यंत्राद्वारे ऊसपाचटाच्या गाठीनिर्मितीचा व्यवसाय

शेतकऱ्यांकडून विशेषतः फळबाग उत्पादकांकडून गाठी स्वरूपातील (बेल) ऊसपाचटाचा वापर वाढला आहे. ही संधी व मागणी ओळखून नाशिक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी अशा गाठी तयार करणाऱ्या यंत्रांची सेवा देताना उत्पन्नाचे नवे साधन तयार केले आहे. निफाड तालुका परिसरात सुमारे २० यंत्रे कार्यरत असून, गाठीनिर्मिती व्यवसाय त्याद्वारे नावारूपास आला आहे.
यंत्राद्वारे ऊसपाचटाच्या गाठीनिर्मितीचा व्यवसाय
Agriculture TechnologyAgrowon

अलीकडील वर्षांत अधिकाधिक शेतकऱ्यांना उसाच्या पाचटाचे महत्त्व पटल्याने उसासह फळबागा व अन्य पिकांत त्याचा वापर वाढला आहे. बदलत्या काळानुसार पाचटाचे मूल्यवर्धन होत गाठींमध्ये (बेल्स) त्याचे रूपांतर झाले. त्याचाही वापर होऊ लागला. यंत्रांच्या माध्यमातून पंजाबसारख्या राज्यांमध्ये गाठीनिर्मितीची माहिती निफाड तालुक्यातील (जि. नाशिक) गोदाकाठच्या काही शेतकऱ्यांना मिळाली. चांगली मागणी असल्याने पाहून यंत्राद्वारे गाठींचे उत्पादन व पुरवठा सेवा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. सन २०१५ पासून ऊस गळीत हंगामाच्या काळात (नोव्हेंबर ते एप्रिल) उत्पन्न देणारा हा व्यवसाय चांदोरी, शिंगवे, करंजगाव, मांजरगाव, सोनगाव, चापडगाव, नांदूर मधमेश्‍वर व कोठूरे आदी गावांमध्ये व्यक्तिगत व भागीदारी पद्धतीने सुरू आहे.

यंत्राच्या फिरणाऱ्या पीकअप गार्डद्वारे सरीतील पाचट संकलित होते.
यंत्राच्या फिरणाऱ्या पीकअप गार्डद्वारे सरीतील पाचट संकलित होते.Agrowon

यांत्रिक पद्धतीने गाठीनिर्मिती

पाचटाच्या गाठी करणारे यंत्र ‘कॉम्पॅक्ट’ पद्धतीचे असून, ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरच्या ‘पीटीओ शाफ्ट’ला जोडले जाते. यंत्राच्या पुढील भागात ‘पिकअप गार्ड’च्या साह्याने सरीमधील पाचट आत खेचले जाते. त्यामध्ये फिरणाऱ्या पात्यांच्या माध्यमातून संकलित होऊन पाचट यंत्राच्या आतील भागात येते. धारदार पात्यांमुळे एकसारखे बारीक तुकडे होतात. चौकोनी साच्यात पाचट एकसारखे पडून ते दाबले जाते. रुंदी एकसारखी असते. गाठीची लांबी गरजेनुसार वाढवता येते. तयार झालेल्या गाठींची स्वयंचलित पद्धतीने नॉटरच्या माध्यमातून पॉली प्रॉपिलीन दोरी वापरून गाठ बांधली जाते. त्यामुळे हाताळणी व वाहतुकीस सुलभता येते. अर्थात, गाठीनिर्मितीची पहिली पायरी ही अन्य एका यंत्राच्या मदतीने सुरू होते. उसतोडणी झाल्यानंतर विखुरलेले पाचट या यंत्राच्या मदतीने सरीवर एका रांगेत जमा करण्यात येते. मग ‘स्केअर बेलर’ यंत्राद्वारे पुढील प्रक्रिया पार पडते. दोन्ही यंत्रांची मिळून किंमत १५ लाख रुपयांपर्यंत आहे.

यंत्राद्वारे अशा गाठी तयार होतात.
यंत्राद्वारे अशा गाठी तयार होतात. Agrowon

यंत्राची वैशिष्ट्ये :

-‘हेवी ड्यूटी’ कास्टिंग गियर बॉक्स
--दीड मीटर रुंदीपर्यंत पाचट संकलित करण्यासाठी विस्तीर्ण ‘पीकअप’
- यंत्राची वाहतूक सोपी होण्यासाठी सुलभ चाके
-शेतात खड्डे असल्यास यंत्र संतुलित चालण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक फ्लायव्हील’ समाविष्ट
-उत्पादित गठ्ठे मोजण्यासाठी ‘बेलर काउंटर’ यंत्रणा

गाठींविषयी

-गाठीचे सरासरी वजन- १२ ते १५ किलो
-वापरयोग्य आकार- अडीच बाय दोन फूट.
-गाठींची हाताळणी, वाहतूक आणि साठवणूक सुलभ
-गरजेनुसार वापरानंतर उर्वरित गाठी साठवून ठेवणे शक्य.
-प्रतिगाठ उत्पादन खर्च- १५ ते १८ रुपये.

मागणी

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब बागा आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात बोदावरील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी, बाष्पीभवन रोखण्यासाठी उसाचे पाचट उपयुक्त ठरते. पावसाळ्यात ते सेंद्रिय खत म्हणून उपयोगात येते. दिंडोरी,चांदवड, देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव, सिन्नर व नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्यास चांगली मागणी आहे. दुष्काळी परिस्थिती असताना ५० ते ५५ रुपयांपर्यत प्रति गाठीचा दर पोचला होता. अलीकडील वर्षांत व्यावसायिक व यंत्रे वाढली. आता ३० ते ३५ रुपये असा दर आहे. काही उद्योगांकडून बॉयलरसाठी इंधन म्हणून त्यास मागणी आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. उत्कृष्ट बायोमास स्रोत म्हणून हे उत्पादन पुढे येत आहेच. शिवाय काही पशुपालक चारा म्हणूनही त्याचा वापर करतात.

यंत्राद्वारे अशा गाठी तयार होतात.
यंत्राद्वारे अशा गाठी तयार होतात. Agrowon

...असा आहे व्यवसाय

दरवर्षी नोव्हेंबरच्या सुमारास ऊसतोडणी कामगारांचे डेरे दाखल होताच गाठीनिर्मितीला वेग येतो. ऊसतोडणी सुरू असेपर्यंत व्यवसाय सुरू असतो. ऊस तोडणी झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाचटाची मागणी नोंदविण्यात येते. त्यांच्या शेतात ट्रॅक्टर व यंत्र संच नेऊन तेथे गाठी तयार करून दिल्या जातात. त्यांना प्रति गाठीमागे ४ ते ५ रुपये परतावाही देण्यात येतो. वाहतुकीच्या अंतरावर दर ठरतात. एका दिवसात सुमारे दोन हजार गाठी तयार करण्याची यंत्राची क्षमता आहे. मात्र मागणीनुसार उत्पादन घेण्यात येते. दिवसाला १० ते १२ मजुरांची गरज भासते.

गाठींची सुलभ वाहतूक.
गाठींची सुलभ वाहतूक.Agrowon

अनुभवाचे बोल

पंजाबमध्ये प्रामुख्याने भाताचे तणस व गव्हाचे काड जाळण्यास तेथील राज्य सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे तेथील शेतकरी टाकाऊ घटकांचे संकलन करून गाठी तयार करतात. त्यांचा पुरवठा ऊर्जानिर्मिती केंद्रांना होतो. पंजाबमधील काही शेतकऱ्यांची ओळख असल्याने नाशिक भागातील शेतकऱ्यांनी तेथे जाऊन यंत्रांची उपयुक्तता तपासली. यंत्रांची खरेदी करून व्यवसाय सुरू केला. उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये या यंत्रासाठी अनुदान आहे. महाराष्ट्रात असे अनुदान मिळाल्यास यंत्रांची संख्या व व्यवसाय वाढेल. पाचट जाळल्याने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबेल.
योगेश जाधव, ऊस पाचट गाठी उत्पादक, करंजगाव, ता. निफाड
८६६८९६०१६१


सन २००० पासून पाचट पुरवठादार म्हणून काम करताना ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाहतूक करायचो. मात्र वाहतुकीत अडचणी, काही प्रसंगी आग लागणे असे प्रकार घडायचे. आता सहा वर्षांपासून दोन यंत्रांद्वारे व्यवसाय करीत आहे. त्यामुळे कार्यक्षमताही वाढली आहे.
-संजय मोगल, ऊसपाचट गाठी उत्पादक, शिंगवे, ता. निफाड९५८८६३०५९६, ९७६३९९२९४१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com