रोपवाटिकेतून आदिवासी युवक झाला स्वयंपूर्ण

पालघर जिल्ह्यातील चिखले (खोचरी पाडा) या अत्यंत दुर्गम भागातील शैलेश कलंगडा या युवा शेतकऱ्याने फळरोपवाटिका व्यवसायातून स्वयंरोजगार शोधला आहे. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन वर्षभर सुमारे तीस हजार रोपांची निर्मिती करून या युवकाने आपल्या आदिवासी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार तयार केला आहे.
Success story of a tribal youth
Success story of a tribal youthAgrowon

अशोक भोईर, डॉ. विलास जाधव

पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. येथील डहाणू तालुका प्रामुख्याने चिकू, सफेद जांब भाजीपाला पिकांसाठी ओळखला जातो. तालुक्यातील चिखले (खोचरी पाडा) हे अत्यंत दुर्गम गाव आहे. येथील शैलेश परशुराम कलंगडा या आदिवासी कुटुंबातील युवकाने १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वाणगाव येथून ‘टूल्स आणि डायमेकर’ पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. बोईसर व गुजरात येथील कंपन्यांमध्ये तीन वर्षे नोकरी केली. नोकरीला जाण्यासाठी सकाळी लवकर उठून प्रवास करावा लागे. येणेही रात्री उशिराचे असे. रस्ते व प्रवासाच्या सोईसुविधा हव्या तशा नाहीत. थंडी व पावसाळ्यात अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. घरीही व्यवस्थित लक्ष देताना कसरत करावी लागे. नोकरीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. घरचे एक एकर क्षेत्र होते, पण ते विखुरलेले होते.

मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक शेताला कुंपण करणे आवश्यक होते. परंतु त्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. खरिपात केवळ भात व्हायचा. उर्वरित आठ महिने जमीन पडीकच राहायची. त्यामुळे त्यातूनही आर्थिक सक्षमता नव्हती.

प्रयोगशील वृत्ती ठेवली

शैलेश यांना तसा लहानपणापासून शैलेश शेतीचा अनुभव होताच. वडिलांचे लवकर निधन झाल्याने शेती व घरची जबाबदारी अंगावर होती. आपली बिकट परिस्थिती बदलायची तर शेतीत नवे प्रयोग करायचे त्यांनी ठरवले. रब्बी हंगामात ते भाजीपाला घेऊ लागले. मामा नारायण पटलारी यांच्याकडे फळरोपवाटिका होती. त्यांच्याकडे लांबून लांबून शेतकरी कलमे घेण्यासाठी येत असल्याचे शैलेश यांनी वेळोवेळी पाहिले होते. मागणी व अर्थशास्त्र अभ्यासल्यानंतर रोपवाटिका व्यवसायात मोठी संधी असल्याचे त्यांना जाणवले.

प्रशिक्षणातून सुरवात

डहाणू- कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) केंद्र सरकारच्या भारतीय कृषी कौशल्य परिषदेमार्फत ‘नर्सरी वर्कर’ विषयाचे एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. शैलेश यांनी त्याचा लाभ घेण्याचे ठरवले. केंद्राचे तज्ज्ञ प्रशिक्षक अशोक भोईर यांनी कलमांचे विविध प्रकार, रोपांची निगा, खते, झाडांच्या जाती ओळखणे आदींबाबत प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले. पीक संरक्षणाबाबत उत्तम सहाणे, सिंचन पद्धतीविषयी अनुजा दिवटे तर विक्री व्यवस्थेबाबत केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विविध रोपवाटिकांना भेटीही देण्यात आल्या.

व्यवसायात बसला जम

कष्टाची तयारी, शिकण्याची व पुढे जाण्याची धडपड या जोरावर शैलेश यांनी तीन वर्षांच्या कालावधीत आपल्या रोपवाटिका व्यवसायात आता चांगलाच जम बसवला आहे. आंब्याच्या सुमारे १२ जाती (हापूस, पायरी, केशर, तोतापुरी आदी), सफेद, लाल व हिरवा जांब, चिकू, जांभूळ, पेरू अशी विविध फळपिकांची वर्षभर सुमारे ३० हजारांपर्यंत रोपे तयार केली जातात. सुमारे २५ हजार रोपांची जागेवर विक्री होते. तर बाजारांत जाऊन उर्वरित विक्री स्वतः शैलेश करतात. मागणी व फळनिहाय शेतकऱ्यांकडे जाऊन कोय- शेंडा- खुंटी- गुटी अशी विविध कलमे बांधून दिली जातात. खुंटी कलमासाठी प्रति ७० रुपये दर (साहित्य शेतकऱ्याचे असल्यास) अन्यथा १०० रुपये प्रति कलम दर तर कोय किंवा शेंडा कलम तीन रुपये प्रति नग दराने बांधून दिले जाते. ‘ऑर्डर’ मोठी असल्यास शैलेश मामांना सोबत घेऊन जातात. डहाणू, बोईसर, सफाळे, केळवे, वसई, वाडा, पालघर तसेच गुजरात राज्यातून शैलेश यांना मागणी आहे. जाण्यायेण्याचा व खाण्यापिण्याचा खर्च संबंधित शेतकरी करतात. स्वरोजगार निर्मिती करणे, नोकरीपेक्षा स्वतः मालक असणे व कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या बाबी शैलेश यांनी व्यवसायातून साध्य केल्या आहेत. कृषी कौशल्य विकास परिषदेच्या (Agriculture Skill Council of India) पुस्तिकेतही त्यांची यशकथा प्रसिद्ध झाली आहे.

(लेखक डहाणू-कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत आहेत.)

संपर्क ः शैलेश कलंगडा, ९२०९७९९६००

-डॉ. विलास जाधव, ८५५२८८२७१२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com