Soybean Cultivation : गादीवाफा, जोडओळ पद्धतीने यशस्वी सोयाबीन लागवड

हिंगोली जिल्ह्यातील वांझोळा येथील रामेश्‍वर गावंडे सहा वर्षांपासून गादीवाफा (Bed Method), जोडओळ व टोकण पद्धतीने सोयाबीनचे (Soybean Sowing) यशस्वीपणे एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन (Soybean Production) घेत आहेत. केवळ उत्पादनाचाच नव्हे तर या पद्धतीचे अनेक फायदे त्यांना मिळाले आहेत. हळदीतही सोयाबीन घेणाऱ्या गावंडे यांचे विविध प्रयोग अनेक शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय व आदर्श ठरले आहेत.
Soybean
Soybean Agrowon

हिंगोली- वाशीम राष्ट्रीय महामार्गावरील कनेरगाव नाका नजीक वांझोळा हे छोटे गाव आहे. येथील रामेश्‍वर गावंडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्यांनी काही काळ शिवणकाम व्यवसाय (Tailoring Business) केला. सन २००१ पासून पूर्णवेळ शेती करीत त्यात त्यांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. र्तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्राशी (केव्हीके) जोडलेले शेतकरी म्हणून त्यांचा परिचय आहे.

Soybean
Soybean : सोयाबीनची नक्की लागवड किती?

प्रयोगशील शेती

वडिलोपार्जित साडेतीन एकर आणि खरेदी केलेली दोन एकर अशी गावच्या शिवारात तीन ठिकाणी मिळून गावंडे यांची साडेपाच एकर मध्यम, चिबड प्रकारची जमीन आहे. एका जमिनीच्या ठिकाणाहून ओढा वाहतो. शेतीत विविध प्रयोग करण्यामध्ये रामेश्‍वर यांची ओळख आहे. एक एकर संत्रा, ॲपलबेर, भाजीपाला बीजोत्पादन त्यांनी घेतले. परंतु बाजारपेठांच्या अडचणींमुळे काही पिके थांबवावी लागली. आता खरीप व रब्बी पिके व बीजोत्पादन अशी त्यांची यशस्वी पीक पद्धती आहे. या पिकांत विविध प्रयोग करण्याची वृत्ती जपली आहे. बीज प्रक्रिया, फेरपालट यांचे काटेकोर पालन ते करतात. संरक्षित सिंचनाची सुविधा आहे.

Soybean
Soybean : मराठवाड्यात सोयाबीनवर ‘पिवळा मोझॅक’चा प्रादुर्भाव

गादीवाफा, जोडओळ पद्धतीने सोयाबीन

पूर्वी गावंडे पारंपारिक बैल वा ट्रॅक्टरचलित अवजारांने सोयाबीन पेरणी करीत. एकरी २८ ते ३० किलोपर्यंत बियाणे लागे. एकरी ६ ते ७ क्विंटल उत्पादन मिळे. चिबड प्रकारची जमिनीत जास्त पाऊस झाल्यानंतर शेतातून पाणी पाझरायचे. पीक पिवळे पडून सडून जायचे. उत्पादनात मोठी घट यायची. २०१५ मध्ये केव्हीकेतर्फे वांझोळा येथे उन्हाळी भुईमुगाचे गादीवाफा (बेड) व मल्चिंग पद्धतीने लागवड प्रात्यक्षिक आयोजित केले होते. त्यावेळी या पद्धतीने सोयाबीन घेता येईल का अशी विचारणा गावंडे यांनी केव्हीकेच्या तज्ज्ञांकडे केली. प्रयोग करून पाहण्याचा सल्ला देण्यात आला.

Soybean
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

...असा राबविला प्रयोग

सन २०१६ मध्ये २० गुंठ्यांत प्रयोग सुरू केला. चार फूट सरी ओढून गादीवाफे तयार केले. त्याची माथा रुंदी दोन फूट ठेवली. दोन ओळींत १८ इंच तर दोन झाडांतील अंतर सहा इंच ठेवले. संरक्षित पर्याय म्हणून एका जागी तीन बियांची टोकण केली. अर्ध्या एकरासाठी सहा किलो बियाणे लागले. त्यापासून साडेसहा क्विंटल उत्पादन मिळाले. या पद्धतीने उत्पादन वाढत असल्याचे आढळले.

सन २०१७ मध्ये दोन एकरांत प्रयोग केला. एकूण २५ ते २६ क्विंटल उत्पादन मिळाले. गेल्या वर्षीपर्यंत गावंडे मजुरांकरवी लावण करीत. यंदा टोकण यंत्राचा वापर केला. त्यामुळे एका दिवसात तीन एकरांत टोकणणी शक्य झाली. यंत्रामुळे बियाणे एकसमान अंतरावर पडते. मजुरांवरील खर्च व वेळ कमी झाला. बेड पद्धतीत नत्र, स्फुरद, पालाश घटकयुक्त खतासोबत एकरी १० किलो गंधकाचा बेसल डोस देतात. कीड नियंत्रणासाठी तीन फवारण्या घेतात.

...अन्य शेतकऱ्यांनी घेतली प्रेरणा

यंदा जुलैमध्ये कनेरगाव मंडलात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जमिनी चिबडल्या. पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने पीक पिवळे पडून मोठे नुकसान झाले. त्या तुलनेत गावंडे यांच्या शेतातील पाणी सऱ्यांवाटे निघून गेले. पीक चांगल्या स्थितीत राहिले. गावंडे यांचा अनुभव व प्रेरणा घेत वांझोळा परिसरातील शेतकरी गादीवाफ्यावर सोयाबीन घेऊ लागले आहेत. यंदा परिसरात सुमारे ३०० एकरांवर या पद्धतीने लावण असावी अशी शक्यता आहे.

गावंडे यांच्या या प्रयोग पद्धतीचे झालेले फायदे

-एकरी बियाण्याचे प्रमाण कमी लागले. (१२ किलो).

-जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा.

-कमी पाऊस झाल्यास सऱ्यांमुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा पिकास फायदा.

-दीर्घ खंड काळात स्प्रिंकलरव्दारे पाणी देणे सोयीचे. पारंपरिक पद्धतीत दाट रान झाल्याने

स्प्रिंकलरची सुविधा करणे अडचणीचे असते.

-हवा खेळती राहते. पिकास भरपूर सूर्यप्रकाश मिळतो.

-कीड -रोगांचे प्रमाण कमी राहते.

-आंतरमशागत व तण नियंत्रण सोपे होते. कोळप्याने काढता येते.

-पिकाची कापणी सोपी. पूर्वी एकरी सात ते आठ मजुरांची गरज लागायची. आता चार माणसांत काम होते.

-मजुरी, बियाण्यांवरील खर्च कमी होतो.

-उत्पादकता वाढते. एकरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन मिळत आहे.

हळदीत सोयाबीन

कूपनलिकेद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर २०१५-१६ पासून दरवर्षी एक- दीड एकरांत बेडवर हळद लागवड असते. दोन बेडमध्ये साडेचार फूट अंतर असते. रुंदी दोन फूट तर दोन ओळींत दीड फूट अंतर असते. दोन बेडमध्ये सोयाबीनच्या दोन ओळी असतात. हळदीचे एकरी २७ ते ३० क्विंटल, तर सोयाबीनचे एकरी ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. या पद्धतीत तणकटही कमी उगवते. आंतरपिकामुळे बोनस उत्पन्नही मिळते.

कपाशीचे बीजोत्पादन

-सन २००४ पासून २० गुंठ्यांत बियाणे क्षेत्रातील कंपनीसाठी बीटी कपाशीचे बीजोत्पादन.

(मध्यंतरी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने काही वर्षे थांबवले होते.)

-चांगले बियाणे (गुड सीड) निकषानुसार प्रति क्विंटल १८ हजार ते अलीकडे २५ हजार रुपये दर मिळाला.

तज्ज्ञांनी थोपाटली पाठ

गावंडे यांच्याकडे बैलजोडी नाही. मशागत, पेरणी आदी कामे ते भाडेतत्त्वावरील

ट्रॅक्टरद्वारे करून घेतात. पत्नी शकुंतला यांची शेतीत मोठी मदत मिळते. तोंडापूर केव्हीकेचे

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, कृषी विद्या विषय विशेषज्ञ राजेश भालेराव, कृषी विभागाच्या

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते. भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत पुणे येथील

‘अटारी’ संस्थेचे संचालक डॉ. लाखनसिंह, पोकराचे कृषिविद्यावेत्ता विजय कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी गावंडे यांच्या गादीवाफा व जोड ओळ पद्धतीच्या सोयाबीन प्लॉटची पाहणी करून त्यांची पाठ थोपटली आहे.

रामेश्‍वर गावंडे, ९५५२९४९३०४

चिबड प्रकारच्या जमिनीवर बेड पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते. भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहते. परिणामी, किडी-रोगांचे प्रमाण कमी राहते. अशा पद्धतीचा अंगीकार जिल्ह्यातील असंख्य शेतकरी करीत आहेत. कोरडवाहू क्षेत्रात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरते आहे.
राजेश भालेराव केव्हीके, तोंडापूर, जि. हिंगोली ७५८८१५३३११

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com