विना मजूर दुग्ध व्यवसाय दांपत्याने केला यशस्वी

कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील संदीप व पूनम या पाटील दांपत्याची थोडीही शेती नाही. मात्र मजुरांविना बावीस जनावरांचा सांभाळ परिश्रमपूर्वक करीत दुग्ध व्यवसायातून हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले आहे. कामांच्या व्यापातूनही सौंदर्य स्पर्धांमधून सहभाग व नृत्यकला हे छंद जोपासून पूनम यांनी व्यक्तिमत्त्व विकास करण्यासह आयुष्य कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
Dairy
Dairy Agrowon

लक्ष्मी, त्रिवेणी, बच्चन, सिंघम डी. जे. तुम्ही म्हणाल ही कसली नावं आहेत? तर ती आहेत गोठ्यातील जनावरांची. नावानं हाक मारली की ते जनावर आज्ञाधारकपणे समोर येऊन उभे राहते. कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील संदीप व पूनम पाटील यांचा सुमारे २२ जनावरांचा हा गोठा आहे. त्यात पंधरा गायी, चार म्हशी व उर्वरित लहान जनावरे आहेत. सर्व जनावरांना कुटुंबाचा लळा लागला असून, कुटुंबाचा ती भागच बनली आहेत.

एका म्हशीपासून प्रारंभ

मूळच्या बेळगाव जिल्ह्यातील पूनम (वय ३२) यांचं शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. लग्नानंतर शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे सासरी त्या आल्या. तेथे बेकरी व्यवसाय होता; परंतु तो काही कारणाने बंद केला. पती संदीप रोजगाराच्या शोधात होते. दुग्ध व्यवसाय करण्याचे निश्‍चित केले. पुरेसे भांडवल नसल्याने दागिने गहाण ठेवून ८० हजार रुपयांची म्हैस घेतली. ती घेतली खरी. पण ना धार काढणे जमत होते ना वैरणीचे व्यवस्थापन. चारा घालायला गेले तर म्हैस अंगावर धावून यायची. अखेर मजूर तैनात केला. दरम्यान, संदीप यांनी धार काढायचे शिकून घेतले. पण एवढ्यावर भागत नव्हते. व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. मावशीकडे जनावरे असल्याने मार्गदर्शन घेऊन गोठा व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध धडे घेतले. मग आत्मविश्‍वास आला. पुन्हा दागिने गहाण ठेवून तीन लाख रुपये खर्चून सात म्हशी आणल्या. घराजवळच दहा गुंठे क्षेत्रावर म्हैसपालनास सुरुवात झाली.

व्यवसाय विस्ताराचे प्रयत्न

टप्प्याटप्प्याने व्यवसायात वाढ करणे व त्यात स्थिरता आणणे सुरू होते. दरम्यान, कोरोनाच्या लाटेत संदीप यांना कोरोना झाला. या धावपळीत दोन म्हशींचे दूध आटले. रांगोळी येथील डॉ. उदय मगदूम यांनी एचएफ या संकरित गायींचे पालन अधिक फायदेशीर ठरेल असा सल्ला दिला. त्यानुसार पूनम यांनी बचत गटातून कर्ज काढले. सांगोला येथून पाच एचएफ गायी आणल्या. आधी बंदिस्त स्वरूपाचा गोठा होता. आता मुक्त संचार पद्धतीने व्यवस्थापन सुरू केले. जे क्षेत्र चाऱ्यासाठी राखीव होते तेथे गायी मुक्त विहार करू लागल्या. एका शेतकऱ्याकडून वार्षिक ६० हजार रुपये कराराने एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली.

विनामजूर कामावरची कसरत

हळूहळू गायींची संख्या वाढत गेली. कष्टही वाढत गेले. दिवसाचा वेळ पुरेनासा झाला. पाटील दांपत्याचा दिवस पहाटे चारला सुरू होतो. एकही मजूर कामास ठेवलेला नाही. गोठा स्वच्छता, धारा काढणे, पाणी- वैरण, खाद्य देणे, खासगी कंपनीच्या संकलन केंद्राला दूध नेऊन देणे अशी विविध कामे पती-पत्नीच करतात. दिवसाचा मधला काही वेळ वगळता दुपारी पुन्हा चार ते सात वाजेपर्यंत पुन्हा कामांची व्यस्तता असते. दररोज १३० ते १५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. महिन्याला सुमारे ४० ते ५० टक्के नफा होतो. कोणताही मजूर तैनात नसल्याने त्या खर्चात मोठी बचत झाली आहे.

व्यवसायाव्यतिरिक्त घरचा स्वयंपाक, शिवाय दोन मुलांचा सांभाळ, त्यांना शाळेत सोडणे आदी कामांतही पूनम व्यस्त असतात. वैरण आणणे तसेच तीन किलोमीटरवरील संकलन केंद्रात दररोज दूध पुरवठा करणे यासाठी याच व्यवसायातील उत्पन्नातून टेम्पो घेतला आहे. वेळ पडली तर काम अडू नये यासाठी पूनमदेखील टेम्पो चालविण्यात कुशल झाल्या आहेत.

आयुष्य केले आनंदी

एकीकडे गोठ्यात काम करताना, शेणात हात घालताना पूनम यांनी कधी लाज बाळगली नाही. दुसरीकडे विविध सौंदर्य स्पर्धा वा रॅम्पवॉकमध्ये भाग घेण्याचीही त्यांना आवड आहे. नृत्यकलेची आवड आहे. मुख्य व्यवसायातून आवर्जून वेळ काढून आपला हा छंद त्यांनी आवर्जून जोपासला आहे. त्यातून व्यक्तिमत्त्व विकास साधला आहे. जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. जे आयुष्य मिळाले आहे त्यातील काही क्षण आपल्यासाठी जगता आले पाहिजेत अशी त्यांची धारणा आहे. अर्थात, त्यासाठी पतीची समर्थ साथ व पाठिंबा लाभल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. छंद जोपासलेल्या क्षेत्राला वेळ देत असताना अनेक मैत्रिणींनी गोठा व्यवसाय बंद करण्यास सांगितले. पण त्याच व्यवसायामुळे आपण कायम ताजेतवाने, उत्साहवर्धक राहत असल्याचे सांगत पूनम यांनी त्यात टिकून राहण्याचे ठरवले. गाई-म्हशींच्या सान्निध्यात दिवस कसा जातो हे आम्हाला कळत नाही. येत्या काळात त्यांची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. स्वतः राबल्यास गोठा व्यवसाय फायदेशीर ठरतो असा अनुभव असल्याचे पूनम यांनी सांगितले.

संपर्क ः पूनम पाटील, ९९२२८१२२४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com