Tomato : वरूडकाजी, हिरापूर झाले टोमॅटो, कारल्याचे ‘क्लस्टर’

औरंगाबाद जिल्ह्यातील वरूडकाजी, हिरापूर ही गावं टोमॅटो व कारली या पिकांची जणू क्लस्टर्स किंवा आगरच झाली आहेत. वर्षभर ही पिके दोन्ही गावांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने व्यापारीदेखील बांधावर येऊन तळ ठोकून खरेदी करू लागले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा ताजा पैसा देणारी व अर्थकारण उंचावणारी ही पिके शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहेत.
Tomato
TomatoAgrowon

बाजारपेठांची गरज व त्यातून आपल्याला असलेली संधी ओळखून तेच पिकवण्यावर भर द्यायचं धोरण शेतकऱ्यांनी स्वीकारलं आहे. त्याचं चित्र औरंगाबाद जिल्ह्यातील वरूडकाजी, हिरापूर या गावांच्या शिवारात पाहायला मिळतं. पूर्वी येथे कपाशी, तूर, बाजरी अशी पारंपारिक पिकं (Traditional Crop) दिसायची.

नगदी पीक म्हणून कपाशीच (Cotton) असायची. दिवाळीपर्यंत हातात दमडीही पडत नव्हती. वेचणीलाच उचल करण्याची वेळ होती. त्यामुळे पर्यायी पिकांच्या शोधात असलेल्या शेतकऱ्यांनी १० ते १५ वर्षांपूर्वी अल्प क्षेत्रात व पावसाळी हंगामातील भाजीपाला शेती (Vegetable Farming) सुरू केली. टोमॅटो (Tomato), मेथी व कारली (Bitter Gourd) या तीन पिकांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित झाले. काही प्रमाणात मोसंबी (Sweet Orange), डाळिंब (Pomegranate) पिकंदेखील शेतकरी घ्यायचे. पण या बागा काड्यांवर मोजण्याइतक्‍याच उरल्या आहेत. कपाशीनंतर क्रमांक दोनचे क्षेत्र ही भाजीपाला शेती व्यापत आहे. राज्यासह परराज्यांतील बाजारपेठेंशी संलग्नता व हाती पैसा खेळता ठेवणारी शेती त्यामुळे दोन्ही गावांच्या शिवारात जिकडे तिकडे टोमॅटो आणि कारल्याचे फड वर्षभर पाहण्यास मिळतात.

Tomato
Tomato : तंत्र टोमॅटो पुनर्लागवडीचे...

व्यापाऱ्यांची ‘एंट्री’ अन् बांधावरून खरेदी

सुमारे सात वर्षांच्या काळात राज्याबाहेरील व्यापाऱ्यांचा प्रवेश या भागात झाला. वरूडकाजी त्यांचे भाजीपाला खरेदीचे केंद्र बनले. व्यापारीच जागेवर आल्याने वरूडकाजी, हिरापूरजवळील सुमारे सात ते आठ गावांतही भाजीपाला शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. हंगाम सुरू झाला की थेट बांधावरून खरेदीसाठी व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी वरूडकाजीत ठाण मांडून बसतात. दरदिवशी सकाळी शेतकऱ्यांना आजचा खरेदी दर कळविला जातो. त्यानुसार शेतकरी तोडणी करून वजन करून पन्नीत माल भरून ठेवतो. थेट बांधावर मग व्यापाऱ्याची गाडी येऊन माल घेऊन जाते.

Tomato
Tomato Rate राज्यातील बाजारात वाढले|Tomato Bajarbhav|Agrowon

भाजीपाला शेतीचे चित्र

वरूडकाजीचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ९९८ हेक्‍टर असून, पैकी ४२४ हेक्‍टर लागवडीलायक आहे. पैकी १५० हेक्‍टरवर कपाशी तर १०० ते १२५ हेक्‍टरवर भाजीपाला असावा. त्यातही खरिपात ७० ते ८० टक्‍के टोमॅटो व पुढे कारल्याचे नियोजन असते. दुसरीकडे हिरापूरच्या लागवडीलायक ३१५ हेक्‍टरपैकी ७५ ते ९० हेक्‍टरवर भाजीपाला असावा. तिथेही हीच दोन मुख्य पिके आहेत.

कारल्याची लागवड उन्हाळी हंगामात होते. ती जून-जुलैमध्ये सुरू होतात. पुढील दोन महिने हंगाम चालतो. जून- जुलैमध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. ऑगस्टमध्ये सुरू होणारे उत्पादन सप्टेंबर- ऑक्‍टोबरमध्ये कळस गाठते. सुधारित तंत्राचा वापर करताना पॉली मल्चिंग पद्धती, ठिबक सिंचन व शेततळी यांचा वापर होतो. कारल्याची लागवड ८ बाय २ फुटांवर केल्यास किडी-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी जाणवत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

अर्थकारणाला मिळाली गती

वरूडकाजी येथील व्यापारी इलियास बेग यांच्या म्हणण्यानुसार येथे टोमॅटोची खरेदी दरवर्षी १० ते १५ ऑगस्टपासून सुरू होते. दोन्ही हंगामात प्रत्येक दिवसाला कारल्याची ८ ते १० टन खरेदी व टोमॅटोची हंगामात प्रति दिन पाच हजार क्रेटची रवानगी बाजारपेठांना होते. अलीकडील वर्षांत कारल्याला सरासरी २००० ते २२०० रुपये प्रति क्विंटल, तर टोमॅटोला ३०० ते ४०० रुपये प्रति क्रेट दर मिळाला.

यंदा पावसाळ्याच्या सुरूवातील उत्पादित ९० टन कारली निर्यातदार कंपन्यांना पुरविली. टोमॅटो पिकासाठी किमान ५० ते ६० हजार रुपये उत्पादन खर्च आणि जवळपास ४० ते ५० हजार रुपये खर्च कारल्यासाठी येतो. याशिवाय तोडणीला लागणारा खर्च प्रसंगानुरूप कमी अधिक असतो. अपवाद वगळता खर्च वजा जाता टोमॅटोतून एकरी किमान एक ते दीड लाख तर कारल्यातूनही तेवढेच उत्पन्न पदरात पडत असल्याचे शेतकरी सांगतात.

गावातील पैसा गावातच

वरूडकाजी जवळपास ११०० उंबऱ्याचं, तर हिरापूर हे ५० ते ६० उंबऱ्याचं गाव आहे. वरूडकाजीचे सरपंच दिलावर बेग म्हणाले, की सुमारे आठ हजार लोकसंख्येच्या गावात किमान ११०० शेतकरी कुटुंबे, त्यापैकी किमान ३०० बहूभूधारक तर अन्य अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनी टोमॅटो, कारल्याला नगदी पीक म्हणून स्वीकारलं तेव्हापासून शेती, गावचं अर्थकारण गतिमान झालं. शेतकरी, मजूर, व्यावसायिक, व्यापारी असं पैशाचं चक्र फिरू लागलं. आमच्या गावानं शेतीचा विकास साधण्याबरोबर पायाभूत सुविधा बळकट करण्यालाही प्राधान्य दिलं आहे. ड्रेनेज लाइन, रस्ते, पाइपलाइन आदी कामे होत आहेत. पुरातन जुन्नेश्‍वराचं मंदिर ही गावची ओळख आहे. शिवारातील नवनिर्मित इस्कॉन मंदिरानेही गावाचे नाव दूरवर पोहोचविले आहे.

हिरापूरचे प्रतापसिंग बिघोत सांगतात, की गावात ६० ते ७० टक्‍के शेतकरी अर्ध्या एकरापासून दोन एकरांपर्यंत भाजीपाला घेतात. पूर्वी पारंपरिक पिकांत जगणं अवघड होतं. दिवाळीपर्यंत पैसा हाती पडत नव्हता. आता चित्र बदललयं. वर्षभर पैसा हाती येत असतो. हिरापूरच्या कृषी साहायक मिर्झा सायराबानो गुलामनबी म्हणतात, की माती परीक्षण, बाजाराची गरज ओळखून पिकांची निवड, उत्पादनात सातत्य, सुधारित तंत्र आदींचा वापर वाढीस लागला आहे. बाजारपेठांशी असलेला ‘कनेक्‍ट’ हा या भागासाठी भाजीपाला क्‍लस्टर निर्माण करून गेला आहे. शेतकऱ्यांना दर तीन वर्षांला बांबू (एकरी जवळपास एक हजार बांबू) तर चार ते पाच वर्षाला किमान एक क्‍विंटल एकरी तारही वेल बांधणीसाठी लागते. बांबू, तार व सुतळीच्या अर्थकारणालाही गती देण्याचं काम टोमॅटो, कारलीचं हे क्‍लस्टर करते आहे.

संपर्क ः

गणेश देशमुख-९८५०७२९१३५

टोमॅटो उत्पादक, वरूडकाजी

प्रतापसिंग बिघोत

कारले उत्पादक, हिरापूर

९८८११४०४९३

मिर्झा सायराबानो गुलामनबी

कृषी सहायक, हिरापूर

९०९६१४७९९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com