Sugarcane Production : एकरी ११० टन ऊस उत्पादनात जपले सातत्य

कोल्हापूर जिल्ह्यातील करनूर (ता. कागल) येथील अमोल कुमार खोत (वय ३९) या युवा शेतकऱ्याने आडसाली उसाच्या एकरी ११० टन उत्पादनाच्या आसपास सातत्य ठेवले आहे.
Sugarcane Production
Sugarcane ProductionAgrowon

Kolhapur Sugarcane : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) कागलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या करनूर येथे अमोल कुमार खोत यांची पाच एकर शेती आहे. माळाची, काळी अशी विविध प्रकारची त्यांची जमीन आहे. ऊस (Sugarcane) हेच त्यांचे मुख्य पीक आहे.

प्रत्येक वर्षी लागवडीपासून (Sugarcane Cultivation) ते खोडवा, निडव्यापर्यंत ते ऊस घेतात. आडसाली हा मुख्य ऊस हंगाम आहे. हंगामातील अनुकूल व प्रतिकूल हवामानाचा अभ्यास करून त्यांनी ऊस शेती फुलवली आहे.

प्रयोगशीलता जपली

अमोल आपले लहान बंधू सागर यांच्यासोबत सुमारे वीस वर्षांपासून शेतीत आहेत. पूर्वी उसाचे एकरी ४० टनांपर्यंतच उत्पादन यायचे. साडेतीन फुटी सरीत लागवड केली जायची. पुढे व्यवस्थापनात सुधारणा करताना लागवडीची पद्धत बदलली.

जसा जमिनीचा प्रकार असेल व चढउतार असेल त्यानुसार सरीची पध्दत वा ती किती सोडायची हे निश्‍चित केले जाते. यात साडेचार फुटापासून ते साडेसात फुटी पट्ट्यापर्यंत प्रयोग करून पाहिले आहेत. शक्यतो दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवले जाते.

सुटसुटीत अंतरामुळे रोपांची चांगली वाढ होते. त्याचा परिणाम ऊस उत्पादनवाढीवर होतो. मुरमाड जमिनीत अंतर जादा तर काळ्या जमिनीत काहीसे कमी ठेवले जाते. पाणी देण्याच्या पद्धतीतही सुलभपणा येतो. नदी, विहीर व कूपनलिका अशा तिन्हींचे पाणी विविध ठिकाणी आहे.

शेती प्रामुख्याने ठिबक सिंचनावर असली, तरी ज्या वेळी पाण्याची अधिक गरज लागते किंवा अतिशय उष्ण तापमान होते अशावेळी महिन्यातून एखादे पाणी पाटाने दिले जाते. मात्र त्याचा अतिरेक केला जात नाही.

Sugarcane Production
Sugarcane Crushing : सातारा जिल्ह्यात ऊस गाळपास गती

दर्जेदार बियाणे लागवडीवर भर

उसाच्या वाढीसाठी दर्जेदार बियाणे महत्त्वाचे ठरते. अनेक वर्षांपासून को ८६०३२ हे वाण वापरले जाते. सुरुवातीची काही वर्षे अमोल उत्कृष्ट बियाणे मिळवण्यासाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करत.

महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागातील अनेक गावांना भेटी देऊन ते उसाची प्रत पाहून त्याचे बेणे घेत. घरीच रोपे बनवून लागवड करण्यात येई. अगदी पाच हजार रुपये प्रति टनांपर्यंत बेण्यासाठी ऊसखरेदी केली.

अलीकडील चार वर्षांपासून मित्राच्या ‘नर्सरी’मधून खात्रीशीर रोपे ते आपल्या देखरेखीखाली करून घेतात.

मातीच्या सुपीकतेला प्राधान्य

उच्चांकी ऊस उत्पादन वाढीसाठी मातीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरत असतो. ही बाब प्रकर्षाने लक्षात घेऊन मातीच्या सुपीकतेला महत्त्व दिले आहे. उन्हाळ्यामध्ये जमिनीची आडवी नांगरट होते. दरवर्षी नाही मात्र गरजेनुसार एकरी दहा ट्रेलर शेणखताचा वापर होतो.

गेल्या पंधरा वर्षांपासून उसातील पाला पेटवला नाही. त्याचा वापर शेतातच पाचट म्हणून केला आहे. पाचटावर सिंगल सुपर फॉस्फेट एकरी चार पोती व युरिया दोन युरिया असे मिश्रण करून त्याचा वापर केला जातो. बैलाच्या साह्याने बगला मारण्यात येतात.

एका बाजूला ‘एनपीके’, तर दुसऱ्या बाजूला दुय्यम अन्नद्रव्ये दिली जातात. निंबोळी पेंड आणि शेणखताच्या माध्यमातून रासायनिक खते देण्यावर भर असतो. त्यानंतर पाटाद्वारे पाणी सोडले जाते. माती व दिलेल्या खताचे मिश्रण होऊन पाला चांगला कुजतो असा अनुभव आहे.

यामुळे मातीची प्रत चांगली राहते. खोडवा उसात साठ दिवसांनी रोटर फिरवून पाचट व माती एकत्र मिसळून जमिनीत व्यवस्थित गाडले जाते. दरवर्षी तागासारखे हिरवळीचे पीकही घेतले जाते. पन्नास दिवसांनी ताग मोडून जमिनीत गाडला जातो.

काहीवेळा सोयाबीनच्या माध्यमातून पीकबदलही केला जातो. जेणेकरून जमिनीला नत्रयुक्त खतांचा पुरवठा होतो. एकूण व्यवस्थापनातून जमिनीचा सेंद्रिय कर्ब १ ते १.१० टक्क्यांपर्यंत गेल्याचे अमोल सांगतात. त्यांच्या जमिनीचा पीएच ६.५ ते ७ पर्यंत आहे.

Sugarcane Production
Sugarcane Policy : ‘भीमाशंकर’कडून मेअखेर ऊस लागवडीचे धोरण जाहीर

चांगल्या उत्पादनात सातत्य

अनेक शेतकरी लागवडीच्या उसाचे उत्पादन एकरी १०० टनांहून अधिक घेतात. पण अनेक वेळा खोडवा किंवा निडव्याचे उत्पादन घेणे त्यांना शक्य होत नाही. अमोल यांनी दहा वर्षांपासून निडव्यापर्यंत उत्पादन घेण्यात सातत्य ठेवले आहे.

लागवडीच्या उसात एकरी १०८ ते ११३ टन उत्पादनापर्यंत अलीकडील वर्षांत सातत्य ठेवले आहे. एकेवेळी त्यांनी १३४ टनांपर्यंतही मजल मारली आहे. गाळपाला जाणाऱ्या उसाची संख्या ४० हजार ते ४३ हजारांपर्यंत ठेवण्यात येते.

लागवडीच्या उसाचे उत्पादन चांगले असले की खोडवा, निडवा उसाचेही त्यानुसार चांगले घेता येते असे अमोल सांगतात. त्यांना खोडव्याचे ६५ ते ७८ व निडव्याचे ५० ते ५५ टन उत्पादन मिळते. लागवडीच्या उसाचा उत्पादन खर्च आता एकरी लाख रुपयांवर गेला आहे.

खोडव्याचा खर्च ६० हजार रुपयांपर्यंत येतो. कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी कारखान्याला ऊसपुरवठा होतो. प्रति टन तीन हजार रुपये दर मिळतो.

पुरस्कारांचे मानकरी

अमोल दररोजची शेती सांभाळून दोन किलोमीटरवरील पतसंस्थेत नोकरी करतात. बहुतांशी शेतीकामे कुटुंबातील सदस्य करतात. गरजेनुसार मजुरांची मदतही घेतली जाते.

अमोल कोल्हापूर, सांगली व कर्नाटक भागांतील उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देत असतात. त्यातून आपल्या शेतीत सुधारणा करणे त्यांना शक्य झाले आहे.

शाहू कारखान्याच्या वतीने आयोजित विविध उपक्रमात ते सहभागी होतात. उत्कृष्ट उत्पादनासाठी कारखान्यातर्फे त्यांचा अनेक वेळा गौरव करण्यात आला आहे.

अमोल खोत : ८८०५५९६३६९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com