
Success Story : आधुनिक शेती तंत्रज्ञान (Modern farming technology) व प्रशिक्षणाद्वारे आदिवासी शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्यात पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) महत्त्वाचे योगदान आहे. येथे अनेक वर्षांपासून मधमाशीपालन प्रशिक्षणाची सुविधा आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे भारतीय मधमाशीच्या (सातेरी) पेट्या पाहण्यास मिळतात. केव्हीकेचे पीक संरक्षण विषयातील तज्ज्ञ उत्तम सहाणे यांनी मधमाशीपालन विषयातील प्रशिक्षण, संशोधन कार्याला अधिक गती दिली.
प्रत्येक महिन्याला २ ते ३ प्रशिक्षणासह कोसबाड हे मधुपालकांच्या समस्यांचे निवारण केंद्र बनले. तेरा वर्षांत सात हजारांहून अधिक युवक प्रशिक्षित करण्यासह एक हजारापेक्षा जास्त युवक त्यातून मधमाशीपालन शिकले आहेत.
मधमाश्यांचा अधिवास
भारतात सातेरी (Apis cerana indica), ॲपिस मेलीफेरा, काही प्रमाणात कोती (ट्रायगोना) या मधमाश्या पेटीत पाळल्या जातात. म्हणजे पेटीत घेऊन त्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याची कला अवगत होती.
आग्या (Apis dorsata) आणि फुलोरी (ॲपिस फ्लोरिया) या दोन प्रकारच्या मधमाश्या खुल्या जागेत पोळी तयार करून राहतात. त्यामुळे जंगली किंवा पाळता न येणाऱ्या मधमाश्या अशीच त्यांची ओळख होती.
फुलोरीसाठी पेटी निर्मिती
मधमाशीपालन विषयात कार्यरत असताना सहाणे यांच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे फुलोरीचे पोळे झाडाच्या फांदीला १० ते २० फूट उंचीवर उजेडात असते. अंधारात किंवा रात्री वसाहतीत राहणाऱ्या मधमाश्यांसाठी (मेलीफेरा व सातेरी) यांच्यासाठी पेट्या विकसित झाल्या.
मात्र फुलोरी मधमाशी अंधारात न राहता उजेडात राहते. त्यामुळे सहाणे यांनी अनुभव व अभ्यासातून प्रयोग करीत पोळ्यावर उजेड येईल अशा प्रकारे फुलोरा मधमाशीसाठी पेटी विकसित करण्यास सुरुवात केली.
झाडावरील फुलोरीचे पोळे अलगद काढून ते पेटीत ठेवले. एक महिना त्यातील माश्या व्यवस्थित काम करीत असल्याची खात्री झाल्यानंतर पेटीत अजून बदल केले. दुसरे पोळे ठेवण्यात आले. अशाप्रकारे चार पेट्यांमध्ये पोळे ठेवण्यासह वेगवेगळ्या जागा बदलून चाचण्या घेतल्या.
अखेर योग्य पद्धतीची पेटी विकसित करण्यास सहाणे यांना यश आले. कोसबाड फुलोरी मधपेटी असे तिचे नामकरण केले. त्यसाठी केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ व कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
कोसबाड फुलोरी मधपेटीची वैशिष्ट्ये
-पेटी लाकडी पट्ट्यांपासून कमी खर्चात आणि उपलब्ध सामग्रीत घरच्या घरी बनविणे शक्य. कुशल कारागिरांची आवश्यकता नाही.
-उंची १४ इंच, लांबी १६ इंच व रुंदी ७ इंच. वरच्या झाकणापासून दोन इंच खाली पोळे अडकविण्यासाठी विशिष्ट जागा.
-लाकडी पट्टीचा पिंजरा. एक इंच रुंदीच्या उभ्या पट्ट्या. दोन पट्ट्यांमध्ये एक इंच अंतर. त्यामुळे बाहेरील प्रकाश सहज पोळ्यापर्यंत पोहोचतो. वसाहतीला नैसर्गिक वातावरण मिळते.
-पेटीचा आकार छोटा. त्यामुळे मधपोळ्यासहित एका शेतातून दुसऱ्या शेतात परागीभवनासाठी सहज नेणे शक्य. फुलोरी स्थानिक असून अन्य मधमाश्यांच्या तुलनेत फुलांवर सर्वांत जास्त प्रमाणात दिसते. त्यामुळे जास्त परागीभवन घडून पीक उत्पादनात भरीव वाढ होणे शक्य.
-पेटीला दोन्ही बाजूंनी कड्या. झाडाला किंवा झोपडीत निवाऱ्याला ५ ते १० फूट उंचीवर टांगता येते.
- पोळ्याचे पक्षी, मुंग्या, मुंगळे, सरडे आदींपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने पेटीची रचना.
-पेटीच्या वरच्या भागात झाकण. त्यामुळे मध काढण्यासाठी पोळे बाहेर काढता येते. मधाचा अर्थात वरचा भाग चाकूने कापून काढता येतो. माश्या आणि पोळ्याला जास्त नुकसान न करता पूर्ववत ते पेटीत ठेवता येते.
-सातेरी किंवा मेलीफेरा पेटीप्रमाणे ही पेटी उघडण्याची आवश्यकता नाही. विशिष्ट रचनेमुळे वसाहतीचे आरोग्य, कामकरी माश्यांची संख्या, पोळ्यात राणीमाशीची नवी घरे तयार झाली आहेत का, नर तयार झाले आहेत का आदींचे पेटीबाहेरूनच बारकाईने निरीक्षण शक्य. त्यामुळे वसाहतीचे विभाजन करणे सोपे.
-अतिशय कमी लाकूड लागत असल्याने पाचशे रुपयांपर्यंत पेटी तयार करता येते.
संपर्क - उत्तम सहाणे, ७०२८९००२८९, पीक संरक्षण विषय विशेषज्ज्ञ, केव्हीके
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.