नाचणी व तांदूळ हा कच्चा माल घेतला जातो.
उत्पादने व उलाढाल
नाचणीपासून शेवई, लाडू, आटा, सत्त्व, पापड, बिस्किटे आदी पदार्थांची निर्मिती होते. तर ‘सिंगल व डबल पॉलिश, ब्राउन इंद्रायणी तांदूळ असे प्रकार तयार करून एक ते ३० किलोपर्यंत पॅकिंग होते. सातारा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांपर्यंत सर्व उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे.
वितरक नेमले आहेत. कऱ्हाड येथे ‘फॅक्टरी आउटलेट’ सुरू केले आहे. नाचणीच्या उत्पादनांची किंमत १५० पासून ४०० रुपयांपर्यंत आहे. तांदळाची किलोला ५५ ते ६० रुपये व ब्राउन राइसची ८० रुपये दराने विक्री होते. उद्योगात २२ जणांना रोजगार दिला आहे.
वर्षाकाठी नाचणी व तांदळाची प्रत्येकी ५६ ते ६० लाख व दोन्ही मिळून एक कोटी रुपयांची उलाढाल होते. व्यवसायात स्वतःचा कच्चा माल असेल तर नफ्याच्या टक्केवारी वाढ होते.
दांपत्याचे योगदान
अभय यांच्या पत्नी शुभांगी एमएबीएड असून, एका संस्थेत शिक्षकपदाची त्यांना कायम स्वरूपाची नोकरी होती. मात्र ती सोडून त्या पूर्णवेळ व्यवसायात उतरल्या. उत्पादन निर्मिती पॅकिंगची जबाबदारी त्यांच्याकडे असते. तर विक्री, मार्केटिंग, कच्चा मालाची खरेदी आदी जबाबदारी अभय सांभाळतात.
व्यवसायात कृषी विभाग, खादी ग्रामोद्योग, सणबूर येथील बॅक ऑफ इंडिया यांचा हातभार लागला आहे. पुढील काळात अद्ययावत यंत्राचा वापर करून विस्तार करण्याचा मानस आहे.
अभय यांना ग्रामीण युवा उद्योजक पुरस्कार मिळाला असून, शुभांगी यांची आत्मनिर्भर महिला सदर अंतर्गत आकाशवाणीवर मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. दैनिक ‘ॲग्रोवन’चे ते नियमित वाचक असून, सात- आठ वर्षांपासूनची जपून ठेवलेली कात्रणे व्यवसायासाठी उपयुक्त ठरल्याचे ते सांगतात.
संपर्क - अभय पवार- ७५०७८३६०११
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.