थेट शेतीमाल विक्रीचा तयार केला ब्रॅण्ड

भात उत्पादक पट्यातील कांबरे बु. (ता. भोर, जि. पुणे) येथील प्रयोगशील महिला शेतकरी सुवर्णा समीर सुकाळे यांनी पीक उत्पादनाच्या बरोबरीने विक्रीचेही चांगले नियोजन केले आहे. ग्राहकांची गरज ओळखून विविध प्रकारच्या परदेशी भाजीपाला, कलिंगडाची लागवड करून थेट विक्रीमध्ये त्यांनी वेगळेपण जपले आहे. शेतीमाल विक्रीसाठी ‘नेचर फ्रेश एक्स्प्रेस’ ब्रॅण्ड तयार केला आहे.
Women Farmer
Women FarmerAgrowon

शेतीतून दर्जेदार उत्पादन मिळत असले तरी विक्री व्यवस्था आपल्या हातात नसेल तर काही वेळा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. असाच काहीसा अनुभव कांबरे बु.(ता. भोर, जि. पुणे) येथील प्रयोगशील महिला शेतकरी सुवर्णा समीर सुकाळे यांना आला होता. त्यामुळे त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल केला. तसेच स्वतःची शेतीमाल विक्री व्यवस्था उभी करण्याचे चांगले नियोजन केले. याचा त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी पती समीर यांच्या साथीने शेतीमाल उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत नियोजन केले आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून सुकाळे यांनी स्वतःच्या शेतीमध्ये पीक लागवडीचे नियोजन केले. शेतीची बांधबंदिस्ती केली. उपलब्ध क्षेत्र आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पीक लागवडीचे नियोजन केले. सध्या त्यांच्या शेतात तीन एकर परदेशी भाजीपाला, सहा एकरांवर कलिंगड लागवड आहे. याशिवाय गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचीही त्या विक्री करतात.

परदेशी भाजीपाल्याची लागवड

सुवर्णा सुकाळे यांच्या कुटुंबाची दहा एकर शेती आहे. यामध्ये दरवर्षी भात लागवडीचे नियोजन असते. भात काढणी केल्यानंतर शेत पडीक राहण्याऐवजी त्यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन परदेशी भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. परदेशी भाजीपाल्यामध्ये आईसबर्ग, झुकिनी, पॅकचॉय, रेड लोलोरोझो लागवडीस प्राधान्य दिले. याचबरोबरीने काही क्षेत्रावर मिरची, टोमॅटो लागवड असते. दरवर्षी भाजीपाला पिकांची आच्छादनावर लागवड केली जाते. यंदाही त्यांनी जानेवारीमध्ये परदेशी भाजीपाल्याची लागवड केली असून, सध्या काढणी अंतिम टप्यात आली आहे. रसायन अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादनावर त्यांचा भर आहे. जास्तीत जास्त सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापरावर त्यांचा भर आहे.

भाजीपाला विक्रीचे नियोजन

सुवर्णाताईंना पहिले दोन ते तीन वर्षे उत्पादित शेतीमालाची विक्री करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यावर त्यांनी मार्ग काढला. लॉकडाउनच्या काळात सर्व बाजारपेठ बंद होत्या, भाजीपाल्याचे नुकसान होत होते. हे टाळण्यासाठी त्यांनी गावातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या भाजीपाल्याचे संकलन करून पुणे, मुंबई, ठाणे शहरांत विक्रीस सुरुवात केली. भाजीपाल्याची काढणी केल्यानंतर तो पुण्यातील शीतगृहात आणला जातो. तेथे भाजीपाल्याची प्रतवारी केली जाते. त्यानंतर हा भाजीपाला पनेट पॅक, प्लॅस्टिक पिशवीमध्ये पॅकिंग करून ग्राहकांना दिला जातो. योग्य पॅकिंगमुळे ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळत असल्याने चांगला प्रतिसाद मिळू लागला.

शेतीमालाच्या विक्रीसाठी पुढाकार घेतल्यानंतर वाहतूक आणि शेतातून भाजीपाला गोळा करण्यासाठी सुवर्णाताईंनी गावकऱ्यांची मदत घेण्याचे ठरविले. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीवरून भाजीपाला गोळा करणे, प्रतवारी, वाहतूक आणि ग्राहकांच्यपर्यंत भाजीपाला पोहोचविण्याचे नियोजन केले जाते. शेतीमालाच्या वाहतुकीसाठी सुवर्णाताईंनी शेतकरी कंपनीच्या माध्यमातून सात रेफर व्हॅन घेतल्या आहेत. आवश्यकतेनुसार सुवर्णाताई स्वतः गाडी घेऊन भाजीपाला ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवितात. मागील तीन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने भाजी विक्री करत असल्यामुळे ग्राहकांपर्यंत भाजीपाला योग्य पद्धतीने पोहोचत आहे. त्यामुळे लॉकडाउन काळात अडचणी असतानाही पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातील सोसायटीधारकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्यात सुवर्णाताई यशस्वी झाल्या. सुरुवातीला चार ते पाच दिवस ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत होता. मात्र, ग्राहकांची असलेली गरज ओळखून हळूहळू पॅकिंगमध्ये भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात आले. यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली. आता हक्काने आमच्या सोसायटीत या असे अनेक सोसायटीधारक आवर्जून सांगतात.

सोसायटीमध्ये थेट विक्री

सुवर्णाताईंनी पुण्यातील काही निवडक सोसायटीमधील सभासदांशी पहिल्यांदा थेट संपर्क करून भाजीपाला विक्रीचे केले. ग्राहकांची भाजीपाल्याची मागणी ऑनलाइन पद्धतीने घेऊन गावातील शेतकऱ्यांना मागणीनुसार भाजीपाला काढणीचे वेळापत्रक दिले. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारचा भाजीपाला उपलब्ध होऊ लागला. नोंदणीमुळे भाजीपाला प्रतवारी, पॅकिंगचे नियोजन झाले. त्यानुसार पुणे शहर तसेच मुंबईतील वरळी, बांद्रा, वर्सोवामध्ये शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीला चालना मिळाली.

‘नेचर फ्रेश एक्स्प्रेस’ ब्रॅण्ड

बाजारपेठेत स्वतःची ओळख तयार करण्यासाठी सुवर्णाताईंनी शेतीमाल विक्रीसाठी २०१८ मध्ये ‘नेचर फ्रेश एक्स्प्रेस’ हा ब्रॅण्ड तयार केला. शेतीमाल साठवणुकीसाठी शीतगृहाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सुवर्णाताई स्वतःच्या शेतीतील भाजीपाला तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून खरेदी केलेल्या शेतीमालाची प्रतवारी आणि पॅकिंग करतात.

भाजीपाला विक्रीबाबत सुवर्णाताई म्हणाल्या, की सुरुवातीला भाजीविक्री करताना काही सोसायटीमधील एक, दोन ग्राहक परिचयाचे होते. नवीन सोसायटीमध्ये ५ ते ६ ओळखीच्या ग्राहकांना भाजी देण्यासाठी आम्ही गेलो. त्या ग्राहकांच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमधील २० ते २५ ग्राहक जोडले गेले. सध्या काही सोसायटीमध्ये सुमारे ३०० ग्राहकांना भाजीपाला विक्री चालू आहे. मुंबईमधील बांद्रा, वर्सोवा, अंधेरी भागातील नऊ सोसायट्या आतापर्यंत जोडल्या गेल्या असून, सुमारे तीन हजार पेक्षा जास्त ग्राहक थेट भाजीपाला घेत आहेत. या ठिकाणी सध्या आठवड्यातून दोन वेळेस भाजीपाला विक्री केली जाते. त्यासाठी योग्य नियोजन केले असून, रोज वेगवेगळ्या सोसायट्यांना रेफर व्हॅनमधून भाजीपाला पाठवला जातो.

सध्या भाजीपाल्याची विक्री प्रति किलो ६० ते ८० रुपये, कलिंगडाची प्रति किलो १० ते १२ रुपये दराने विक्री होत आहे. पुणे, मुंबई शहरांतील ग्राहकांची भाजीपाल्याला चांगली मागणी असल्याने मोठी उलाढाल होते. दर महिन्याला १२ लाख रुपयांच्या शेतीमालाची विक्री होते. यासाठी उत्पादन खर्च, काढणी, पॅकिंग साहित्य, वीज, वाहतूक, मजुरी असा खर्च वजा जाता सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. याशिवाय धान्य महोत्सव, तांदूळ महोत्सव अशा विविध ठिकाणी थेट ग्राहकांना शेतीमालाची विक्री केली जाते.

शेतकरी कंपनीची स्थापना

शहरी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन शेतीमालाचा वेळेवर पुरवठा होण्यासाठी सुवर्णा सुकाळे आणि परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत गावामध्ये २०१७ मध्ये समृद्ध सबल शेतकरी प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. यामध्ये २९० शेतकरी सभासद आहेत. या कंपनीतील सर्व सभासद भाजीपाला, भात, इतर धान्य पिकांचे उत्पादन घेत आहेत. सध्या सुवर्णाताईंकडे कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.

संपर्क ः सुवर्णा सुकाळे, ९२२३२७७३६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com