Agriculture Experiment : शिक्षक दांपत्याने जपली शेतीमध्ये प्रयोगशीलता

पेशाने शिक्षक असलेल्या विनायक देवराव लोणकर यांनी शेतीमध्ये प्रयोगशीलता जपली आहे. कुटुंबाच्या साथीने त्यांनी खारपाणपट्यातील रामागड (ता. दर्यापूर, जि. अमरावती) या गावशिवारात वडिलोपार्जित शेती फुलविली आहे. सोयाबीन,तूर, हरभरा या पारंपरिक पिकांमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचबरोबरीने त्यांनी वनौषधी लागवडीवर देखील भर दिला आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

मिसाळवाडी (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विनायक देवराव लोणकर (Vinayak Lonkar) हे शिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण बीए. डीएडपर्यंत झाले आहे. १९९२ मध्ये लोणकर शिक्षक म्हणून नोकरीमध्ये रुजू झाले. त्यांच्या पत्नी नानी या आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, चिखली या शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहेत.

दोघेही उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावर असतानाही त्यांनी गावाकडील शेतीशी (Agriculture) मात्र आपली नाळ तुटू दिली नाही. लोणकर यांचा मुलगा पवन याचे बीई (मॅकेनिकल डिझायनिंग) पर्यंत शिक्षण झाले आहे. दुसरा मुलगा रोहन हा रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच या कुटुंबाने शेतीमध्येही विविधता जपण्याचा प्रयत्न केला आहे.

Indian Agriculture
Agriculture Electricity : अमरावती जिल्ह्यात २०३२ कृषिपंप जोडण्या प्रलंबित

खारपाणपट्यातील रामागड (ता. दर्यापूर, जि. अमरावती) या गावशिवारात लोणकर दांपत्याने वडिलोपार्जित शेती चांगल्या प्रकारे फुलविली आहे. चिखलीपासून रामागड हे शंभर किलोमीटरवर आहे. गरजेनुसार शनिवार- रविवार लोणकर दांपत्य गावाकडील शेतीमध्ये जातात. दैनंदिन शेती व्यवस्थापनात लोणकर यांना पुतण्या अरविंद याची चांगली साथ मिळाली आहे.

त्याच्याबरोबरीने चर्चा करूनच पुढील पंधरा दिवसांचे शेती काम आणि मजुरांचे नियोजन केले जाते. लोणकर यांच्या पत्नी सौ. नानी यांच्या माहेरी शेती असल्याने त्यांना देखील शेतीची आवड आहे. तसेच पीक व्यवस्थापनाची चांगली माहिती आहे. हंगामी पीक व्यवस्थापनात परिसरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने दरवर्षी सुधारणा करण्याचा लोणकर दांपत्याचा प्रयत्न असतो.

Indian Agriculture
Agriculture Award : डॉ. बेग यांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार

पाणी व्यवस्थापनावर भर

शेती नियोजनाबाबत माहिती देताना लोणकर म्हणाले, की आमचे रामागड हे गाव पूर्णा नदीचा खोऱ्यात आहे. या भागात पाण्याची मुबलकता असली तरी हे पाणी खारे असल्याने सिंचनासाठी अडचणी आहेत. माझी या गाव शिवारात वडिलोपार्जित २५ एकर शेती आहे. पुतण्या अरविंद याच्या साथीने खरिपात सोयाबीन, तूर आणि रब्बी हंगामात हरभरा या पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे.

या पिकांच्या सुधारित जातींची लागवड करतो. पीक व्यवस्थापनात प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेऊन नियोजन करतो, त्यामुळे पीक उत्पादन वाढीत मला सातत्य आहे. खारपाणपट्ट्यात हरभरा चांगल्या प्रतीचा येतो. या पिकाला एक पाणी मिळाले तर उत्पादन वाढ मिळते असा माझा अनुभव आहे. आमची दरवर्षी दहा एकरावर हरभरा लागवड असते. मला हरभऱ्याचे एकरी ९ ते १० क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. सोयाबीन, तूर या पिकांचे देखील उत्पादन वाढीच्या टप्यात आहे.

शेततळ्यातून शाश्वत सिंचनाची सोय

काही वर्षांपूर्वी या भागात कृषी विभागाने शेततळ्याची योजना आणली होती. परंतु त्यामध्ये शेती क्षेत्र जात असल्याने या योजनेला कमी प्रतिसाद होता. मात्र विनायक लोणकर यांनी पुढाकार घेत २००८ साली गावात पहिले शेततळे घेण्याचा निर्णय घेतला. लोणकर यांनी २५ एकर शेतीमध्ये २० मिटर बाय २० मिटर आणि १० फूट खोल आकाराचे एक आणि ३० मिटर बाय ३० मिटर आणि १० फूट खोल आकाराची दोन शेततळी घेतली आहे.

त्यामुळे शाश्वत सिंचनाची सोय झाली आहे. पाणी उपसा करण्याकरिता कृषी विभागाकडून ५० टक्‍के अनुदानावर पेट्रोल पंप देखील त्यांना मिळाला आहे. शेतीपासून काही अंतरावरील तलावातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतापर्यंत त्यांनी पाणी आणले आहे. खारपाणपट्ट्यातील शेतांमध्ये पाट पाणी दिल्यास जमिनीवर क्षार वाढतात त्याचा पीक वाढीवर परिणाम होतो.हे लक्षात घेऊन लोणकर हे पिकाला पाणी देण्यासाठी रेनपाईपचा वापर करतात. त्यामुळे पिकाच्या गरजे इतकेच पाणी देता येते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.

वनौषधींचा प्रसार

दर पंधरा दिवसांनी विनायक लोणकर हे पत्नी नानी आणि मुलगा पवन सोबत शेतात येतात. शेतामध्ये त्यांनी राहण्यासाठी घर बांधले आहे. याचबरोबरीने घराच्या जवळपास त्यांनी विविध वनौषधीची लागवडीस सुरवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने बेल, तुळस, आवळा, कडीपत्ता लागवड आहे. बांधावर नारळ, चिंच,बोर यासारख्या फळझाडांची लागवड केली आहे. त्यामुळे घरापुरती फळांची उपलब्धता होते. परिसर हिरवागार राहण्यास मदत झाली आहे.

वनौषधी लागवडीबाबत लोणकर कुटुंबीय ग्रामस्थांना मार्गदर्शन करतात. मागणीनुसार वनौषधींची रोपेदेखील ग्रामस्थांना उपलब्ध करून देतात. यामुळे या कुटुंबीयांचे ग्रामस्थांशी भावनिक ऋणानुबंध जुळले आहेत. नोकरीमुळे जुनी चिखली (बुलडाणा) येथे लोणकर कुटुंबीय राहतात. गेल्या दहा वर्षांपासून परिसरात कोणाचा वाढदिवस असल्यास त्या व्यक्‍तीला ग्रामगीता आणि एक औषधी गुणधर्म असलेले रोप भेट स्वरूपात ते देतात. घरच्या टेरेसवर त्यांनी वनौषधींची रोपवाटिका तयार केली आहे.वनौषधींच्या प्रसारावर लोणकर कुटुंबीयांचा भर आहे.

- विनायक लोणकर ९७६७३१६२७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com