Grape Farming : सिंचनाच्या भक्कम पायावर मालगावात फुलल्या द्राक्ष बागा

कधीकाळी दुष्काळी मालगावच्या (जि. सांगली) ग्रामस्थांनी स्वखर्चातून शेततळी उभारली. कृषी विभागाच्या योजना व म्हैसाळ प्रकल्पाची जोड मिळाली. साडेचारशेहून अधिक शेततळ्यांचे जाळे तयार झाले. द्राक्षशेती वाढली. द्राक्ष व बेदाणा निर्मितीतून शेतकऱ्यांना कौटुंबिक व शेतीचे अर्थकारण उंचावणे व प्रगती करणे त्यामुळे शक्य झाले.
Grape Farming
Grape FarmingAgrowon

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळी (Drought) म्हणूनच ओळखला जायचा. याच भागातील मालगाव हे प्रसिद्ध गाव. भौगोलिक क्षेत्र सुमारे ४४८१ हेक्टर आहे. पावसाच्या भरवशावर पिकं (Rain fed Land) घेतली जायची. सन १९७२ च्या दुष्काळात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्यासाठी विहिरी होत्या त्यातील पाणी संपुष्टात आले. शेती धोक्यात आली. अशा परिस्थितीही ब्रिटिश काळापासून जास्त महसूल देणारे हे गाव होते. आणि ती ओळख आजही आहे. मालगाव पूर्वी पानमळ्यांसाठी प्रसिद्ध होते. मुंबईतील बाजारपेठेत येथील पानांना मोठी मागणी असायची.

द्राक्ष बागांचे कल्चर

सन १९७८ मध्ये गावात द्राक्ष बागांचे ‘कल्चर’ सुरू झाले. पाण्याचे दुर्भिक्ष पाचवीला पुजलेले. बागेतून मिळणारा अर्ध्यावर पैसा दीड-दोन महिने पाण्यासाठी खर्ची पडायचा. बागा जगतील याचा भरवसा नसे. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या धडक योजनेद्वारे पाणी यायचे. त्यावर द्राक्ष बागा अवलंबून होत्या. गावापासून १५ किलोमीटरवर कृष्णा नदी आहे. हे पाणी साठवण्याची आवश्यकता भासू लागली. काही शेतकरी छोटी तळी तयार करून पाणी साठवू लागले. गरजेनुसार द्राक्षाला वापर होऊ लागला. पुढे शेतकऱ्यांनी स्वखर्चातून शेततळी घेतली. हे पाहून अन्य शेतकरीही प्रोत्साहित झाले. त्यामुळे आधी पाणी साठवण त्यानंतर द्राक्ष लागवड अशी स्थिती निर्माण झाली. सन १९९० नंतर गावात द्राक्ष शेती वाढू लागली. पाण्यासाठी शाश्‍वत ठोस उपाय करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येऊन विचारविनिमय करू लागले. कृष्णा नदीद्वारे २००० मध्ये प्रकाश सिंचन योजना सुरू झाली. त्यातून पाण्याची सोय झाली.

Grape Farming
Grape Advisory : वाढीच्या अवस्थेनुसार पावसाळी स्थितीतील उपाययोजना

कृषी विभागाचा हात

ग्रामस्थांनी स्वखर्चातून शेततळी घेतली होती. कारण त्यांना पाण्याचे महत्त्व पटले होते. कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना यांच्याद्वारे शेततळी व कोट्यवधी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले. सन २००५ मध्ये म्हैसाळ योजनेचा कालवा गावातून गेला. शाश्‍वत पाण्याची सोय झाली. आवर्तन सुरू झाले की पाणी उचलायचे आणि शेततळ्यात साठवायचे एवढे सुकर झाले. सन २००५ पूर्वी गावात अंदाजे एक हजार एकर क्षेत्र द्राक्षाखाली होते. पण सिंचन सुविधा झाल्याने २०१५ पर्यंत हे क्षेत्र पंधराशे एकरांपर्यंत पोहोचले. ऊस, केळी यासह अन्य फळबागांही वाढल्या.

Grape Farming
Grape Production : दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी हवे काटेकोर व्यवस्थापन

द्राक्ष-बेदाण्यांची कोटींची उलाढाल

सन १९९० पासून मालगावात हिरव्या बेदाण्यांच्या निर्मिती वा विक्रीला अधिक चालना मिळाली. आजमितीस गावात एक हजार ८०० एकरांवर बेदाणा तयार होतो. तर एक हजार २०० एकरांवरील द्राक्षांची विक्री होते. देशांतर्गत बाजारपेठेसह दुबई, बांगलादेश आणि युरोपलाही विक्री करण्यासाठी येथील शेतकरी पुढे सरसावले आहेत. द्राक्ष व बेदाण्यांची वार्षिक उलाढाल ८० ते ९० कोटींच्या घरात असावी असे द्राक्ष बागायतदार सांगतात.

मालगाव शेती विकास

द्राक्ष क्षेत्र- तीन हजार एकर

ऊस क्षेत्र- ४०० एकर

शेततळी

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी- २

सामूहिक शेततळी- ६८

मागेल त्याला शेततळे- १६४

स्वखर्चातून घेतलेली- २५०

शेततळे अस्तरीकरण- १०३

कृषी विभागाकडून देण्यात आलेली

ट्रॅक्टर संख्या- ८२

अवजारे- २६५

शेतीतून समृद्धी :

गावातील शेतकरी द्राक्षाचे एकरी बारापासून १४ टनांपर्यंत उत्पादन घेतात. प्रति पेटीस १०० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळतो. बेदाण्याचे एकरी तीन टनांपर्यंत उत्पादन हाती येते. बेदाण्याचे वर्षभर विक्री सुरू असते. सणासुदीच्या दरम्यान १७० रुपये, तर अन्य वेळी १२० ते १५० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळतो. नियोजन व कष्टातून शेतकऱ्यांनी आर्थिक सुबत्ता मिळवली आहे. काहींनी शेतीत गुंतवणूक केली. गावपरिसरात जमिनी घेतल्या. उत्पन्नाचे अन्य स्रोत निर्माण केले. द्राक्ष शेतीला यांत्रिकीकरणाची आवश्यकता असते. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांकडे एक किंवा दोन ट्रॅक्टर्स दिसायचे. परंतु क्षेत्र वाढलं मग फवारणी यंत्रे, अवजारांची संख्या वाढली. टुमदार घरे गावात दिसू लागली. सन २०२० मध्ये कोरोनाचं संकट आलं. अतिवृष्टी झाली. मोठ्या प्रमाणात आर्थिक गणित कोलमडली. तरीही हतबल न होता नव्या जोमाने द्राक्ष पिकविण्यासाठी शेतकरी जिद्दीने उभा राहिला. तालुक्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना देण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे आहे. - प्रदिप कदम, तालुका कृषी अधिकारी, मिरज ७८८७५६३४९६

आमचे गाव पहिल्यापासून दुष्काळाशी लढा देत आले. त्यामुळे आम्ही सामुदायिक शेततळी घेऊन शाश्‍वत पाण्याची सोय केली. म्हैसाळ योजनेमुळे पाणीटंचाईवर मात करणे सोपे झाले.
बाळासाहेब तिवारी ९९२१५६६७७५
द्राक्ष पिकामुळे उत्पन्न वाढलेच शिवाय स्थानिक रोजगार उपलब्ध झाला. गावातच शेतकरी बेदाणा तयार करू लागले आहेत. त्यामुळे उलाढालीत अजून वाढ झाली.
अनिकेत घुले ९५०४५११७७७
तालुक्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना देण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे आहे.
प्रदिप कदम, तालुका कृषी अधिकारी, मिरज ७८८७५६३४९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com