Lemon Grass
Lemon GrassAgrowon

कशाला हवं मुंबईतलं संघर्षाचं जिणं! गावी गवती चहानं दिला सक्षम पर्याय

अनेक वर्षे मुंबईत राहून संघर्षाचं जिणं जगणाऱ्या रेड (ता. शिराळा, जि. सांगली) येथील सुनील निकम यांना गावच्या शेतीचा आणि त्यातही गवती चहाचा सक्षम पर्याय सापडला. दीर्घ अनुभव, पीक व्यवस्थापनात पारंगत होणे व सक्षम विक्री व्यवस्था यातून हे पीक त्यांनी भागात रुजवले. आर्थिकदृष्ट्या यशस्वीही केले.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका म्हटलं, की भात शेती डोळ्यासमोर येते. बहुतांश शेतकऱ्यांची शेती तुकड्यातच पाहायला मिळते. त्यामुळे पिकांची विविधता व प्रयोगांना मर्यादा येतात. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थ मुंबईला उदरनिर्वाहासाठी जातात. शिराळा अतिपावसाचा तालुका असला तरी तलावांची संख्या कमी आहे. त्यामुळे कोरडवाहूच पिकंच घेतली जायची. कालांतराने ऊस घेण्यास सुरुवात केली. पण जेमतेम पैसा हाती येत होता. गावातील सुनील निकम यांची अडीच एकर शेती आहे. वडील श्यामराव, आई लक्ष्मी शेती करायचे. सातवीची सहामाहीची परीक्षा दिल्यानंतर सुनील यांनी थेट मुंबई गाठली. तेथे बहीण राहते.

मुंबईतील संघर्ष

मुंबईत सुनील यांनी हॉटेलमध्ये काम सुरू केले. तेथे जेवणही बनवण्यास शिकले. गावाकडची काही मंडळी तिथं भेटली. हॉटेलमध्ये काम करण्यापेक्षा आमच्यासोबत दादर येथील भाजीपाला- फळ मार्केटमध्ये ये. तिथं चांगला रोजगार मिळेल असं त्यांनी सुचवलं. मग सुनील यांनी दादर मार्केट गाठलं. तेथे हळूहळू मध्यस्थ, व्यापाऱ्यांशी चांगली गट्टी झाली. पुदिना, गवती चहा आदींची विक्री करून पैसा शिल्लक पडू लागला.

१९९२ ची दंगल अनुभवली

मुंबईत कोणी उपाशी राहत नाही. पण सतत धावपळीचं जीवन जगताना सुनील कुटुंबात रमून गेले. तेवढेच क्षण समाधानाचे वाटायचे. सन १९९२ ला मोठी दंगल झाली. त्या आठ दिवसांत बाहेर कुठं जाता आलं नाही. पोटाला लागणारं साहित्य मिळणं मुश्कील झालं. यातून अनेक गोष्टींनी शिकवलं. गावी असलेल्या आई-वडिलांना मुलांची काळजी लागली. सुनील परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडले पण पण पुढे तुटपुंज्या उत्पन्नामुळे आर्थिक ओढाताण होऊ लागली. काही वेगळे करायचा विचार होता. पण मार्ग सापडत नव्हता.

...अखेर मार्ग मिळाला

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील नीरा गावातील एकाशी मैत्री झाली. त्याने गवती चहाचे कंद देत त्या शेतीचे महत्त्व समजावले. सुनील यांनी गावी शेताच्या बांधावर ते लावले. मुंबईत राहून गावाकडील शेतीची जबाबदारीही घेऊ लागले. दरम्यान, शेतात बोअर घेतले. त्याला पाणी लागले. अखेर गावी जाऊन चांगली शेती करावी असे पक्के ठरवले. सन २००३ मध्ये ते गावी परतले. सुरुवातीला ऊस घेऊ लागले. एकरी तीस ते चाळीस टनांचा उतारा पडू लागला. अजूनही पर्यायी सक्षम पिकाचा शोध सुरू होता.

बांधावर लावलेल्या गवती चहाची व्यावसायिक लागवड करण्याचा विचार सुरू झाला. या भागासाठी आणि निकम यांच्यासाठीही हे नवे पीक होते. पण जोखीम घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. सन २०११ च्या दरम्यान २० गुंठ्यांवर प्रयोग केला. तो यशस्वी झाला.

पॉली मल्चिंगवरील गवती चहाची काढणी.
पॉली मल्चिंगवरील गवती चहाची काढणी.Agrowon

विक्री व्यवस्था

मुंबईत व्यापाऱ्यांची चांगली ओळख झाली होती. त्यामुळे गवती चहाला असलेली मागणी, दर यांची कल्पना होती. व्यापाऱ्यांना याबाबत सांगितल्यानंतर निश्‍चिंतपणे आमच्याकडे पाठवा असे उत्तर आले. व्यापाऱ्यांनी दाखवलेल्या विश्‍वासामुळे ‘मार्केटिंग’ सोपे झाले. पुढे मग निकम यांनी आपल्या दर्जेदार मालाची ओळखच तयार केली. व्यापारी व ग्राहक यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ नये यासाठी गुणवत्ता कायम जोपासली.

कोरोनात नुकसान

सन २०२० मध्ये दोन कापण्या झाल्या होत्या. दरम्यान, कोरोना लॉकडाउन सुरू झाल्याने मार्केट बंद झाले. विक्री व्यवस्था कोलमडली. काढणीला आलेला गवती चहा काढून टाकला. दोन वर्षांत सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. पण सुनील खचले नाहीत. पुढील वर्षी क्षेत्र कमी केले. आव्हानात्मक काळ पचवला. आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने पुन्हा विक्री सुरळीत सुरू झाली आहे.

काढणीनंतर अशा पद्धतीने स्वच्छता होते.
काढणीनंतर अशा पद्धतीने स्वच्छता होते.Agrowon

गवती चहा शेती- ठळक बाबी

लागवड

-अलीकडील काळात एक एकरापर्यंत क्षेत्र.

-शक्यतो पॉली मल्चिंगवर व चार फुटी सरीत दोन ठोंबांत दीड फुटापर्यंत अंतर ठेवून लागवड.

-एकदा लागवड केली की वर्षभर उत्पादन. मृगाच्या पावसावर लागवड.

-मल्चिंगमुळे भांगलणीचा खर्च वाचतो. वाफसा कायम राहतो.

-पहिली कापणी तीन महिन्यांनी, नंतर दर महिन्याला. वर्षभरात एकूण सातपर्यंत कापण्या.

-प्रत्येक कापणीनंतर १९ः१९ः१९, १०ः२६ः२६, ह्युमिक ॲसिड आदींचा वापर.

-पिकाला बुरशीजन्य रोगाचा धोका. त्यासाठी दर पंधरा दिवसांच्या अंतराने किंवा गरजेनुसार बुरशीनाशकांच्या प्रतिबंधक फवारण्या.

-आई-वडिलांसह पत्नी सुरेखादेखील शेतात राबतात. त्यामुळे श्रमांची विभागणी. जावई रोहित खोपडे (पावलेवाडी, ता. शिराळा) पुण्याला नोकरी करायचे. त्यांना गवती चहा करण्यासाठी प्रोत्साहित केले. यंदापासून त्यांनीही लागवड सुरू केली आहे. त्यांना या पिकाचा आधार मिळण्यास मदत झाली आहे, असे सुनील सांगतात.

उत्पादन, काढणी

-दोन किलोची पेंडी बांधली जाते.

-प्रति कापणीला तीन ते साडेतीन टन उत्पादन.

-एकरी खर्च- ६० ते ७० हजार रुपये.

उत्कृष्ट पेंडी बांधलेला दर्जेदार गवती चहा दाखवताना सुनील निकम.
उत्कृष्ट पेंडी बांधलेला दर्जेदार गवती चहा दाखवताना सुनील निकम.Agrowon

विक्री

-वाशी, दादर, भायखळा, पुणे या बाजारपेठा. एक डाग ६० ते ६५ किलोचा. रात्री खासगी बसमधून मार्केटला पाठवणी.

-दर प्रति किलो २०, ३०, ४० ते ५० रु. हिवाळ्यात (नोव्हेंबर ते जानेवारी काळात) मागणी अधिक. त्यामुळे दरही अधिक. त्यादृष्टीने नियोजन.

निकम यांच्या टिप्स

- या पिकाची कापणी सतत असल्याने मजूरबळ अधिक लागते.

- पाणी भरपूर लागते. त्याची चांगली सोय आवश्यक.

- वर्षभर मागणी व उत्पादन असल्याने घरचा खर्च भागवत राहणे शक्य.

संपर्क ः सुनील निकम, ९७६३७०१३९०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com