शिंदाणे प्रकल्पातून महिलांना रोजगार

कोकणातील किनारी भागात असलेल्या कांदळवनांचे संरक्षण करतानाच महिला बचत गटांना रोजगार मिळवून देणारा व्यवसाय कांदळवन प्रतिष्ठानमार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. गावखडी (ता.जि. रत्नागिरी) येथील मंगलमूर्ती गटातील सात महिलांनी शिंदाणे पालन प्रकल्पातून किफायतशीर आर्थिक नफा मिळविण्यास सुरुवात केली आहे.
Mussel Farming
Mussel FarmingAgrowon

किनारपट्टी भागात कांदळवन संरक्षण (Kandalvan) व उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत शिंदाणेपालन प्रकल्पाला (Mussel Project) अनुदान मिळाले आहे. गावखडीतील मंगलमूर्ती बचत गटातील सात महिलांनी यासाठी पुढाकार घेतला. या गटाच्या माध्यमातून गावातील मुचकुंदी खाडीत शिंदाणे उत्पादनाला (Mussel Production) सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये मंगलमूर्ती गटाच्या अध्यक्षा आकांक्षा पवार, सचिव जयश्री पवार, सदस्या समिधा डोंगरे, मानसी पवार, आश्‍विनी उंबरकर, वचिता चव्हाण व प्रियंका नागले यांनी पुढाकार घेतला आहे. या सदस्यांनी या प्रकल्पात लोकवाटा म्हणून दहा हजार रुपये जमा केले आहेत.

हिरवट, मोरपिशी किंवा निळ्या रंगाचे शिंदाणे (Mussel) किंवा काकई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‍शिंपल्यांना खाण्यासाठी वाढती मागणी आहे. खाडीलगत लाटांचा फारसा मारा नसणाऱ्या आणि पाण्याची खोली ४ ते ५ मीटर इतकी असलेल्या ठिकाणाची शिंदाणे संवर्धनासाठी निवड करण्यात आली. शिंदाणे उत्पादनासाठी आवश्यक लोखंडी पिंजरा वन विभागाकडून तयार करून देण्यात आला. डिसेंबर महिन्यात केरळ येथून शिंदाण्याचे बीज आणले. एका दोरीत ३० बीज विशिष्ट पद्धतीने बांधून पाण्यात सोडले जाते. लोखंडी पिंजऱ्याच्या माध्यमातून शिंदाणे बीज बांधलेल्या साठ दोऱ्या ‍खाडीतील पाण्यात सोडण्यात आल्या.

शिंदाण्याचे संवर्धन...

१) शिंदाणे उत्पादन प्रकल्पात जीआय पाइपपासून तयार केलेले तराफे खाडीच्या पाण्यात हवाबंद पिंपाच्या साह्याने तरंगत ठेवले जातात. सद्यःस्थितीमध्ये शिंदाणे (काकई) संवर्धनासाठी २.५ सेंमी आकाराचे बीज किंवा बीज लागलेले दोर केरळ राज्यामधून आणले जातात.

२) कांदळवन प्रतिष्ठान कक्षामार्फत हा प्रकल्प राबविण्याचे पहिलेच वर्ष असल्याने सध्या तरंगत्या पिंजऱ्यात शिंदाणे बीज असलेले ६० दोर लावले आहेत. साधारण सहा महिन्यांत ९ ते १० सेंमीपर्यंत शिंदाणे वाढले की विक्रीस काढले जातात.

३) एकदा बीज टाकले की त्याला कोणत्याही प्रकारचे खाद्य लागत नाही किंवा अन्य खर्च येत नाही. फक्त त्यावर लक्ष ठेवून पिंजरा स्वच्छता करणे एवढे काम महत्त्वाचे असते.

शिंदाणे विक्रीचे नियोजन ः

मंगलमूर्ती महिला गटाने डिसेंबरमध्ये खाडीमध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये शिंदाण्याचे बीज टाकले होते. सहा महिन्यांनी ते विक्री योग्य झाले. स्थानिक बाजारपेठेसह बंगलोर येथे शिंदाणे विक्रीसाठी पाठवले जातात. सध्या १२० रुपये डझन असा दर मिळत आहेत. आतापर्यंत शिंदाणे विक्रीतून गटाची वीस हजार रुपयांची मिळकत झाली आहे. सध्या बेंगलोर येथून ३० किलो शिंदाण्यासाठी मागणी आली आहे. परिसरातील गावातील लोक आता थेट जागेवर येऊन शिंदाणा खरेदी करतात. येत्या काळात शिंदाणे विक्रीतून आणखी पंधरा हजार रुपयांची उलाढाल होईल, असा गटाचा अंदाज आहे.

संपर्क ः समिधा डोंगरे, ९०२२९६३०६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com