Vegetable Farming : दूर झाला बेरोजगारीचा अंधार कर्तृत्वाचे उजळवले दीप

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लुपिन फाउंडेशन संस्थेने विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. तरुण व महिलांना शेती, पूरक व्यवसाय, अन्य उद्योगांमध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले.
Skill Development
Skill DevelopmentAgrowo

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लुपिन फाउंडेशन संस्थेने (Lupin Foundation) विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. तरुण व महिलांना शेती, पूरक व्यवसाय, अन्य उद्योगांमध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले. त्यातून उपलब्ध साधनसंपत्तीवर आधारित रोजगारनिर्मिती (Employment Generation) साधली. कुटुंबातील बेरोजगारीचा अंधार नष्ट करून आर्थिक उन्नतीचा दीप उजळविण्याचे काम संस्थेने केले आहे.

सुमारे आठ ते नऊ राज्यांमध्ये सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून लुपिन फाउंडेशन कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात या संस्थेचे काम ऑगस्ट २००० मध्ये सुरू झाले. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाची भौगोलिक स्थिती, तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती, बाजारपेठेतील मागणी, जिल्ह्यातील बेरोजगारीचे प्रमाण, कुशल- अकुशल कामगारांची स्थिती आदी सर्वांचा विचार संस्थेने केलाय त्यानुसार पर्यावरणपूरक रोजगार निर्मितीचे मॉडेल तयार करण्यात आले. यामध्ये महिला सक्षमीकरण, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कौशल्यविकास, बायोगॅस प्रकल्प, आरोग्य, शिक्षण यासह विविध कृषी संशोधन घटकांचा समावेश करण्यात आला.

Skill Development
Crop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका

महिला सक्षमीकरणावर भर

महिलांच्या हाताला काम मिळाले, तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. त्यांच्यात बचतीची सवयही उपजतच असते. त्यातून कुटुंबाचे उत्पन्न वाढू शकते. प्रगती साधता येते. ही बाब लक्षात घेऊन

लुपीन संस्थेने सिंधुदुर्गात महिला सक्षमीकरणावर काम सुरू केले. त्यामध्ये शिवणकाम, परसबागेतील कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, फॅशन डिझायनिंग, केटरिंग आदी विविध संकल्पना पुढे आल्या. संस्थेने इच्छुक महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला. त्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. उत्तम प्रशिक्षकांकडून महिलांसाठी शिवणकामाचे प्रशिक्षण मिळालेच. शिवाय त्यांना शिलाई यंत्रही उपलब्ध करून देण्यात आले. त्यातून महिलांना स्थानिक रोजगार उपलब्ध झालाच. परंतु अन्य महिलांना गावातच तयार कपडे मिळू लागले.

परसबागेतील कुक्कुटपालन

परसबागेतील कुक्कुटपालन करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमातून शेकडो महिलांना प्रशिक्षण मिळाले. सुरुवातीच्या काळात पिले, आवश्यक साहित्य पुरविण्याचे काम झाले. हजारो महिलांचे हात या महत्त्वाच्या पूरक व्यवसायात गुंतले. व्यवसाय वरकरणी लहान वाटत असला, तरी त्यातून अर्थकारण मोठे होण्यास मदत झालीय सोबत काजू बी प्रकिया प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. काही तरुणांना हे प्रशिक्षण देण्यात येत होते. परंतु महिलांना देखील त्यात कुशल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लहान युनिट उभारून ते यशस्वी करा, त्यानंतर उद्योगात टप्प्याटप्प्याने वाढ करीत जा असा मंत्रच संस्थेने नव-उद्योजकांना दिला. त्यातून अनेक युनिट्स उभी राहिली. त्यातून यशस्वी उद्योजक नावारूपाला आले.

हळद शेतीला प्रोत्साहन

कोकणातील वातावरण हळद शेतीला पोषक आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि महिला बचत गटांनी भात, नाचणीप्रमाणे हळद लागवड करावी यासाठी लुपिनने ठोस पावले उचलली. प्रोत्साहन म्हणून

शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दिले. आतापर्यंत ५० टन बियाणे

शेतकऱ्यांना वितरित केले आहे. जिल्ह्यात सध्या हळद शेतीचे ‘कल्चर’ विकसित होण्यात लुपिनचा महत्त्वाचा सहभाग आहे.

सेंद्रिय- नैसर्गिक भाजीपाला उत्पादनासाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. उत्पादित मालाची थेट विक्री करणाऱ्या महिलांना व मासळी विक्री करणाऱ्या महिलांना विक्रीच्या ठिकाणी

छप्परवजा छत्र्या देण्यात आल्या. मासळी विक्रीसाठी शीतपेट्याही वितरित केल्या. संस्थेने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर भर दिला आहे. सुतार समाजातील ३२४ सभासदांची उत्पादक कंपनी त्यातून स्थापन झाली आहे.

एकाच छताखाली सर्व उत्पादने

कोकणात रानभाज्या, आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, जांभूळ, करवंद अशी समृद्धी पाहण्यास मिळते. यातील बहुतांशी फळांवर प्रकिया करून विविध उत्पादने तयार केली जातात. ही सर्व उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी ‘वन स्टॉप सिंधुदुर्ग’ संकल्पना सुरू करण्यात आली. अर्थात, कोरोनामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीत काही अडचणींशी सामना करावा लागला.

बायोगॅस प्रकल्पांची उभारणी (इन्फो १)

पर्यावरण समतोल राखण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. जंगलतोड थांबविण्यासाठी बायोगॅस प्रकल्पाचा सक्षम पर्याय संस्थेने इथल्या ग्रामस्थांना दिला. युनिट उभारणीचे प्रशिक्षण अनेक गवंडी काम करणाऱ्या तरुणांना दिले. दुग्ध व्यवसायात असलेल्या प्रत्येक कुटुंबाला त्यासाठी आग्रह केला. त्यातून अनेक युनिट्स उभी राहिली. या विषयातील संस्थेचे काम विशेष म्हणावे लागेल.

कृषी पर्यटनाला उत्तेजन

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. परंतु त्याला व्यापक व व्यावसायिक स्वरूप येणे गरजेचे होते.

पर्यटन हे समुद्र, मंदिरे, ऐतिहासिक गड- किल्ल्यांपुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती वाढली पाहिजे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन अर्थप्राप्ती झाली पाहिजे अशी धारणा लुपिनची होती. त्यातून ग्रामीण कृषी पर्यटन संकल्पना सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथे राबविण्यात आली. त्यासाठी संस्थेला ‘सकाळ माध्यम समूहा’ने सहकार्य केले. काही वर्षातच चौकुळ गाव जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर झळकू लागले. या व्यवसायातून गावातील अनेकांना स्थानिक रोजगार मिळाला.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुढाकार

जिल्ह्यातील ग्रामीण भागात नेत्रपीडाग्रस्तांपैकी अनेकांना मोतीबिंदूची समस्या होती. मात्र आर्थिक तजवीज होत नसल्यामुळे शस्त्रक्रिया होत नव्हती. संस्थेतील सदस्यांनी या कामात झोकून देऊन काम केले. रुग्णांना डेरवण येथील दवाखान्यात दाखल करून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आतापर्यंत ८०० ते ९०० रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे. आजही हे काम अखंड सुरू आहे.

वनस्पतींचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प (इन्फो २)

कोकणातील गावांची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध वनस्पतींच्या वा पिकांच्या उत्पादनाला मोठी संधी आहे. त्यांना बाजारपेठेत चांगली मागणी तयार होऊ शकते. अशा काही झाडांची

‘क्लस्टर्स’ त्या त्या गावांमध्ये तयार केली तर त्याचा मोठा फायदा होईल असा संस्थेचा हेतू होता.

त्यातून चार वर्षांपासून सुरंगी, जांभुळ, वटसोल, कडीकोकम, वावडिंग, पपई आणि त्रिफळ आदी

वनस्पतींवर काम सुरू आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे वेंगुर्ले फळसंशोधन केंद्र आणि संस्था यांच्यात त्याविषयी करार झाला. या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांतर्गत सुरंगी, कडीकोकम, जांभळाची कलमे करण्यात यश आले आहे. त्यांची लागवडही करण्यात आली आहे.

उर्वरित वनस्पतींच्या अनुषंगाने कलम बांधणीचे संशोधनात्मक काम सुरू आहे.

गोमय गणपतीसाठी प्रयत्न-

सिंधुदुर्गात सुमारे ६८ हजार गणेशमूर्तींची गणेशोत्सवात प्रतिष्ठापना होते. हे महत्त्व लक्षात घेऊन

पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने या मूर्ती गोमय स्वरूपात (शेण आणि मातीच्या आधारे) घडवण्यासाठी

संस्थेने पुढाकार घेतला. त्यासाठी कारागिरांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून जिल्ह्याचे अर्थकारण वाढण्यासही मोठी मदत होणार आहे.

‘लुपिन’तर्फे प्रशिक्षण, कार्य, उभारलेले उद्योग- दृष्टिक्षेपात (सिंधुदुर्ग जिल्हा) (इन्फो ३)

-बायोगॅस बांधणी-१६६२ व त्यासंबंधी प्रशिक्षणे-२०७

-जुन्या बायोगॅस दुरुस्ती-१२८

-संस्थेने कार्य केलेल्या गावांची संख्या-३७७

-सेंद्रिय भाजीपाला आणि शेतीविषयक लाभ- ९१२२

-दुग्ध व्यावसायिक संख्या- ७१४

-कुक्कुटपालक व्यावसायिक- ७६६

-प्रयोगशाळा साहित्य पुरविलेल्या शाळा-१००

-कौशल्य विकास प्रशिक्षण- ६४३६

-आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेले रुग्ण- २४१२

-शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सभासद-१४३६

-महिला बचत गट-८१६

-वैयक्तिक लाभार्थी फळ प्रकिया-३४६४

-शेळीपालन लाभार्थी-४६

संपर्क ः योगेश प्रभू, ९१६८३८६६६५

प्रकल्प अधिकारी, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com