Success Story : मेहनतीतून साध्य दर्जेदार ४५ उत्पादनांचा ‘विजया’ ब्रॅण्ड

जांभरमळा साळगाव (जि. सिंधुदुर्ग) येथील शिवराम वारंग यांनी कोकणातील फळांसह अन्य शेतीमालावर प्रक्रिया व त्यात वीस वर्षांहून सातत्य ठेवत ४५ उत्पादने निर्मितीचा उद्योग नावारूपाला आणला आहे. विजया ब्रॅण्डची त्यांची उत्पादने परराज्यांपर्यंत पोहोचली असून उलाढाल दोन कोटींवर गेली आहे.
Success Story
Success StoryAgrowon

success story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) माणगाव (ता. कुडाळ) येथील शिवराम वारंग सुमारे वर्षांपूर्वी याच तालुक्यातील जांभरमळा साळगाव गावी स्थायिक झाले. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) हे गाव आहे, एमएपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चार -पाच वर्षे खासगी शिक्षण संस्थेत नोकरी केली. त्यानंतर माणगाव येथील डॉ. हेडगेवार स्मृतिसेवा केंद्रात ते रुजू झाले.

येथे कोकणातील विविध फळांवर प्रक्रिया करून नवउद्योजकांना उत्पादने निर्मितीचे प्रशिक्षणही दिले जाते. हजारो उद्योजक केंद्रांच्या माध्यमातून घडले आहेत.

आठ वर्षे येथे व्यवस्थापकपदाच्या अनुभवासह प्रक्रियेतील ज्ञान प्रात्यक्षिकासह मिळाले. साहजिकच या उद्योगात उतरून स्वावलंबी व्हावे असे त्यांना वाटू लागले.

कर्जासाठी संघर्ष

जांभरमळा येथे पंधराशे चौरस फूट इमारत भाडेतत्त्वावर घेत उद्योगाचा श्रीगणेशा केला. भांडवलासाठी बँकांकडे धाव घेतली. पण अनेक कॅनिंग व्यवसायिकांनी कर्जाची परतफेड केलेली नाही, हे कारण सांगत प्रकिया उद्योगासाठी कर्ज मिळणार नाही असे बॅंकांकडून सांगण्यात आले.

परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांसोबत कच्चा माल (फळे) खरेदी करण्याविषयी बोलणी तर झाली होती. पण धीर सोडला नाही. मित्राच्या ओळखीने एका बॅंकेच्या व्यवस्थापकाला वारंग पुन्हा भेटले. त्यांना अनुभव, परिस्थिती व उद्दिष्ट यांची पूर्ण कल्पना दिली.

Success Story
Chana Procurement: हरभरा खरेदीसाठी ‘शेतकरी उत्पादक’ची केंद्रे कार्यान्वित करा

बॅंकेने जागेची पाहणी केली. कर्जप्रस्ताव तयार करण्यास सांगितले. तो सादर केला. पण त्यात बॅंकेने २० वेळा त्रुटी काढल्या. अखेर पूर्तता केल्यानंतर प्रस्ताव मंजूर झाला. परंतु त्याच वेळी व्यवस्थापकाची बदली झाली.

नव्या व्यवस्थापकाने कोकणातील थकित व्यवसायिकांची यादीच पुढ्यात ठेवत कर्जास नकार दिला. वारंग प्रचंड निराश झाले. पण हार मानली नाही. सातत्याने ते बँकेला भेटत आपली बाजू ठामपणे पटवीत राहिले. अखेर कठोर प्रयत्नांना यश आले. बॅंकेने होकार भरला.

उद्योगाची उभारणी

भांडवलाचा प्रश्‍न मिटल्यानंतर मात्र वारंग यांनी मागे वळून पाहिले नाही. सन २००१ मध्ये पंधराशे चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर घेतली. सुरुवातीला पाच लाख, सन २००६ मध्ये १० लाख असे कर्ज घेत वाटचाल सुरू ठेवली.

सन २००८ मध्ये साडेसात हजार चौरस फूट स्वमालकीची जागा घेतली. सन २०११ मध्ये आधीच्या यंत्रांमध्ये नव्याने भर पडली. आज बॉयलर, जॅकेटेड केटल, आवळा क्रशर, दोन पल्पर्स, फिलिंग, सीलिंग, पॅकिंग, तीन ड्रायर्स, लेबलिंग आदी विविध यंत्रसामग्रीने युनिट सज्ज आहे. या वर्षी आणखी यंत्रांची भर पडेल.

बाजारपेठेसाठी अथक प्रयत्न

आजमितीला तब्बल ४५ उत्पादनांच्या निर्मितीपर्यंत मजल मारली आहे. सुरवातीला वारंग स्थानिक विक्रेत्यांपर्यंत उत्पादन घेऊन स्वाद पाहण्याची व आवडल्यास विक्री करा अशी विनंती करायचे. मुंबईत भरणारे मालवणी जत्रोत्सव, पुणे, मुंबई आणि राज्याच्या विविध भागांतील प्रदर्शनात स्टॉल उभारले.

अथक ‘मार्केटिंग’ व गुणवत्ता जपल्याने विविध बाजारपेठांत व ग्राहकांच्या पसंतीस उत्पादने उतरली. आज महानगरांसह पश्‍चिम महाराष्ट्रातील शहरे, नाशिक, गोवा, इंदूर, गुजरात, नागपूर, कर्नाटक आदी भागांमध्ये मिळून ४५ पर्यंत वितरक आहेत. ऑनलाइन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांद्वारेही विक्री सुरू आहे.

Success Story
Onion bajarbhav : श्रीरामपुरात कांद्याची होळी

उद्योगातील ठळक बाबी

उत्पादनांची श्रेणी (निवडक)

-कोकम- सोल, आगळ, सरबत

-जांभूळ- ज्यूस, पोळी, बीपासून पावडर

-आवळा-ज्यूस, सरबत, मोरावळा, लोणचे

-मिरची- लोणचे दही- ताक मिरची, सांडगी मिरची

-लिंबू- लोणचे, सरबत, पाचक

-कैरी- लोणचे, सरबत

-फणस- फणसपोळी, चिप्स

-हापूस आंबा- पल्प, वडी. पोळी, जॅम, सरबत.

-काजू- मोदक

- मालवणी तसेच मच्छी मसाला, कुळीथ-नाचणी- घावणे- तांदूळ पीठ, थालीपीठ

इंडेक्स तीन-

-उद्योगातील २३ वर्षांचा अनुभव

- कच्च्या मालाच्या प्रकारानुसार त्यावर वर्षाला १५ ते ३०, ४० टनांपर्यंत प्रक्रिया.

-सध्याची वार्षिक उलाढाल- दीड ते दोन कोटी रुपये.

-विजया ब्रॅण्डने विक्री.

-कोकणात उन्हाळ्यात फळे असतात. त्यानंतर त्यांचा तुटवडा भासतो. त्यामुळे

वर्षभर उद्योग सुरू ठेवण्याच्या दृष्टीने पावसाळ्यात बाजारपेठेत मागणी असलेल्या सांडगी मिरची, विविध पीठनिर्मितीवर भर दिला जातो. गणेशोत्सव काळात काजूपासून मोदक बनविले जातात.

-उद्योगातून १४ महिला आणि दोन पुरुष अशा १६ जणांना बारमाही स्थानिक रोजगार दिला आहे.

-व्यवसायात चांगला जम बसविला असून, बँकांच्या कर्जाची परतफेड वेळेत करतात. त्यामुळे बँकांमध्ये चांगली पत निर्माण झाली आहे. कधीकाळी ज्या बँका कर्ज नाकारत होत्या त्या आता स्वतःहून आग्रह करतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवराम वारंग, ९६३७०८१७५८, ९४२३३०२८५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com