Grape Farming : प्लॅस्टिक आच्छादनाने वाचविल्या प्रतिकूल हवामानात द्राक्षबागा

कसमादे पट्ट्यातील (जि. नाशिक) द्राक्ष बागायतदारांनी अतिवृष्टी, पाऊस व हवामानाशी संबंधित कारणांपासून आगाप हंगामातील द्राक्ष बागेचा बचाव करण्यासाठी बागेवर प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केला. पीक संरक्षण, फवारण्यांची संख्या कमी करण्यासह अन्य फायदे मिळून खर्च कमी करणे व द्राक्षाची गुणवत्ता वाढवणे त्यांना शक्य झाले आहे. बागांचे नुकसान टाळण्यासाठी हे हुकमी तंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Grape Framing
Grape FramingAgrowon

नाशिक जिल्ह्यात आगाप द्राक्ष उत्पादन (Grape Production) प्रामुख्याने कसमादे भागातील सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यांत घेतले जाते. ‘अधिक जोखीम अधिक दर’ असे हंगामाचे सूत्र असते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशांतर्गत दिवाळी, रमझान तर परदेशात रशिया बाजारपेठेत (Russia Grape Export) नाताळमध्ये चांगले दर मिळतात. त्यामुळे जुलै व ऑगस्ट महिन्यात गोडी बहर छाटणी (Pruning) केली जाते. मात्र चार वर्षांत गोडी बहार छाटणी ते काढणी दरम्यान बागेचे मोठे नुकसान होत आहे. अतिवृष्टी (Heavy Rain), मॉन्सूनोत्तर पावसाच्या (Post Monsoon Rain) तडाख्यात फुलोरा अवस्थेत नुकसान, ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये काढणीच्या अवस्थेत पावसामुळे मण्यांना तडे, घडकूज, रोगांच्या प्रादुर्भावामुळे (Disease Outbreak On Grape) प्रतवारीत घसरण अशा समस्यांना बागायतदारांना तोंड द्यावे लागत आहे. कसमादे भागातील शेतकऱ्यांनी गोडी बहर छाटणीच्या तारखांचे वेळापत्रकही बदलले. तरीही एकरी तीन लाखांवर खर्च करूनही हंगाम यशस्वी साधणे अशक्य होत आहे. हतबल काही शेतकऱ्यांनी अक्षरशः बागाही काढल्या.

Grape Framing
Grape : अतिवृष्टीचा द्राक्षबागांवर परिणाम

प्लॅस्टिक आच्छादनाचे प्रयोग

द्राक्ष बागांवर प्लॅस्टिकचे आच्छादन तंत्र हवामानातील बदलांपासून द्राक्ष बागांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या मांजरी (पुणे) येथील प्रक्षेत्रावर तीन वर्षे आच्छादनाचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला. त्यात करपा व केवडा रोगाचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. त्यामुळे बुरशीनाशकांच्या सात ते आठ फवारण्या कमी झाल्या. मण्यांची चकाकी, आकार व गुणवत्ता वाढली. बाष्पीभवन कमी होत असल्याने २० टक्के पाण्याची बचत होऊन काढणी आठ दिवस लवकर आली. सूर्यप्रकाश संतुलित मिळत असल्याने पानाचे क्षेत्रफळ वाढले. गळकुज , घडकुज व काढणीच्या अवस्थेत तडे जाण्याची समस्या अत्यंत कमी झाली असे केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर सांगतात.

शेतकऱ्यांकडून तंत्राचा अवलंब

निवाने (ता. कळवण) येथील डॉ. महेंद्र आहेर, पिंगळवाडे (ता. सटाणा) येथील नामदेव भामरे, कोटबेल (ता. सटाणा) येथील अण्णा खैरनार, टेहरे (ता. मालेगाव) येथील चंद्रकांत शेवाळे यांनी आगाप हंगामात प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करून यशस्वी उत्पादन घेतले आहे. चालू वर्षीही अन्य प्रयोगशील शेतकरी भांडवलाची उपलब्धता करून तंत्रज्ञान वापरासाठी आग्रही आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या तळेगाव वणी (ता. दिंडोरी) येथील प्रक्षेत्रावर अडीच एकरांतही हा प्रयोग करण्यात आला आहे. यात रोगांचा प्रादुर्भाव कमी, साखर उतरण्यास उपयुक्त व तडे जाण्याची समस्या नाही असे सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले. एकाच वेळी खर्च अधिक असल्याने त्याचा वापर तूर्तास कमी आहे. मात्र पीक वाचविण्यासाठी हाच पर्याय असल्याचा शेतकऱ्यांचा सूर आहे.

Grape Framing
Grape : अतिवृष्टीचा द्राक्षबागांवर परिणाम

तंत्रज्ञान फायदे- शेतकरी अनुभव

-पाऊस असताना हंगामी कामे थांबतात. मात्र प्लॅस्टिक आच्छादन असल्यास पेस्टिंग, डोपिंग, बगल फूट आदींच्या अनुषंगाने कामे सुरू ठेवता येतात.

-बागा फुलोऱ्यात असताना जोरदार पावसातही वेलींवरील घडांचा संपूर्ण फुलोरा धुऊन जाण्याचे प्रमाण कमी राहते. दर्जेदार फळधारणा होते.

-फवारण्यात ६० टक्के व खर्चात ४० टक्के बचत होते.

-मालात रसायनांच्या अवशेषांचे प्रमाण कमी होते. गरजेएवढाच संजीवकांचा वापर होतो.

-बागेतील तापमान व बाहेरील तापमान यात ३ ते ५ अंश से. फरक असल्याने साखर भरण्याच्या वेळी झाल्याने फळांना चांगली गोडी येते.

-पावसामुळे काढणीच्या अवस्थेत तडे जाण्याची समस्या कमी होते.

-चालू पावसात मालाचे खुडे करणे शक्य.

-प्रकाश संतुलित अवस्थेत पिकाला मिळतो. बाष्पीभवन कमी राहते.

-बोद भुसभुशीत राहतो. पानांच्या आकारात वाढ, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या क्षमतेत वाढ

-अतिनील किरणांचा थेट वेलीवर परिणाम कमी.

-एक एकर द्राक्ष बागेसाठी लोखंडी संरचना, पॉलिथिन पेपर, संबंधित घटक व उभारणी यासाठी सुमारे चार लाख २५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.

नुकसान टळले, उत्पन्न वाढले

अण्णा खैरनार सांगतात की दोन वर्षांपासून सहा एकरांपैकी तीन एकरांत १६० जीएसएम जाडीचे प्लॅस्टिक आच्छादन बागेवर बसविले. प्रत्येकी ४ लाख २० हजार रुपये खर्च आला. तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान ९९ टक्के कमी झाले. खर्च ३० टक्क्यांनी कमी होऊन मेहनत वाचली. १२० दिवसांच्या आत मालाचे खुडे होतात. आच्छादनाचा वापर छाटणी ते काढणीपर्यंत होतो. पूर्वी नुकसान झाल्याने मालाची स्थानिक बाजारात विक्री व्हायची. खर्चही वसूल होत नसे. आता गुणवत्तेचा माल तयार होत असून १०० रुपये प्रति किलोप्रमाणे गर मिळतो. मागील वर्षी एकरी १५ टनांप्रमाणे तीन एकरात उत्पादन घेतले. बहुतांश मालाची परदेशात निर्यात झाली. दहा टन माल देशांतर्गत विकला. मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्के उत्पन्नवाढ झाली. पुढील काही वर्षे तरी या प्लॅस्टिकचा वापर करणे शक्य होणार आहे.

अण्णा लक्ष्मण खैरनार, ९७६३८७८०८२

पूर्वी घड पोंगा अवस्थेत असताना नुकसान व्हायचे. आता घड जिरण्याची समस्या सुटली आहे. पाऊस आल्यानंतर पेस्टिंग धुऊन जायचे. आता ते होत नाही. मागील वर्षी नुकसानीत २० रुपये प्रति किलो दराने माल विकावा लागला होता. आच्छादन असते तर हे नुकसान टळले असते. -
योगेश सावंत, आघार, ता. मालेगाव ९४२३१४१८१४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com