शेवंतीचे रंग खुलले आयुष्य सुखाने बहरले

पुणे जिल्ह्यातील कुसूर येथील दुराफे कुटुंबाचे शेवंती हे मुख्य पीक आहे. कुटुंबातील अभियंता व तिशीतील संकेतने देखील नोकरीपेक्षा पूर्णवेळ शेतीलाच महत्त्व दिले आहे. त्या माध्यमातून वर्षभर विविध हंगामांत पाच एकरांत तीन रंगांच्या वाणांचे उत्पादन घेत दुराफे यांचे कौटुंबिक जीवन समाधानाने बहरून गेले आहे.
शेवंतीचे रंग खुलले आयुष्य सुखाने बहरले
FloricultureAgrowon

पुणे जिल्ह्यात कुसूर (ता. जुन्नर) येथे पंढरीनाथ किसन दुराफे हे पारंपरिक फूल उत्पादक शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची सात एकर शेती असून भाजीपाला पिके असतात. शेवंती हे त्यांचे मुख्य व बारमाही पीक आहे. दरवर्षी त्याचे सुमारे पाच एकर क्षेत्र असते. दुराफे यांचा मुलगा संकेत ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ असून, तळेगाव दाभाडे येथील कंपनीत त्याने चार पाच वर्षे नोकरी केली. आज शेतीची मुख्य जबाबदारी तो सांभाळत आहे.

शेवंतीची शेती

विविध रंगी वाण

फूलशेतीत विविध तंत्र तसेच बाजारपेठेतील मागणीनुसार पारंपरिक वाणांना पर्याय म्हणून नवे वाणही येत आहेत.

-वर्षभर विविध हंगामांत वाण घेतले जाते. त्यातून ताजे उत्पन्न मिळत राहते.

-जांभळ्या फुलांचे वाण- वर्षभर उत्पादन- एकरी ७ ते ९ टन उत्पादन. डिसेंबरला लागवड होते.

मेमध्ये प्लॉट सुरू होतो. डिसेंबरपर्यंत सुरू राहतो.

-पांढऱ्या रंगाचे दोन वाण आहेत. त्यातील एकाचे उत्पादन एकरी पाच टन मिळते. जूनमध्ये प्लॉट सुरू होतो. नवरात्रीपर्यत संपतो. अन्य वाणाची लागवड मार्चमध्ये होते. जूनला प्लॉट सुरू होतो व गणपती- दसरा या काळात फुले मिळतात. उत्पादन एकरी ८ टनांपर्यंत मिळते.

-हे पांढरे वाण पारंपारिक पांढऱ्या आणि पिवळ्या शेवंतीपेक्षा आकाराने मोठे, वजनाला ३० टक्क्यांनी जास्त आहे. पाकळ्या मोठ्या आणि जाड आहेत. फुले अधिक घट्ट असल्याने हाताळणी सोपी आणि नुकसान कमी होते. टिकवण क्षमता जास्त आहे. हाताळणी मध्ये पाकळ्यांची गळ होत नाही. फूल

पाकळ्यांना चकाकी जास्त असल्याने बाजारपेठेत मागणी असते.

-पिवळा वाण- याची मार्चमध्ये लागवड होते. तो दिवाळीला संपतो.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

-मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन व सहा फुटी रुंद व दीड फूट उंचीचा गादीवाफा यावर लागवड.

-एकरी १५ ते १६ हजार रोपांची लागवड (वाणनिहाय बदल)

- लागवडीनंतर सुमारे तीन महिन्यांनी उत्पादन सुरू. रिकट घेऊन पुन्हा उत्पादन घेता येते.

-मशागतीनंतर १० टन लेंडी खताबरोबर बेसल डोस. (डीएपी आणि पोटॅश प्रत्येकी ५० किलो, सल्फर

-हवामानानुसार ८ ते १० दिवसांनी गरजेनुसार कीडनाशकांची फवारणी. विविध ग्रेडच्या विद्राव्य खतांचा

पीकवाढीनुसार वापर. सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर.

Floriculture
FloricultureAgrowon

विक्री व दर

एक दिवसाआड फुलांची तोडणी होते. क्रेटमध्ये वृत्तपत्र कागदांचा वापर करून पॅकिंग केले जाते. पिकविणे अवघड आहेच. पण त्याबरोबर विक्री करणे त्याहून अवघड असते. यामुळे एका भावाने शेतीत पिकवायचे आणि दुसऱ्याने विक्री करायची असे सूत्र ठेवले आहे. आई मंगला आणि वडील पंढरीनाथ यांच्या साथीने संकेत शेतीत राबतो. दुराफे यांचा दुसरा मुलगा अनिकेत मुंबई येथील दादर फूल बाजारपेठेत अडतीचा व्यवसाय सांभाळतो. त्यामुळे विक्रीची चांगली व्यवस्था आहे. या पिकात सुमारे सहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. वर्षभरात गणेश उत्सव, दसरा, दिवाळी तसेच लग्नसराई असे विविध सण- समारंभ सुरू असतात. अशा काळात किलोला कमाल दर २५० ते ३०० रुपयांपर्यंत मिळतात. वर्षभराचा सरासरी दर ६० ते ८०- १०० रुपयांपर्यंत मिळतो.

संकेत सांगतात, की शेवंती पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्लॉट सुरू झाल्यानंतर तो सुमारे दोन ते तीन महिने चालत असल्याने काही वेळा दर घसरले तर पुढील काळात ते वाढण्याची संधीही मिळते. बाजारपेठेत विक्रीचे सातत्य ठेवले तर ग्राहकांतही विश्‍वास निर्माण होतो असे संकेत सांगतात. एकरी उत्पादन खर्च सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत येतो.

कोरोनानंतरच्या काळात सर्वाधिक दर

कोरोना काळात फूलशेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड कमी केली होती. म्हणूनच कोरोना निर्बंध उठल्यानंतर बाजारातील फुलांची आवक कमी होती. आता मागणी वाढू लागल्यामुळे फुलांचे दर वाढले होते. याच दरम्यान संकेत यांचा एक प्लॉट सुरू होता. या काळात प्रति किलोला सर्वाधिक ३०० ते ३५० रुपये दर मिळाल्याचे संकेत सांगतात. सध्या १५० रुपये दर मिळत आहे.

फुलांसाठी शीतगृह

दुराफे यांची ९० टक्के फूलशेतीच असल्याने वर्षभर मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बाजारपेठेतील आवक आणि मागणीचे संतुलन अनेकवेळा बिघडते. दर पडतात. काही वेळा फुले फेकून देण्याची वेळ येते. हे नुकसान टाळण्यासाठी गेल्या वर्षी दसऱ्यावेळी सहा लाख रुपये खर्चून आठ टन क्षमतेचे शीतगृह शेतात उभारले आहे. परिसरातील शेतकऱ्यांची फुलेही त्यात ठेवली जातात. साधारण पितृपंधरवडा आणि बिगर हंगामी काळात फुलांचे दर कमी असतात. त्या काळात साठवणूक करून बाजारपेठेच्या अंदाजानुसार विक्री करणे शीतगृहामुळे सोपे होते.

पुष्पसंशोधन संचालनालयाद्वारे गाव दत्तक

पारंपारिक फुलशेतीसाठी कुसूर गाव प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांचा अनुभव आणि पारंपारिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी पुणे येथील पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने कुसूर हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. त्याद्वारे विविध वाणांवर संशोधन, प्रात्यक्षिके घेतली जातात. फूल संशोधनात शेतकऱ्यांना सहभागीही केले जात असल्याचे संचालनालयाचे संशोधक डॉ. गणेश कदम सांगतात.

संपर्क ः संकेत दुराफे, ७७०९०८१७८५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com