Watermelon Farming : कोकणी शेतकऱ्यांचे अर्थकारण कलिंगडातून झाले मधुर
Watermelon Crop Update : कोकणातील शेतकऱ्यांनी कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून कलिंगडाकडे लक्ष वळविले आहे. पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातून येणारे कलिंगड आता कोकणातच उत्पादित होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ते उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे साडेतीनशे हेक्टरवर त्याची लागवड असावी असा अंदाज आहे. कृषी विभागाचे तंत्र अधिकारी विनोद हेगडे यांचे शेतकऱ्यांना सहकार्य होते.
गावी परतून शेतीत करिअर
खेरवसे (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील युवक जीवन दिनकर माळी यांनी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुणे येथील प्रसिद्ध कंपनीत काही काळ तर दुसऱ्या कंपनीत दोन वर्षे कंत्राटी पद्धतीने नोकरी केली.
मात्र कमी पगारामुळे विचारांती शेतीतच प्रगती करायचे ठरवले. सन २०१४ मध्ये ते गावी परतले. स्वतःच्या चार एकरांसह परिसरातील बारा एकर जमीन भाडेतत्त्वावर घेत फुलशेती, भाजीपाला घेण्यास सुरुवात केली.
सणांनुसार लागवडीचे नियोजन
सन २०१८ पासून जीवन कलिंगड शेती करताहेत. ते सांगतात की कोकणातील माती व हवामानात ६५ ते ७० दिवसांत कलिंगड येते. कमी कालावधीत ते चांगला पैसा मिळवून देते. मी तीन टप्प्यांत लागवड करतो. पहिली डिसेंबरमध्ये होते.
कोकणात मार्चमध्ये शिमगोत्सव असतो. त्या काळात कलिंगडाला असलेली मागणी पाहून दुसरी लागवड जानेवारीत होते. तिसरी लागवड रमजान सणाला केंद्रित करून होते. एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. यंदा पावणेदोन एकरांत २२ टन उत्पादन मिळाले. किलोला अकरा ते साडेअकरा रुपये दर मिळाला.
बांधावरच बाजारपेठ
जीवन सांगतात, की आमच्या भागात पट्टेरी कलिंगडाला अधिक मागणी असते. रत्नागिरी, संगमेश्वर, सापुचेतळे, राजापूर येथील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. खेरवसेपासून लांजा बाजारपेठ दोन किलोमीटरवर आहे. तोही फायदा होतो. किलोला १२ ते १३ रुपये दर मिळतो.
एकरी खर्च ४० हजार ते ५० हजार रुपये येतो. एकरी किमान ६० हजार ते ८० हजारांपर्यंतचे उत्पन्न ७० ते ८० दिवसांत हाती पडते.
कलिंगड शेती
-लागवड गादीवाफ्यावर (बेड). दरवर्षी प्रत्येकी चार ट्रॉली शेणखत, कोंबडी खत यांचा वापर. त्यामुळे फळाचा दर्जा आणि चव चांगली राहण्यास मदत.
-दोन महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर वेलीचा पाणीपुरवठा कमी केला जातो. जेणेकरून फळाची चव, गोडवा यात वाढ होते.
-पट्टेरी कलिंगडाचे वजन ६ ते ८ किलोपर्यंत भरते. रत्नागिरी जिल्ह्यात फोडी कापून विक्री करण्याची पद्धत आहे. त्यामुळे अशा वजनदार फळांची त्यांच्याकडून मागणी असते.
-रानडुकरांचा मोठा त्रास होतो. सुरुवातीला दिवस-रात्र गस्त सुरू केली. ‘स्पीकर’वर प्राण्यांचे आवाज लावून वन्यप्राण्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण महिनाभरानंतर आवाजाची भीती निघून जाते. अखेर चार एकर जागेला सहा फूट उंचीचे शेडनेट लावण्याचे ठरविले आहे. त्यासाठी २५ हजार रुपये खर्च केला आहे.
जीवन माळी, ८९८३७२९०७३
गटाद्वारे कलिंगड शेती
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील प्रकाश रांजणे आणि सहकाऱ्यांनी श्री गणेश गटाची २०१५ मध्ये स्थापना केली. केळी लागवडीला प्राधान्य दिले. परंतु हे दीर्घ कालावधीचे पीक होते.
सुमारे ७० दिवसांत येऊ शकणारे पीक म्हणून गटाने कलिंगडाची निवड केली. गटाच्या सामूहिक सात एकर क्षेत्रापैकी तीन एकरांत कलिंगड असून, उर्वरित क्षेत्रात केळी व भाजीपाला पिके आहेत.
थेट विक्रीवर भर
गटाचे सचीव असलेले रांजणे सांगतात की काळ्या पाठीच्या कलिंगडाला प्राधान्य देतो. एकरी सुमारे १२ ते पंधरा टनांपर्यंत उत्पादन घेतो. मुंबई-गोवा महामार्गावर धामणी पेट्रोल पंपाजवळ गटाचा स्टॉल आहे.
पर्यटक, प्रवासी थांबून कलिंगड विकत घेतात. दिवसाला ४०० किलोपर्यंत विक्री होते. दरवर्षी बाजारपेठेतील दरांनुसार थेट विक्री करतो. डिसेंबर ते मे पर्यंत तीन ते चार टप्प्यांत लागवड असल्याने उन्हाळाभर विक्रीस कलिंगड उपलब्ध होते. खर्च वगळून सलग सात वर्षे गटातील सदस्यांना उत्पन्नाचा आधार मिळतो आहे. हाताला काम सुरू राहते. मुख्य म्हणजे कोकणात गटशेती यशस्वी होऊ शकते हे या उदाहरणाने सिद्ध केले आहे.
प्रकाश रांजणे, ९८६०३७७४१४
संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील कृषिरत्न पुरुष बचत गटही कलिंगडाची शेती करतो आहे. त्यातून पाच वर्षांत दीड पट ते दुप्पट उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भात कापणीनंतर सप्टेंबरमध्ये लागवडीची लगबग सुरू होते.
गटाचे सचिव संतोष भडवळकर सांगतात, की आमचे गाव मुंबई-गोवा महामार्गापासून काही अंतरावर असल्यामुळे विक्री सहजपणे होते. सलग दोन वर्षे या पिकातून तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. ४० ते ५० टक्के फायदा मिळत आहे.
संपर्क - संतोष भडवळकर, ९६५७९६६४५२, ८३०८६८३७४५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.