Forest Conservation : वनसंवर्धनातून बदलले चिमणपाड्याचे रुपडे

नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील चिमणपाडा (ता. दिंडोरी) या गावाने लोकसहभागातून वनसंवर्धनात आलेख उंचावला आहे. मृदा व जलसंधारणाची विविध कामे करून भूजल पातळीही वाढविली आहे.
Village Story
Village StoryAgrowon

Rural Story : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात चिमणपाडा हे कवडासर ग्रुप ग्रामपंचायतीमधील (Gram Panchayat) छोटे आदिवासी पाडे स्वरूप गाव आहे, पूर्वी येथे विपूल वनसंपदा (Forestry) होती. मात्र मागील २० वर्षांत वृक्षतोड (Tree Cutting) झाल्याने वनक्षेत्र उजाड झाले, जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला.

सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले हे गाव समुद्रसपाटीपासून २३०० मीटर उंचीवर असून, २००५ पूर्वी येथे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवायचा. सन २००६ मध्ये ग्रामस्थ एकत्र आले.

त्यातून कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी, नशाबंदी व ग्रामस्वच्छता ही पंचसूत्री अंगीकारली. लोकसहभाग, श्रमदानासह शासकीय योजना राबविल्या. पावसाचा प्रत्येक थेंब अडवून वनसंवर्धन (Forest Conservation) व जलसंधारणाची (Water Conservation) कामे केली.

वनसंपदा केली समृद्ध

वन विभागाच्या पुढाकाराने संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत गावात संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना एक मार्च, २०१० रोजी झाली. एकीची वज्रमूठ तयार होऊन ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीप्रमाणे गावात वनसंपदा समृद्ध झाली.

त्यातून पूर्वीच्या ओसाड वनक्षेत्रावर सर्वत्र हिरवळ उभी राहिली. समितीचे सदस्य सचिव म्हणून वनरक्षक तुषार तोरवणे जबाबदारी सांभाळत आहेत. तर अतिरक्त कार्यभार मनोहर गावंडे यांच्याकडे आहे. समितीत १२ सदस्य आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील, वनपरिमंडळ अधिकारी रूपेशकुमार दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कामकाज सुरू आहे. यापूर्वी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोंगे, उपवनसंरक्षक

शिवाजी फुले, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, तत्कालीन वनपरिमंडळ अधिकारी रामकृष्ण देवकर, वनरक्षक हिरामण चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. समितीचे अध्यक्ष विष्णू राऊत, सरपंच लीलाबाई राऊत, माजी सरपंच कृष्णा राऊत, हिरामण जाधव यांचीही मोलाची साथ मिळाली आहे.

Village Story
शेवगाव तालुक्यात सर्रासपणे वृक्षतोड

ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे सहभाग

वनक्षेत्रात अवैध चराईस प्रतिबंध आहे, चराई करणाऱ्या व्यक्तीकडून दंड आकारण्यात येतो. दर महिन्याला समितीची मासिक बैठक होते. त्यामध्ये वनीकरण, वनसंरक्षण, वन वणवा प्रतिबंध, वनक्षेत्र अतिक्रमण मनाई, वनचराई बंदी, वन्यजीवांसाठी नैसर्गिक अधिवास निर्मिती, जैवविविधता संरक्षण आदी मुद्द्यांवर प्रामुख्याने काम केले जाते.

पाच वर्षांपूर्वी परिसरातील जंगलक्षेत्रात वणवा लागला. ही गोष्ट गावकऱ्यांना समजताच त्यांनी त्वरित तिकडे धाव घेत वनसंवर्धन करण्याचा प्रयत्न केला.

पर्यायी स्रोतांचा वापर म्हणून येथील सुमारे ५४ लाभार्थ्यांना वन विभागामार्फत येत्या काळात एलपीजी इंधनाचा पुरवठा करणे प्रस्तावित आहे. अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व ओळखून सौर दिव्यांचा वापरही होत आहे.

कुऱ्हाडबंदी, चराईबंदी यशस्वी

सन २०१८ मध्ये गावात सुमारे २५ हेक्टरवर शिवण, आपटा, मोह, चिंच, करंज, शिसम, कांचन, जांभूळ, खैर, आवळा, काजू, आंबा, हिरडा आदी सुमारे २७ हजार ५०० रोपांची

लागवड ग्रामस्थांमार्फत करण्यात आली. पैकी ८५.२६ टक्के झाडे जीवंत आहेत. सन २०१९ मध्ये पावसाळ्यात भरगच्च वनीकरण कार्यक्रम योजना राबविण्यात आली. यात सुमारे १० हेक्टर क्षेत्रावर आवळा, मोह, खैर, करंज, बांबू, जांभूळ, बेहडा, शिरस, शिवण, रिठा, काजू, आंबा, बहावा, शिसव, साग आदी ११ हजार रोपांची लागवड झाली.

सन २०२२ मध्ये औद्योगिक उपयोगासाठी १८ हेक्टरवर बांबूच्या ११ हजार २५० रोपांची लागवड झाली. वनक्षेत्रात बिबटे, तरस, रानमांजर, रानडुक्कर, ससे, मोर, पारवे, पोपट, भारद्वाज, खंड्या, हळद्या तितर, लावरी पक्षी, नाग, धामण, मण्यार, घोणस आदी सजीवांची विविधता आढळते.

वनतळ्यांची निर्मिती केल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. त्यामुळे अधिवास टिकून राहिला आहे.

शेतीविकासाची दिशा :

पाड्यावर पूर्वी पाणीटंचाई होती. वरई, नागली, भात ही पारंपरिक पिके शेतकरी घेत. शेतातील कामे संपल्यावर रोजंदारी करण्यासाठी गावकऱ्यांचे स्थलांतर व्हायचे. सन २०११ नंतर वनराई बंधारे, दगडी नाला बांध व जल व मृद्‍संधारणाची विविध कामे झाली.

जिल्हा वार्षिक योजनेमधून गॅबियन बंधारे, पाच हेक्टर क्षेत्रावर खोल सलग समतल चर झाले. त्यातून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे रब्बी व उन्हाळी भाजीपाला पिके घेतली जाऊ लागली.

काकडी, भोपळा, कारले, दोडका, टोमॅटो, वांगी, मिरची अशी विविधता दिसून आली. कुक्कुटपालन, शेळीपालन अशा पूरक व्यवसायांना चालना मिळाली. त्यातून अर्थकारण सुधारण्यासह जीवनमानात बदल घडला.

चिमणपाड्यातील विकास कामे- ठळक बाबी

-भौगोलिक क्षेत्र...३९८.३५४ हेक्टर

-राखीव वनक्षेत्र २५३.३५४ हेक्टर

-लोकसंख्या...५७०

-सुमारे २५३ हेक्टर वनक्षेत्रावर चराई व कुऱ्हाड बंदी.

--जल व मृद्‍संधारणकामी सुमारे ३४२ घनमीटर आकारमानाची खोल सलग चर कामे.

-साग रोपांचे संवर्धन.

-जैविक कुंपणाला चालना.

--जागतिक वन दिन, जागतिक पर्यावरण दिन, आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन, वनमहोत्सव, वन्यजीव सप्ताह आदी कार्यक्रमांना चालना.

-जिल्हास्तरावर ‘संत तुकाराम वनग्राम योजने’तून ५१ हजार रुपयांचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार गावाला.

-गावात अंबेश्‍वरी हे निसर्गसंपन्न परीसर आहे. शिवाय प्राचीन शिवमंदिर असून, पर्यटनस्थळ म्हणून विकास होण्यासाठी ग्रामस्थ कटिबद्ध.

Village Story
पावसाळ्यातील भरपाईसाठी गावकरी करणार आंदोलन

रोजगाराच्या संधी

गावकऱ्यांनी पर्यायी इंधनाचा वापर सुरू केला आहे. यात निर्धूर चुली व बंबाचा वापर होतो. सादडा, बेहडा, पळस, शिवण, खैर, आंबा, जांभूळ, करंज, मोह, पापडा, हिरडा, शिंद, कांचन, आपटा, पांगारा, बिवला, पिंपळ, वड, काकडा, बोर, भोकर, करवंद आदी वृक्षांचे संवर्धन केले जाते. औषधी वनस्पती व रानभाज्यांमध्ये करटुले.

शतावरी, चाईचा मोर, गुळवेल, कडूकंद, कोकंदी, रान शेवळा येथे आढळून येतात. स्थानिक भूमिहीन व अल्पभूधारक तरुण त्यांचे संकलन करून नाशिक येथे विक्री करतात. ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून गावातील तरुणांनी ‘कणसरा माता रानभाजी गट’ स्थापन केला आहे.

रानभाजी महोत्सव, प्रदर्शनांमधून त्यांनी बाजारपेठ तयार केली आहे. काही महिला बचत गट कार्यरत असून, करवंदावर प्रक्रिया करून त्या लोणचे तयार करतात. त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

संपर्क : रूपेशकुमार दुसाने, ९८२२६९४६४७ वनपरिमंडळ अधिकारी

हिरामण जाधव, ७८८७३०९२७३ - कणसरा माता रानभाजी गट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com