Keasar Mango
Keasar MangoAgrowon

केसरची आमराई उत्पन्नासह समाधानही देई

शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झालेले देगाव (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील विजयकुमार पोतदार आपल्या केशरची आमराई फुलवण्यात रममाण झाले आहेत. सुमारे वीस वर्षांपासून कष्टपूर्वक लावलेल्या व जोपासलेल्या बागेतून उत्कृष्ट स्वाद व गोडीची फळे त्यांना मिळत आहेत. निवृत्तीनंतरचे सुखी जीवन बागेच्या रूपाने मिळवताना आंब्याला थेट जागेवर बाजारपेठ मिळवण्यातही चे यशस्वी झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ-वैराग महामार्गावर मोहोळपासून १८ किलोमीटरवर देगाव येथे विजयकुमार पोतदार यांची सुमारे ४० एकर शेती आहे. त्यात साडेपाच एकर केसर आंबा, अडीच एकर चिंच आणि अन्य क्षेत्रावर हंगामनिहाय ज्वारी, गहू, चारा अशी पिके घेण्यात येतात. विजयकुमार सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करायचे. शेतीची आवड अगदी पूर्वीपासून जपलेली. पण नोकरीमुळे तेवढा वेळ शेतीला देता येत नव्हता. तरीही शक्य तेव्हा तसेच सुट्टीदिवशी ते शेतात येऊन कामे करायचे. वीस वर्षांपूर्वी त्यांनी केसर आंब्याची लागवड केली. प्रयत्नपूर्वक व जिव्हाळ्याने बागेची जोपासना करीत त्यातून आज गुणवत्तापूर्ण आंबा उत्पादन ते घेत आहेत.

नोकरीनंतर आंबा शेतीत करिअर

पाच वर्षांपूर्वी पोतदार सेवानिवृत्त झाले. मुलगा आनंद अभियंता म्हणून शासकीय नोकरीत आहे. मुलगी आश्‍विनी डॅाक्टर असून तिचे लग्न झाले आहे. त्यामुळे विजयकुमार हे पत्नी सौ. रत्नमाला यांच्यासह आता पूर्णवेळ शेतीत रममाण झाले आहेत. निवृत्तीनंतरचा प्रत्येक दिवस केशरच्या आमराईत ते समाधानाने कंठत आहेत. देगाव, वाळूज, नरखेड हा परिसर तसा सीना नदीकाठच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे या भागात ऊसशेती सर्वाधिक होते. पण उसाला येणारा एकरी उत्पादन खर्च, त्यातून मिळणारे उत्पन्न हा मेळ काही बसत नाही हे त्याचवेळी पोतदार यांनी जाणलं होतं. त्यामुळे खर्च, देखभाल, वेळ व त्या तुलनेत दीर्घकालीन मिळत राहणारे उत्पन्न यांचा विचार करताना आंबा हे पीक त्यांना अधिक फायदेशीर वाटले. वीस वर्षांपूर्वी घेतलेला हा निर्णय आज त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे. केशर आंब्यानं पोतदार यांना एवढं काही दिलं आहे की दुसरा पर्याय शोधावा असं त्यांना कधी वाटलेला नाही. निवृत्तीनंतर पाच-सहा वर्षापूर्वी २०१६ मध्येच त्यांनी केशर आंब्यांचं आणखी अडीच एकर क्षेत्र वाढवले. मात्र पूर्वीचे लागवडीतील अंतर आणि व्यवस्थापनातील चुका दुरुस्त करत घन पद्धतीने लागवड केली. उतरतं वय असलं तरी कष्टांची पर्वा न करता व्यवस्थापन चोख सांभाळले. आता बाग एकूण साडेपाच एकर झाली आहे.

आंबा बागेचे व्यवस्थापन

सर्व क्षेत्रावर केशर आंबा आहे. जमिनीची प्रत हलकी, मध्यम स्वरूपाची आहे. एप्रिल-मे मध्ये काढणी पूर्ण झाल्यानंतर देठाच्या राहिलेल्या उर्वरित काड्या काढून घेतल्या जातात. त्यानंतर झाडाच्या बुडातील आळ्याला माती लावून बांधणी करून घेतली जाते. जूनमध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर पावसाने जमीन चांगली थंड झाल्यानंतर प्रति झाड २५ किलो शेणखत दिले जाते. त्यानंतर आंतरमशागत केली जाते.

जुलैमध्ये निंबोळी पेंडीसह कॅल्शिअम, झिंक, बोरॅान, मॅग्नेशिअम या सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त खतांचा एकत्रित डोस प्रति झाड १० किलोपर्यंत दिला जातो. जुलै-ऑगस्ट दरम्यान पॅक्लोब्युट्राझोल या वाढ नियंत्रकाचा वापर होतो. त्यामुळे झाडाची अनावश्यक शाकीय वाढ थांबवून पुनरुत्पादन आणि मोहोर निघण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. बागेला

पाटपाण्याची सोय केली आहे. दर पंधरा दिवसांतून एकदा झाडाला पुरेशी ओल पाहून पाणी दिले जाते. पुढे दहा दिवसांतून, त्यानंतर आठ दिवसातून, दोन दिवसाआड, एक दिवसाआड अशी झाडाची गरज पाहून अर्धा तास, एक तास या प्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवले जातो. फळांमुळे झाड वाकते, त्या वेळी आधारकाठी दिली जाते. एप्रिल अखेरीस किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात आंबा काढणीस येतो.

नैसर्गिकरीत्या पिकवला जातो आंबा

देठाजवळ खड्डा पडल्यानंतर आंबा काढणीस पक्व झाल्याचे समजते. त्यानंतर आंबा उतरवला जातो. त्यानंतर पिकविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. एका खोलीत साळीचे काड अंथरले जाते. त्यावर एका रांगेत आंबे ठेवले जातात. साळीच्या काडाने ते झाकले जातात. साधारण आठ ते दहा दिवसांनी आंबा पिकतो. कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवला जातो. त्यामुळे तो गोडी, स्वादाला एकदम उत्कृष्ट लागतो.

रोपवाटिका

प्रदीर्घ अनुभवातून पोतदार आंबा उत्पादनात चांगलेच कुशल झाले आहेत. त्यापुढे जाऊन आंब्याची रोपवाटिकाही त्यांनी सुरू केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे त्यात थोडासा खंड पडला. मात्र आता जोमाने काम सुरू केले आहे. विश्‍वास व खात्री यामुळे रोपांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे.

वीज, पाण्याची शाश्‍वत सोय

पोतदार यांचे शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर माळरानावर आहे. त्यामुळे पाण्याची अडचण होती. विहीर आणि बोअरला पाणीही जेमतेम राहत असे. त्यामुळे शेतापासून एक किलोमीटरवर असलेल्या गावतलावावरून पाइपलाइन करून पाणी आणले आहे. ते पाणी विहिरीत सोडून बागेला पुरवले जाते. सौर कृषिपंपही बसवला आहे. अशा रीतीने वीज आणि पाणी या दोन्हींची शाश्‍वत सोय केली आहे.

विक्री व्यवस्था

आंब्याचे उत्पादन आणि उत्पन्न यात चढ-उतार निश्‍चित असतात. अलीकडील वर्षात नैसर्गिक आपत्ती, कधी जादा पाऊस तर कधी वादळवारे सहन करावे लागले. दोन वर्षांपूर्वी कोरोनासारखे संकटही आले. यंदाही वातावरणातील बदलामुळे दोन टप्प्यांत मोहोर आला. पण सर्व संकटांतून तरलो असल्याचे पोतदार सांगतात. गेल्या तीन वर्षाचा विचार करता २०२० मध्ये एकरी साधारण दोन टन आंबा मिळाला. त्यास प्रति किलो १०० रुपये दर मिळाला. गेल्यावर्षी (२०२१) दीड टन आंबा व दरही १०० रुपये व यंदा सव्वा टन आंबा मिळाला आहे. मुंबईसह पुण्यातील व्यापारी थेट जागेवर येऊन खरेदी करतात. काही ठरलेले ग्राहक थेट बागेतून पिकविलेला आंबा घेऊन जातात. त्यामुळे ‘मार्केटिंग’ ची वेगळी गरज राहिलेली नाही. उसाला एकरी ७५ हजार ते लाखभर रुपये खर्च येतो. एकरी किमान ५० टन उत्पादन गृहीत धरले आणि दोन हजार रुपये प्रति टन दर मिळाला तरी लाख रुपयांचे उत्पन्न व तेही टप्प्यांनुसार मिळते. त्या तुलनेत उसापेक्षा आंब्याचे अर्थकारण निश्‍चित फायदेशीर वाटत असल्याचे पोतदार सांगतात.

संपर्क ः विजयकुमार पोतदार, ९४२२६४७०६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com